भुसावळ - रेल्वे कर्मचाऱ्यांना यापुर्वी त्यांचा सीआर रिपोर्ट (गोपनीय अहवाल) पाहता येत नव्हता. मात्र,कार्मिक विभागाच्या पुढाकाराने आता भुसावळ विभागातील १८ हजार कर्मचाऱ्यांना एका क्लिकवर त्यांचा सीआर रिपोर्ट पाहता येणार आहे. आगामी तीन महिन्यात वेबसाईटवर माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण होणार आहे.
विभागात सर्व कर्मचाऱ्यांची माहिती www.bslcratp.in या वेबसाईटवर अपलोड करण्याचा संकल्प वरिष्ठ कार्मिक अधिकारी डाॅ. तुषाबा शिंदे यांनी केला अाहे.
असे होणार लॉगइन : प्रत्येक कर्मचाऱ्याने आपला आधार क्रमांक वेबसाईटवर नोंदवल्यानंतर त्यांना ओटीपी मिळेल. मिळालेल्या ओटीपीच्या द्वारे कर्मचाऱ्यांना सीआर रिपोर्ट पाहता येईल.
माहिती अपडेट
कार्मिक विभागाने सुरू केलेल्या अाॅनलाईन प्रक्रियेत रेल्वेतील निवृत्त कर्मचाऱ्यांची माहितीदखील अपडेट झाली अाहे. विभागातील २२ हजारपैकी १२ हजार कर्मचाऱ्यांची माहिती अपलाेड झाली अाहे. तर उर्वरित कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू अाहे. वर्षअखेर सर्वच कर्मचाऱ्यांची माहिती अाॅनलाईन अपडेट होणार असल्याचे या वेळी सांगण्यात अाले.
या माहितीचा समावेश
भुसावळ विभागातील प्रत्येक रेल्वे कर्मचाऱ्याची व्यक्तीगत कार्यालयीन माहितीदेखील कार्मिक विभागाच्या वेबसाईटवर अपलाेड केली जात आहे. कर्मचाऱ्यांचे प्रमाेशन, त्यांची नोकरीला लागल्याची तसेच प्रमोशनची तारिख, कारकीर्दीतील उल्लेखनीय कामगिरी, तसेच प्रमोशन का थांबले त्याची कारणे अशा प्रकारची सविस्तर माहिती कार्मिक विभागाच्या वेबसाईटवर अपलोड केली जात आहे. ही सर्व माहिती अॅँड्रॉईड मोबाईलवरही पाहता येईल.
मध्य रेल्वेत पहिला मान
मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, पुणे, साेलापूर आणि भुसावळ या पाचही विभागांमध्ये सर्वप्रथम ऑनलाईन सीआर रिपोर्टची सुविधा सुरू करण्याचा मान भुसावळ विभागाला मिळाला आहे. डीअारएम अार.के. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ कार्मिक अधिकारी डाॅ. तुशाबा शिंदे, मंडळ कार्मिक अधिकारी एन.एस.काझी, सहायक कार्मिक अधिकारी एस.अार.दायमा, संदीप कुळकर्णी, देवेंद्र विश्वकर्मा यासाठी परिश्रम घेत आहेत.