आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खर्चापेक्षा पाणी किती अडवता येईल हा उद्देश नजरेसमोर ठेवा, जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी. - Divya Marathi
बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी.
नंदुरबार-‘जलयुक्तशिवार’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ९५ गावांचा समावेश झाला आहे. या अभियानांतर्गत होणाऱ्या कामांवर खर्च होणारा पैसा वाया जाणार नाही याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच पैसा किती खर्च करायचा यापेक्षा पाणी किती अडवता येईल, हा उद्देश ठेवूनच यंदा ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबविण्यात यावे. कामाची गुणवत्ता उच्च ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. याबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिला. 
 
‘जलयुक्त शिवार’ अभियानाचा आढावा घेण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात वन, कृषी, सिंचन, जलसंधारण, सामाजिक वनीकरण या विभागांच्या अधिकाऱ्यांची कार्यशाळा झाली. त्यात ते बोलत होते. या वेळी जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, कृषी अधिकारी कृषी अधीक्षक सुभाष नागरे, जलतज्ज्ञ डॉ.स्वाती, मिलिंद पंडित आदी उपस्थित होते. 
 
जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले की, जिल्हा टँकरमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी ‘जलयुक्त शिवार’ अभियान यशस्वी करावे. राळेगणसिद्धी हिवरेबाजार या गावांचा विकास लोकसहभागातून झाला आहे.
 
लोकांना विश्वासात घेऊनच अधिकाऱ्यांनी ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबवावे. हे अभियान कुण्या एकट्याचे नाही. मी केले; माझे काम एवढेच, असे मानता प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांनी सामुदायिकरीत्या कामाची जबाबदारी स्वीकारावी. अभियानांतर्गत होणाऱ्या कामांसाठी निधीची कमतरता नाही; परंतु कामे चांगली झाली पाहिजेत. गुणवत्तेत कुठलीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. मिलिंद पंडित म्हणाले की, पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. जलपुनर्भरण हा पाणीटंचाईवर मात करण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. 

त्यामुळे प्रत्येकाने ‘जलयुक्त शिवार’ अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले. जिल्हा कृषी अधिकारी कृषी अधीक्षक सुभाष नागरे म्हणाले, ‘जलयुक्त शिवार’ अभियानात जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ७२, दुसऱ्या टप्प्यात ६९ तिसऱ्या टप्प्यात ९५ गावांची निवड करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात काम करताना प्रत्येक गाव हे टंचाईमुक्त झाले पाहिजे अशा पद्धतीने प्रत्येक अधिकाऱ्याने काम करावे, असेही ते म्हणाले. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी िजल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. 
 
जलपातळी वाढली 
जलयुक्तशिवार अभियानामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होत आहे. ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानातील कामे पूर्ण करण्यात आली आहेत त्या गावांची भूजलपातळी यंदा इतर गावांच्या तुलनेत काही प्रमाणात वाढण्यास मदत झाली असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 
 
शासनाची महत्त्वाकांक्षी योजना 
जलयुक्त शिवार अभियान ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत लोकसहभाग वाढवण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत. पावसाळ्यापूर्वी योजनेची कामे पूर्ण करण्याची सूचना केली. 
 
एक हजार शेततळी करण्याचे उद्दिष्ट 
जिल्ह्यात आतापर्यंत अडीचशे शेततळ्यांचे काम झाले आहे. वर्षभरात एक हजार शेततळी तयार करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शेततळ्यांची कामे नरेगाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. सूक्ष्म पाणलोट विकासानेच धान्याच्या उत्पादनात वाढ होते, हे राजस्थानच्या शेतकऱ्यांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे पाणलोटमुळे विकास झाला, असे मत या वेळी मान्यवरांनी व्यक्त केले. 
 
अधिकाधिक पाणी अडवा 
-देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झालीत; परंतु आजही पाण्याच्या समस्येवरच बोलावे लागते, हे दुर्दैव आहे. पैसा खर्च करण्याचे उद्दिष्ट ठेवू नका, तर पाणी किती अडवले जाणार आहे याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. नंदुरबार जिल्ह्यातून तापी नदी वाहत असूनही या भागात पाण्याची टंचाई आहे. नदीचे पाणी नको तिथे अडविण्यात आल्याने ही समस्या उद‌्भवली आहे. वृक्षारोपणाबाबतही शासन चूक करीत आहे. एकाच प्रकारची झाडे सर्वत्र लावली जात आहेत. कडूनिंबाचे झाड हे जंगलात कधीच लावले जात नाही. मात्र, तेच झाड लावले जात आहे. सिंधुदुर्ग नंदुरबारची भौगाेलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांत झाडांची लागवड करताना पर्यावरणाचा अभ्यास झाला पाहिजे. -डॉ.स्वाती, जलतज्ज्ञ 
बातम्या आणखी आहेत...