आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर सिस्टीम इंटिग्रेशनसाठी पोस्ट कार्यालयाचे काम ठप्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातील मुख्य टपाल कार्यालयासह विभागातील सात तालुक्यांमधील ३५ टपाल कार्यालयांमध्ये सोमवारपासून कोर सिस्टीम इंटीग्रेशन प्रणाली कार्यरत होणार आहे. या प्रणालीच्या पूर्व तयारीसाठी शनिवारी शहरातील मुख्य कार्यालयासह विभागातील सर्व कार्यालयांमधील कामकाज बंद ठेवण्यात आले होते. कामकाज ठप्प झाल्यामुळे ग्राहकांना त्रास झाला. मात्र सोमवारपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ऑनलाइन सुविधा टपाल विभागाच्या ग्राहकांना मिळणार आहेत. 
 
शहरातील मुख्य टपाल कार्यालयांमध्ये कोअर सिस्टिम इंटिग्रेशन (सीएसआय) ही प्रणाली सोमवार (दि.१७) पासून सुरू केली जाणार आहे. या प्रणालीच्या पूर्व तयारीसाठी शनिवारी शहरातील सर्व कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. कोअर सिस्टिम इंटिग्रेशन (सीएसआय) ही टपाल कार्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान आधुनिकीकरण प्रकल्पाचा एक भाग आहे. या प्रणालीत टपाल कार्यालयाच्या काउंटर सेवा, वितरण सेवा, आर्थिक सेवा, तसेच मानव संसाधन व्यवस्थापन सेवा समाविष्ट आहे. या प्रणालीमुळे विविध सेवांच्या माहितीची देवाण-घेवाण एकत्रितपणे नियंत्रित करणे शक्य होणार आहे. यापूर्वी ही संगणक प्रणाली म्हैसूर विभागात प्रायोगिक तत्त्वावर राबविली होती. त्यानंतर टप्प्याटप्याने देशभरात ही सुविधा राबवली जात आहे. भुसावळ विभागातील सर्व टपाल कार्यालयांमध्येही ही सुविधा सुरु केली जाणार आहे. यामुळे शनिवारी पूर्व तयारी म्हणून शहरातील मुख्य टपाल कार्यालयासह विभागातील सर्व कार्यालयांचे कामकाज बंद करण्यात आले होते. सोमवारपासून हे कामकाज कोर सिस्टीम इंटीग्रेशन या सिस्टीमद्वारे केले जाणार आहे. भुसावळ शहरातील मॉर्डनरोडवरील मुख्य कार्यालयासह विभागात येणाऱ्या ३५ टपाल कार्यालयांत कोअर सिस्टिम इंटिग्रेशन (सीएसआय) प्रणाली सुरू होणार आहे. त्यामुळे टपाल कार्यालयाच्या पारंपारीक कामाची पध्दत आता आधुनिक होणार आहे. 

महत्त्वाकांक्षी प्रकल्प 
सीएसआय प्रणालीच्याअंमलबजावणीमुळे टपाल विभागाच्या कामकाजाच्या पद्धतीने बदल होऊन आधुनिक रूप प्राप्त होणार आहे. कोअर बँकिंग सोल्युशन आणि ग्रामीण माहिती आणि संचार तंत्रज्ञान राबवणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे ग्राहकांना उच्च दर्जाची सुविधा मिळेल. आगामी काळात कामकाजात अधिक गतिमानता येणार आहे. डी.एस. पाटील, अधीक्षक, टपाल विभाग, भुसावळ 
 
कोर बँकिंग प्रणाली कार्यरत 
भुसावळटपाल विभागातील सर्व उपविभागीय कार्यालयांमध्ये यापूर्वी सीबीएस ही प्रणाली सुरू करण्यात आली होती. कोर बँकिंग सिस्टीममुळे टपाल विभागातून बँकिंगचीही सेवा मिळत आहे. शहरात याच माध्यमातून पोस्टाचे एटीएम देखील सुरू झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना बँकांप्रमाणे सुविधा मिळत आहेत. बँकेच्या व्यवहारांप्रमाणेच पोस्टातही या कोर बँकिंग प्रणालीमुळे व्यवहार करता येत आहेत. या प्रणालीनंतर कोर सिस्टीम इंटिग्रेशन ही दुसरी महत्त्वाची प्रणाली कार्यरत होणार आहे. त्यामुळे आगामी काळात पोस्ट विभागाच्या सेवेत आणखी गतिमानता येणार आहे. 

{सात तालुक्यांत सुविधा : भुसावळविभागात चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ आणि जामनेर या सात तालुक्यांचा समावेश होतो. या संपूर्ण सात तालुक्यांमध्ये ३५ उपविभागीय टपाल कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांमध्ये सोमवारपासून (दि. १७) सीएसआय ही प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. सर्व टपाल ग्राहकांना जलदगतीने सेवा देणे शक्य होणार आहे. 

{सर्व कामकाज ऑनलाइन : टपालकार्यालयातून स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्टाद्वारे पाठवलेले टपाल सध्या कुठे आहे, याची माहिती घरबसल्या इंटरनेटद्वारे मिळवता येणार आहे. टपाल पाठवणाऱ्या प्रेषक आणि प्राप्तकर्त्यांना मोबाइल मेसेजद्वारे आर्टिकलची माहितीही दिली जाईल. यासह पोस्टाच्या अंतर्गत एचआर, इन्शुरन्स, सेव्हिंग आदी विभागांचे सर्व कामकाज ऑनलाइन पद्धतीने होईल. 
 
बातम्या आणखी आहेत...