आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे : नीरजने 4 मिनिटांत चीनच्या खेळाडूला पराभूत करून मिळवले सुवर्णपदक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - तायक्वांदो, कराटे आणि चीन असे समीकरण पक्के आहे; परंतु याच खेळात शहरातील नीरज चौधरी याने चीनचा खेळाडू चॉग ह्यूँला अवघ्या चार मिनिटांत पराभूत केले. तसेच आंतरराष्ट्रीयस्तरावर सुवर्णपदकाही मिळवले. स्पर्धेसाठी गेल्या दोन वर्षांपासून नीरजचा सराव सुरू होता. तो आता आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी तयारी करतो आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडूनही तो खेळणार आहे. 
 
शहरातील नीरज दिलीप चौधरी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. अभ्यासासोबतच ताे तायक्वांदोमध्येही तरबेज आहे. तो पुण्यातील तज्ज्ञ प्रशिक्षक तसेच शिवछत्रपती क्रीडा संकुलात सराव करतो. त्याने राष्ट्रीयस्तरावर झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. आग्रा येथे नुकत्याच झालेल्या विश्व स्कूल कॉम्बॅक्ट गेम स्पर्धेत तो सहभागी झाला होता. या स्पर्धेत भारत, ब्राझील, फ्रान्स, रशिया, चीन, दुबई आदी देशातील सुमारे ६० खेळाडू सहभागी झाले होते. ज्यूदो, कराटे, कुस्ती तायक्वांदो या क्रीडा प्रकारांसाठी ही स्पर्धा झाली. या स्पर्धेचा अंतिम सामना नीरज चीनच्या चाँग हूँ यांच्यात झाला. या लढतील नीरजने किकच्या बळावर प्रतिस्पर्धी चाँग हूँला अवघ्या चार मिनिटांत गारद केले. त्याने हा सामना एकूण २६-५ अशा गुणांनी जिंकून सुवर्णपदक मिळविले. त्याला मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या स्पर्धेसाठी त्याची गेल्या दोन वर्षांपासून तयारी सुरू होती. अपेक्षेप्रमाणे यश मिळाल्यामुळे परिश्रम सार्थकी लागल्याची प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली आहे. आता आशियाई क्रीडा स्पर्धेची तयारी नीरजने सुरू केली आहे. 
 
दरम्यान, नीरजने कॅनडात झालेल्या जागतिक स्तरावरील ज्युनियर अजिंक्य स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. तसेच विशाखापट्टणमला झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक प्राप्त केले होते. त्याला पुणे येथील बालेवाडीत असलेल्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, पुण्याचे जिल्हा क्रीडाधिकारी विजय संतान, संजय सबनीस, धुळ्याचे हेमंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच वडील दिलीप चौधरी, पोलिस कर्मचारी नारायण पाटील, सागर चव्हाण यांनीही वेळोवेळी प्रोत्साहन दिले. 
 
कुटुंबाचा पाठिंबा 
- गेल्या आठवर्षांपासून सराव करतो आहे. शालेय जीवनापासूनच तायक्वांदोला अभ्यासप्रमाणेच महत्त्व दिले. स्पर्धेसाठी अनेक तास सराव करत होतो. शिवाय तज्ज्ञांच्या टिप्स फॉलो केल्या. वडील कुटुंबीयांच्या विश्वासासोबत पाठिंब्यामुळे विजय मिळाला. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी तयारी सुरू करणार आहे.
- नीरज चौधरी, खेळाडू. 
 
आता उमविकडून खेळण्याची इच्छा 
सराव,स्पर्धा खेळामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये याकडेही नीरजने प्रकर्षाने लक्ष दिले आहे. त्यामुळेच अकरावी बारावीचे शिक्षण त्याने पुण्यात घेतले. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तो पुन्हा शहरात आला आहे. एसएसव्हीपीएस महाविद्यालयात कला शाखेला त्याने प्रवेश घेतला आहे. आता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून खेळण्याची त्याची इच्छा आहे. त्यासाठी नीरजची आवश्यक तयारी सुरू झाली आहे.