आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मिरॅकल’ अामदार पी.डी. दलाल ९२व्या वर्षीही सक्रिय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे -  राजकारणात नशीब चालत नसतं; पण नशिबातच राजकीय पद असेल तर त्यापेक्षा साेन्याहून पिवळं काही नसतं. अशीच बाब शहरातील माजी अामदार प्रभाकर दामाेदर दलाल यांच्याबाबत घडली. राजकारणातील डावपेच खेळलेल्या बलाढ्य राजकारण्यांना केवळ जनसंपर्काच्या बळावर बाहेर बसवून ‘मिरॅकल’ ठरलेले अामदार पी.डी.दलाल वयाच्या ब्यान्नव्या वर्षीही सक्रिय अाहेत. तरुणांना लाजवणारी त्यांची काम करण्याची हाताेटी अनेकांना अचंबित करते. ज्या वयात अाराम करायची वेळ असते, त्या वयात पी.डी.दलाल हे विद्यावर्धिनीसारख्या माेठ्या शैक्षणिक संस्थेची धुरा सांभाळतात. तसेच स्त्री शिक्षण संस्थेत सल्लागाराची भूमिका पार पाडतात. 
 
शहरात पी.डी. दलाल यांचे नाव घेतले म्हणजे त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंट फर्मची अाठवण हाेते. मूळचे अमळनेरचे रहिवासी असलेले पी.डी. दलाल सन १९५१मध्ये शहरात अाले तेव्हा फारशा लेखापरीक्षण कंपन्या अस्तित्वात नव्हत्या. त्यामुळे दलाल यांनी हळूहळू पाय राेवायला प्रारंभ केला अन् शहरात लेखापरीक्षण संस्था नावारूपाला अाणली. या काळात त्यांनी धुळे नंदुरबार या दाेन्ही िजल्ह्यांत जनसंपर्क वाढवला हाेता. या संपर्काच्या बळावरच त्यांनी राजकीय खेळी यशस्वी करून दाखविली. सन १९६८मध्ये विधान परिषदेची निवडणूक लागली तेव्हा ग.द.माळी व्यंकटराव रणधीर हे दाेघे इच्छुक हाेते. दाेघांचा राजकीय अनुभव दांडगा हाेता. त्या वेळी काॅंग्रेसतर्फे पां.रा. घाेगरे यांचे नाव पुढे हाेते. तेव्हाचे ज्येष्ठ नेते चुडामण पाटील म्हणाले हाेते की, राजकारणात चांगली माणसे पाहिजेत. त्यामुळे पी.डी.दलाल यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा दर्शविली; पण तिकीट मिळाले नाही. काॅंग्रेसतर्फे व्यंकटराव रणधीर, जनसंघातर्फे लखन भतवाल हे रिंगणात असताना पी.डी. दलाल अपक्ष उभे राहिले अन् दाेघांपेक्षा जास्त मते घेऊन निवडून अाले. त्यामुळे ‘मिरॅकल’ अामदार म्हणून ते अाेळखले गेले. अामदारकीचा काळ मागे पडला; पण पी.डी.दलाल हे सक्रियच राहिले. गेल्याच अाठवड्यात त्यांनी ९२व्या वर्षात पदार्पण केले; पण या वयातही त्यांचा कामाचा झपाटा वेगवान अाहे. अापल्याच लेखापरीक्षण संस्थेत ते दरराेज सायंकाळी हजेरी लावतात; कामातील बारकावे पाहतात, चुका लक्षात अाणून देतात. विद्यावर्धिनी संस्थेचे अध्यक्षपद या वयात त्यांच्याकडे अाले अाहे. मुळात याच संस्थेचे ते संस्थापक असताना त्यांनी कधीही पदाचा माेह ठेवला नाही. मुळात शैक्षणिक क्षेत्रात काम करायला त्यांना अावडते. शहरातील स्त्री शिक्षण संस्थेचे सल्लागार म्हणूनही ते कार्यरत अाहेत. याच संस्थेत विधी महाविद्यालयही त्यांनी अाणले. उमेदीच्या काळातही त्यांनी पुणे विद्यापीठात दाेन वेळा डीन म्हणून काम केले. सात कुलगुरूंसाेबतही काम केले. पी.डी. दलाल हे गेल्या ६५ वर्षांपासून शहरात लेखापरीक्षणाची फर्म चालवत अाहेत. या व्यवसायातील बारीक बाबी त्यांना माहीत अाहेत. त्याला अामदारकीचा स्पर्श झाल्यानंतर कामाच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या. अाताही ते या क्षेत्रात तन्मयतेने काम करताना दिसतात. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यांना काॅंग्रेसमध्ये घेतले. मात्र, ते पूर्णवेळ राजकारणात रमले नाहीत. अाराम करण्याच्या वयातही त्यांचा शिक्षण क्षेत्रातील रस कमी झालेला नाही. परिणामी, त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विधी महाविद्यालयाला अभिरूप काेर्टासाठी विद्यापीठस्तरावर दिले जाणारे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. सतत कार्यात रमणारे पी.डी.दलाल हे सातत्याने नव्याचा शाेध घेत असतात. समाजासाठी चांगले ते देण्याचा प्रयत्न करतात. विधान परिषदेचे अामदार हाेऊनही ते राजकारणात फारसे रमले नाहीत; पण त्याही काळात त्यांनी अापल्या कामाचा ठसा उमटवला. दिग्गजांना हरवून ‘मिरॅकल’ अामदार म्हणून त्यांनी अाेळख कायम केली; पण तेवढ्यावरच थांबता शिक्षण क्षेत्रात सतत ‘मिरॅकल’ काम व्हावे यासाठीच त्यांची धडपड सुरू असते. दरम्यान, बंॅक ऑफ महाराष्ट्रचे संचालक असताना आदिवासींच्या जागा आरक्षणासाठी नंदुरबार येथे एक महिना प्रशिक्षण केंद्र चालविले होते. त्यातील बरेच विद्यार्थी नोकरीला लागले. माेराणे येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या कार्यकारिणीत १० वर्षे होते. 

 
बातम्या आणखी आहेत...