आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिगरबाज: 11 जणांनी विझवला वणवा, तीन महिलांचा होता सहभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
३१ डिसेंबरच्या रात्री पाल वन्यजीव क्षेत्रात भडकलेल्या वणव्याचे दृश्य. - Divya Marathi
३१ डिसेंबरच्या रात्री पाल वन्यजीव क्षेत्रात भडकलेल्या वणव्याचे दृश्य.
भुसावळ - थेंबभरपाणी सोबत नसताना तोकड्या मनुष्यबळावर रात्रीच्या कीर्रर अंधारात धनदाट जंगलातील दऱ्याखोऱ्यांमधील वणवा विझवण्याचे धाडस केवळ जिगरबाज लोकच दाखवू शकतात. यावल अभयारण्यातील गस्ती पथकाचे सहायक वनसंरक्षक एस. व्ही. कुंभकर्ण, पाल (वन्यजीव)चे वनपरीक्षेत्र अधिकारी पी. बी. सोनवणे आणि १० जणांच्या चमूने हे जिगर दाखवले. एकीकडे ३१ डिसेंबर साजरा करण्याचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे १२ जणांची ही टीम केवळ अंजनाच्या पाल्यापासून तयार केलेल्या झाडूचा वापर करून सुमारे सात तास साडेसहा किलोमीटरचा फेरा घालून आगीवर नियंत्रण मिळवत होती. 
 
३१ डिसेंबरच्या सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वनरक्षक ए. के. ठाकरे आणि विवेक देसाई हे पाल (ता. रावेर) येथून खिरोद्याकडे येण्यास निघाले होते. पालजवळील पेट्रोल पंपाकडे जाताना जंगलात आग लागल्याचे ठाकरे यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी संबंधित कक्ष क्रमांक ४०/४१ नियतक्षेत्रच्या वनरक्षक वंदना विसपुते यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने मजुरांशी संपर्क साधला. मात्र, नेमके ३१ डिसेंबरला पाल येथील यात्रा असल्याने अनेक मजुरांशी संपर्क झाला नाही तर काहींनी येण्यास नकार दिला. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून न्याजोद्दीन तडवी, संजय तडवी, विनोद तडवी (खिरोदा) आणि बबलू खान, अकबर तडवी, जितेंद्र पवार (पाल), वंदना विसपुते हे सात जण वनरक्षक ए. के. ठाकरे आणि विवेक देसाई उभे असलेल्या पाल येथील वनरक्षक कार्यालयाजवळ तत्काळ हजर झाले. जंगलात भडकलेला आगीचा वणवा पाहता गस्तीपथकाचे सहायक वनसंरक्षक एस. व्ही. कुंभकर्ण, वनपरीक्षेत्र अधिकारी पी. बी. सोनवणे, वनरक्षक नीलम परदेशी हेदेखील पथकाला येऊन मिळाले. यानंतर सुरू झाला १२ जणांचा रात्रीचा अंधार तुडवत वणवा विझवण्याचा थरार. वाहनाने तीन किलोमीटर अंतर कापल्यावर आग डोंगरमाथ्यावर लागल्याचे पथकाच्या लक्षात आले. यामुळे दोघांना गाडीजवळ थांबवून जण सुमारे २५ मिनिटे पायपीट करून प्रत्यक्ष आग लागलेल्या डोंगरमाथ्यावर पोहोचले. येथे त्यांनी अंजनाच्या पाल्यापासून झाडू बनवत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, केवळ डोंगरमाथ्यावरच नव्हे तर समोरील दरीमध्ये तीन वेगवेगळ्या बाजूने आगीच्या ज्वाळा उठत असल्याचे त्यांना दिसते. रात्रीचा कीर्रर अंधार, तोकडे मनुष्यबळ, पाणीदेखील सोबत नसलेल्या या पथकाने केवळ एका टॉर्चच्या उजेडात आगीचा अंदाज घेत डोंगरमाथ्याला एक ते दीड किलोमीटरचा वळसा घालून आग लागलेली दरी गाठली. येथे आग विझवण्यात आली. 

जीपीएसचा वापर : रात्रीते पहाटे वाजेपर्यंत १२ जणांच्या जमूने जीवावर खेळून आग विझवली खरी मात्र, धावपळीत जंगलात नेमके आलो कुठे? याचा त्यांना मागमूस लागेना. यामुळे समोर दिसलेल्या पायवाटेवरून पथक जंगलाबाहेर येण्यास निघाले. पण ती पायवाट बाहेर नव्हे, तर जंगलाच्या आत जात असल्याचे लक्षात आले. यामुळे पथकाने जीपीएसवरून दिशेचा अंदाज बांधत माघारीचा प्रवास सुरू केला. 

जीवघेणी कसरत 
डोंगरमाथ्यावरीलआग विझवताना कर्मचाऱ्यांना जीवावर खेळणे भाग पडले. एकीकडे माथ्यावरून खाली येणारी आग आणि दुसरीकडे उतारामुळे प्रत्यक्ष आग लागणाऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यास करावी लागणारी धडपड, अंगावर काटा आणणारी ठरली. काही सदस्य घसरून खालीदेखील पडले. 

 
बातम्या आणखी आहेत...