आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायसीयूमध्ये जागा नसल्याचे सांगून रुग्णाला पाठवले खासगी रुग्णालयात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेली नेहा पारधी. - Divya Marathi
शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेली नेहा पारधी.
जळगाव - झाेक्याच्या दाेरीला पीळ पडून त्या मान अडकल्यामुळे एक १४ वर्षीय मुलगीला रविवारी सकाळी सिव्हिलमध्ये दाखल करण्यात अाले हाेते. सकाळी ११.३० वाजता आयसीयूमध्ये जागा नसल्याची थाप मारून डॉक्टरांनी त्या मुलीला थेट खासगी रुग्णालयात पाठवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर ‘दिव्य मराठी’ने सायंकाळी ७.१५ वाजता सिव्हिलमधील आयसीयूमध्ये जाऊन चौकशी केली असता रूग्णालयात १२ पैकी एक पलंग रिकामा असल्याची माहिती परिचारिकांनी दिली. या प्रकारामुळे डाॅक्टरांचा हलगर्जीपणा सिव्हिलमधील भाेगळ कारभार उजेडात अाला अाहे. 
 
पिंप्राळा परिसरातील गणपतीनगरातील नाना पारधी यांची १४ वर्षीय मुलगी नेहा पारधी रविवारी सकाळी झोक्यावर बसलेली होती. झोक्याच्या दाेरीला अचानक पीळ पडल्यामुळे नेहाची मान त्यात अडकली. या वेळी घरात तिचे दोघे भावंडे टीव्ही पाहत हाेते. मानेत दोरीत अडकल्यामुळे तिला गळफास बसल्याने ती तळमडू लागली. या वेळी सुदैवाने नेहाचे वडील नाना पारधी हे घरात अाले. पारधी यांनी दोरीचे पिळ सोडवत नेहाला बाजूला केले. दरम्यान, यात नेहाचा श्वास रोखला गेला होता. तिची अवस्था अगदीच नाजूक झाली होती. पारधींनी अत्यवस्थ अवस्थेतील नेहाला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. येथे तिला अापत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. एक सलाइन लावल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली. नेहाला आयसीयूमध्ये दाखल करण्याची गरज आहे. पण जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयूमध्ये एकही पलंग शिल्लक नाही. त्यामुळे तुम्ही वेळ दवडता नेहाला खासगी रुग्णालयात घेऊन जा, असा सल्ला डाॅक्टरांनी दिला. मुलीची अवस्था पाहून पारधींनी तत्काळ निर्णय घेत मुलीला खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी दिवसभर तिच्यावर उपचार केल्यानंतर सायंकाळी तिची प्रकृती धोक्याबाहेर आली. मुलीचा जीव वाचला, याचा आनंद पारधी यांना झाला. पण खासगी रुग्णालयाच्या उपचाराची आर्थिक झळ त्यांना बसली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील हलगर्जीपणाची अनेक उदाहरणे सध्या न्यायालयात प्रविष्ट आहेत. असे असताना देखील डॉक्टरांनी गरीब रुग्णांना सहानुभूती दाखवता थेट खासगीत पाठवल्याचे आणखी एक उदाहरण रविवारी पहायला मिळाले आहे. 

मिस्तरीकाम करून कुटुंबाचा उदर निर्वाह 
पारधीयांना तीन मुले आहेत. मिस्तरी काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गरिबीच्या परिस्थितीत राहणाऱ्या पारधींच्या मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार मिळाले असते तर त्यांना आर्थिक झळ बसली नसती. मात्र, सिव्हिलमधील डॉक्टरांनी आयसीयूत पलंग रिकामा नसल्याचे खोटे सांगत पारधींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. या प्रकारामुळे पारधी कुटुंबीयांनी ‘दिव्य मराठी’कडे नाराजी व्यक्त केली आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी देखील अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
 
आयसीयूचा वाईट इतिहास 
जिल्हासामान्य रुग्णालयातील आयसीयू हा ‘पॉश’ वॉर्ड आहे. विविध गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या राजकीय संशयितांनी किरकोळ आजाराचे निमित्त दाखवून या वॉर्डमध्ये दाेन-दोन, चार-चार महिने आराम केल्याची उदाहरणे यापूर्वी घडलेले आहेत. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी चार वर्षांपूर्वी सिव्हिलमधील आयसीयूमध्ये आराम करीत असलेल्या राजकीय व्यक्तींच्या नातेवाइकांना बाहेर काढण्यासाठी आंदोलन केले होते. याच आंदोलनादरम्यान संतप्त शिवसैनिक तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. जी. राठोड यांना मारहाणही केली होती. सिव्हिलमधील आयसीयूमध्ये ‘बड्यां’ना आराम करण्यासाठी कारण नसताना राहू दिले जाते. त्यासाठी अर्थिक व्यवहारही हाेत असतात, असे आरोपही पाटील यांनी केले होते. असा इतिहास असलेल्या या आयसीयू कक्षात खरोखर गरजू रुग्णांना मात्र दाखल करून घेतले जात नाही. हे रविवारी पुन्हा एकदा सिद्ध झाले. 

- घडलेला प्रकारगंभीर आहे. संबंधित रुग्णाला खासगी रुग्णालयात कोणत्या डॉक्टरांनी पाठवले, याची माहिती घेतो. चौकशी करून या घटनेत जो कुणी कर्मचारी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
डॉ.सुनील भामरे, जिल्हा शल्यचिकित्सक 
बातम्या आणखी आहेत...