आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीईच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला मिळाली मुदतवाढ, पालकांना दिलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शिक्षण हक्ककायद्यातून विनाअनुदानित, कायम स्वरुपी विनाअनुदानित, इंग्रजी मराठी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये २५ टक्के आरक्षीत जागांवर आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील बालकांना मोफत प्रवेश दिले जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला गुरुवार (दि. २) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 
 
बालकांचा मोफत सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी सध्या पात्र शाळांतील २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने राबवली जात आहे. या प्रक्रियेत पात्र शाळांमध्ये पालकांनी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख शनिवार (दि. २५) फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली होती. या प्रक्रियेत पालकांना पुन्हा संधी देण्यासाठी ही मुदत आता मार्च रोजी सायंकाळपर्यंत वाढवण्यात आली आहे. पालकांसह विविध संघटनांनी याबाबत शिक्षण संचालकांकडे मागणी केली होती. या मागणीनुसार ही मुभा देण्यात आली आहे. मात्र यानंतरच्या काळात या प्रक्रियेत मुदतवाढ देण्यात येणार नाही. मुदतवाढीचा फायदा घेऊन पालकांनी आपल्या पात्र पाल्यांचा अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरल्यास पुढील प्रक्रियेतील फेऱ्यांमध्ये पात्र शाळांतून २५ टक्के जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. भुसावळ तालुक्यातील १७ शाळांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाढीव मुदतीमुळे निकषांत बसत असलेल्या पालकांना अधिक लाभ मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

ग्रामीण भागात अल्प प्रतिसाद : आरटीईयोजनेसाठी ग्रामिण भागांतील शाळाही पात्र आहेत. सध्या ग्रामिण भागातही इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे फॅड वाढले आहे.या शाळा पात्र असल्या तरी ऑनलाइन अर्जासाठी गावपातळीवर सुविधा नसल्याने प्रतिसाद कमी प्रमाणात मिळत आहे. तर शहरी भागातील सीबीएसई पॅटर्नच्या शाळांमध्ये प्रवेश क्षमतेच्या तुलनेत दुप्पट अर्ज प्राप्त झाले आहेत. 

- भुसावळ तालुक्यातील सर्व पात्र शाळांमध्ये या प्रक्रियेची अंमलबजावणी होत आहे. शाळांसह गटशिक्षणाधिकारी कार्यालयात माहिती केंद्र सुरू करण्यात आले आहेत. पालकांना या केंद्रात सखोल मार्गदर्शन केले जाते. ऑनलाइन प्रक्रियेत काही अडचणी असल्यास पालकांनी माहिती केंद्रातून मार्गदर्शन घ्यावे. विजयपवार, गटशिक्षणाधिकारी, भुसावळ 
 
वयोमर्यादाही वाढवली 
पूर्व प्राथमिक अर्थात नर्सरीच्या प्रवेशासाठी अनेक विद्यार्थ्यांचे वय हे वयोमर्यादेच्या अटींमध्ये पात्र ठरत नसल्याने विद्यार्थ्यांवर वंचीत राहण्याची वेळ आली होती. त्यामुळे आता वयोमर्यादेतही वाढ करण्यात आली असून सहा महिन्यांची वयोमर्यादा वाढविण्यात आल्याने अधिक पाल्यांना प्रवेश घेता येणार आहे. याबाबत ऑनलाईन प्रक्रियेतील प्रोग्रॅममध्येही वयोमर्यादेच्या तक्यात सुधारणा करण्यात आली आहे. 
 
या शाळा आहेत पात्र 
ऑनलाईन पध्दतीने होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत शहर आणि तालुक्यातील स्वयंअर्थसहाय्यित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, अल्पसंख्यांक शाळा वगळून पात्र शाळांची यादी तयार करण्यात आली आहे. पूर्व प्राथमिक अर्थात नर्सरी प्राथमिक पहिल्या इयत्तेपासून प्रवेशासाठी पालकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या प्रवेश प्रक्रियेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी वाढीव मुदत देण्यात आली आहे. नवीन मुदतीनुसार मार्चपर्यंत student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पालकांनी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...