आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता बसवणार प्रीपेड मीटर; रिचार्ज करा अन‌् वापरा वीज, 100 व त्या पुढील रिचार्ज उपलब्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - वीज कंपनीतर्फे शहरात प्रीपेड वीज मीटर बसविले जाणार आहेत. मोबाइल डिश टीव्हीप्रमाणे रिचार्ज करा आणि वीज वापरा या संकल्पनेवर हे मीटर काम करेल. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर शासकीय वसाहती कार्यालयांमध्ये ते बसवले जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मागणीनुसार घरगुती व्यावसायिक ग्राहकांकडे हे मीटर लावण्यात येतील. 
 
विजेची बचत म्हणजेच विजेची निर्मिती असे सातत्याने सांगण्यात येत असले तरी शासकीय कार्यालयांसह सार्वजनिक ठिकाणी सर्रास विजेची उधळपट्टी होताना दिसते. घरातही अनेकवेळा अनावश्यक विजेचा वापर होतो. जास्त वीजबिल आल्यावर इतके बिल आलेच कसे यावरून वाद होतात. वीजबिल कमी यावे यासाठी अनेक जण मीटरमध्ये फेरफार करतात. त्यामुळे वीज कंपनीतर्फे वीजचोरी थांबवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनेचा एक भाग म्हणून वीज कंपनीतर्फे आता शहरात प्रीपेड वीज मीटर बसवले जाणार आहे. हे मीटर बसवल्यानंतर जितक्या रकमेचे रिचार्ज केले असेल तितकीच वीज वापरता येईल. रिचार्ज संपण्यापूर्वी ग्राहकांना सूचना मिळेल. हे मीटर बसवल्यानंतर चुकीचे मीटर रीडिंग घेतले, वीजबिल वेळेत मिळाले नाही अशा तक्रारी थांबतील. तसेच वीज चोरीलाही पायबंद बसेल. मुदतीत मीटर रिचार्ज केले नाही तर आपोआप वीजपुरवठा खंडित होईल. त्यामुळे ग्राहकांना मुदतीपूर्वीच मीटर रिचार्ज करावे लागेल. वीज मीटर रिचार्ज करण्यासाठी महावितरण कंपनीने या पूर्वीच सेंट्रलाइज कॉल सेंटर सुरू केले आहे. शहरात पहिल्या टप्प्यात शासकीय वसाहतींमध्ये हे मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी एक हजार ७१४ मीटर पहिल्या टप्प्यात उपलब्ध होतील. शासकीय वसाहतींमध्ये प्रामुख्याने पोलिस, एसआरपीएफसह वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या वसाहती, जिल्हा परिषद कर्मचारी वसाहतींमध्ये हे मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर ग्राहकांना मागणी प्रमाणे मीटर दिले जाईल. त्यात प्रामुख्याने ज्या ग्राहकांचा विजेचा वापर पाच किलो व्हॅट त्यापेक्षा अधिक आहे त्यांचे मीटर बदलवण्यात येतील. या मीटरची माहिती देण्यासाठी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दरम्यान प्रीपेड मीटर हे ग्राहक आणि वीज कंपनी अशा दोघांसाठी सोयीचे फायदेशीर असेल. 
 
शासकीय वसाहतीच का 
शासकीय वसाहतींमध्ये कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर नव्याने राहण्यास आलेला कर्मचारी वीजबिल भरण्यास टाळाटाळ करतो. परिणामी थकबाकी वाढते. हा भार वीज कंपनीला सहन करावा लागतो. त्यावर सक्षम पर्याय म्हणून शासकीय वसाहतींमध्ये प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहेत. 
 
टप्प्याटप्प्याने मीटर बसवणार 
- शहरात प्रीपेडमीटर बसविण्याची तयारी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय वसाहतींमध्ये हे प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी १७४१ मीटरची मागणी नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रीपेड मीटरची संख्या वाढविण्यात येणार आहे. -किशोरखोबरे, जनसंपर्क अधिकारी, वीज वितरण कंपनी 
 
१०० व त्या पुढील रिचार्ज उपलब्ध 
प्रीपेड मीटरमध्ये १०० रुपये त्यापुढे कितीही रुपयांपर्यंत रिचार्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे प्रीपेड कार्ड घेताना त्यावर पाच टक्के सूट दिली जाईल. म्हणजेच ५०० रुपयांचे प्रीपेड कार्ड ४५० रुपयांना मिळेल. हे मीटर बसवल्यानंतर वीजबिल भरायला जाण्याची, वेळेत वीजबिल भरले नाही म्हणून दंड भरण्याची कटकट मिटेल. 
 
सर्व माहिती अद्ययावत 
प्रीपेडमीटरवर रोज किती वीज वापरली, बिल किती झाले शिल्लक पैसे किती राहिले याचा आकडा ठळकपणे दिसेल. त्यामुळे आपोआपच विजेचा काटकसरीने वापर सुरू होईल. या माध्यमातून वीज बचतीची सवय लागेल. यापूर्वी नांदेड, नाशिक, कोल्हापूर, मुंबई शहरात हे मीटर बसवण्यात अाले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...