आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या गणवेशासाठी रात्रीतून झाला हिताचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस गोटात चर्चेचा विषय ठरलेला गणवेश वाटपाची प्रक्रिया आणि त्यामागील तीन टक्क्यांचे गणित यावर अखेर तोडगा निघाला आहे. ‘दिव्य मराठी’च्या वृत्तानंतर काल बुधवारी रात्री उशिराने बिनतारी संदेशातून गणवेशाची सक्ती काढून ही बाब प्रत्येकाला आता एेच्छिक करण्यात आली आहे. याबाबत ‘दिव्य मराठी’ने वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी याबाबत आभारही मानले.

गणवेशापोटी पोलिस कर्मचाऱ्यांना दरवर्षी पाच हजार १६७ रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात होते; परंतु या वर्षापासून त्याला छेद देण्यात आला. पोलिस विभागाने खाकीमधील विविध रंगांचे शेड आणि त्यामुळे दलात एकसूत्रीपणा नसल्याचे कारण सांगून एकाच ठिकाणी गणवेश घेण्याची सक्ती करण्यात आली. एका व्यापाऱ्याला हा ठेका देण्यात आला; परंतु या व्यापाऱ्याने बाजारातील किमतीपेक्षा दुपटीने पैसे आकारले. शिवाय गणवेशासाठी देण्यात येणारे कापडही सुमार होते. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खिशाला झळ सोसावी लागणार होती. या प्रकाराकडे सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’ने लक्ष वेधले. कर्मचाऱ्यांची रास्त बाजू मांडत ‘दिव्य मराठी’ने बाजारात जाऊन कापडाची किंमत व्यापाऱ्याकडून आकारले जाणारे दर यांचीही माहिती दिली. शिवाय दोन दिवसांपूर्वीही पाठपुरावा करणारे वृत्त प्रकाशित केले होते. या दोन्ही वृत्तांची दखल घेऊन नाशिकस्तरीय अधिकाऱ्यांनी धुळ्यात गणवेश सक्ती करण्याची सूचना दिली. या सूचनेनंतर बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास बिनतारी संदेशाने (क्र.५०५/सीबी-५/गणवेश खरेदी/१००/२०१६) सर्व पोलिस ठाणे शाखांना ही सूचना देण्यात आली आहे. त्यावर वरिष्ठांची स्वाक्षरी आहे.

मुख्यालयातून वाटप होणारे गणवेश हे आता एेच्छिक करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना गणवेश खरेदी करावयाचा असेल केवळ त्यांनीच पोलिस मुख्यालय येथून गणवेश खरेदी करावा, अशी सूचना त्यातून करण्यात आली आहे, अशी माहिती पुढे आली.

पुन्हा जमा होणार पैसे
संपूर्णप्रक्रिया कर्मचाऱ्यांना एेच्छिक करण्यात आली आहे. त्यामुळे योजनेतून लाभ घेणाऱ्या पोलिसांच्या बँक खात्यात पाच हजार १६७ रुपये जमा होणार आहेत. दरवर्षाप्रमाणे या रकमेतूनच कर्मचाऱ्यांना गणवेश, बूट, रेनकोट, स्वेटर, लाइन यार्ड, पीटी शूज, बॅच तत्सम साहित्य खरेदी करावे लागणार आहे.