आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा बंद; पालक, विद्यार्थी वेठीस, भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा शासनाला घरचा आहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शिक्षणबचाव कृती समितीतर्फे प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारपासून दोन दिवसीय शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाचा फटका मात्र विद्यार्थी पालकांना बसला आहे. शिक्षक, संस्थाचालकांच्या मागण्यांसाठी शाळा बंद ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. भाजपच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या शाळा बंद ठेऊन आपल्याच शासनाला एकप्रकारे घराचा आहेर दिला.

समितीतर्फे गेल्या महिनाभरापासून विविध आंदोलने पुकारण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी अनुदानित माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या. जळगाव शहरातील ४७ तर जिल्ह्यातील एकूण ६२५ पैकी सुमारे ६१९ शाळा बंद ठेवल्याचा दावा समितीचे जिल्हाध्यक्ष एस.डी. भिरुड यांनी केला आहे. शासन सातत्याने शिक्षणविरोधी निर्णय घेत आहे. सरकारने आता तुकडी, विद्यार्थी संख्येचा अाधार घेता सरसकट शिक्षक, मुख्याध्यापकांच्या पदांमध्ये कपात सुरू केली आहे. वेतनेतर अनुदान बंद केले आहे. २५ टक्के आरक्षणात दिलेल्या प्रवेशापोटी चार वर्षांत केवळ एकच वेळा परतावा दिला आहे. इतर क्षेत्रांतून वसुली करता शिक्षणावरील खर्च कमी करण्याचा शासनाने घाट घातला आहे. तसेच स्वतंत्र क्रीडा शिक्षक नाही, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेसाठी एकच शिक्षक असावा, असे नियम टाकण्यात येत आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होणार आहे. शिक्षकांना इतर कामांमध्ये गंुतवले जात आहे. २८ अॉगस्ट रोजी शासनाने काढलेल्या अध्यादेशात विरोधाभास दिसून येत आहे. शैक्षणिक संस्थांची शासनाकडे ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थकली आहे. त्यामुळेही गुणवत्तेवर परिणाम होत आहे, असे आरोप समितीतर्फे करण्यात येत आहेत. याकरिता विविध आंदाेलने पुकारण्यात येत आहेत. दरम्यान बुधवारी झालेल्या शाळा बंदचे आंदोलन हे स्थानिकपातळीवरचे शेवटचे आंदोलन होते. यानंतर १६ डिसेंबर रोजी नागपूर येथे सामूहिकरीत्या धरणे आंदोलन होईल. त्यानंतर पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे, असेही भिरुड यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.

शाळा बंदला शासनच जबाबदार
शाळाबंद ठेवल्यामुळे पालक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, ही बाब समिती मान्य करते. मात्र, ही चूक शासनाची आहे. महिनाभरापूर्वीच आंदोलनाची सूचना शासनाला दिली होती. मात्र, शासनाने चर्चेला बोलावले नाही. शाळा बंद काळात शिक्षकांचे पगार कापल्यास आंदोलन करण्यात येईल. ९९ टक्के शाळांनी बंदमध्ये सहभाग घेतला. शासनस्तरावर सकारात्मक चर्चा झाल्यास बंदचे दोन दिवस भरून काढण्यासाठी सुटीच्या दिवशीही काम करू. एस.डी.भिरुड,जिल्हाध्यक्ष,शिक्षण बचाव कृती समिती

अनुदानित माध्यमिक शाळा
जळगाव शहरात ४७, तालुक्यात २८, एरंडोल २४, पारोळा ४०, अमळनेर ६०, यावल ४७, रावेर ५२, धरणगाव ३०, मुक्ताईनगर २०, बोदवड १०, पाचोरा ४६, चाळीसगाव ६५, भडगाव ३३, चोपडा ५२ आणि जामनेरात ३० आहेत. यापैकी केवळ २-३ शाळा सुरू असल्याचे भिरुड यांनी सांगितले.

काही शाळांत सूचना नव्हत्या
शहरातील काही शाळांमध्ये सूचना देताच बंद पाळण्यात आला. त्यामुळे पालकांनी सकाळी मुलांना शाळेत सोडण्यास आले. परंतु, त्यांना शाळा बंद असल्याचे समजल्यामुळे मुलांना माघारी न्यावे लागले. शहरातील ला.ना. शाळेतही काही मुले आढळून आली. मात्र, नंतर त्यांना घरी जावे लागले.

सत्ताधारी पक्षाचाही पाठिंबा
राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांच्याही जिल्ह्यात शाळा आहेत. आपल्याच शासनाच्या विरोधातील या आंदोलनात सर्वांनीही सहभाग घेतला. तसेच शाळा बंद ठेवून शासनाला घरचा आहेर दिला आहे. शहरातील पी. एम. मुंदडे शिरसाेली येथील बारी विद्यालय सुरू हाेते.

परीक्षा कामांवर बहिष्काराचे संकेत
आंदोलनाचा पहिला टप्पा संपला असला तरी येणाऱ्या काळात फेब्रुवारी, मार्चमध्ये होणाऱ्या १०वी, १२वीच्या परीक्षा कामांवर शिक्षक बहिष्कार टाकू शकतात, असे सूतोवाच देण्यात आले आहेत. वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी दोन वर्षांपूर्वी हे शस्त्र उपसले होते. मात्र, नंतर त्यांना माघार घ्यावी लागली होती. आता ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

काही शाळांच्या परिसरात प्राथमिक माध्यमिक विभाग असतो, तर काहींमध्ये माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालये भरतात, अशा शाळांना एकच गेट असल्यामुळे बुधवारी संस्थाचालकांनी मुख्य प्रवेशद्वारच बंद ठेवले. प्राथमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांचा संप नसूनही त्यांच्या विद्यार्थी, शिक्षकांनाही शाळेत प्रवेश देण्यात आला नाही. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर झालेच, परंतु त्या शिक्षकांचे पगार कापले गेले तर त्यांचे आर्थिक नुकसानही हाेणार आहे. त्याला जबाबदार कोण राहील, याची मात्र शाश्वती नाही.

संस्थाचालकांमुळे प्राथमिक शाळांचेही नुकसान
शहरात ४७ तर जिल्ह्यातील ६१९ शाळा बंद ठेवल्याचा शिक्षण बचाव कृती समितीचा दावा
माध्यमिक शिक्षकांच्या संपामुळे ला.ना. शाळेचे बंद प्रवेशद्वार.

शासनाचे पत्र प्राप्त झाल्यास आंदोलकांवर कारवाई करणार
शाळाबंद आंदोलनासंदर्भात समितीने निवेदन दिले होते. त्यानुसार त्यांनी शाळा बंद अांदोलन केले आहे. बंद काळात शिक्षकांचे पगार कापायचे की नाही, याबाबत अद्याप शासनाकडून काही पत्र आलेले नाही. तसे पत्र प्राप्त झाल्यास कारवाई करण्यात येईल. देविदासमहाजन, शिक्षणाधिकारी,माध्यमिक
बातम्या आणखी आहेत...