आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहू रुग्णालयातील जनरेटरला वर्षांपासून दुरुस्तीची प्रतीक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेच्या शाहू महाराज रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर प्रसूतीसाठी दाखल असलेल्या महिला रुग्ण बालकांचे खूपच हाल हाेतात. रुग्णालयाचे जनरेटर दोन वर्षांपासून खराब झाले असून, ते दुरुस्तीसाठी देण्यात आले आहे, असा गाैप्यस्फाेट मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत करण्यात अाला. या वेळी हा प्रकार गंभीर असून, जनरेटर तत्काळ दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी करण्यात अाली. या प्रकाराची दखल घेऊन आयुक्तांनी विद्युत अभियंत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
महापालिकेत मंगळवारी वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेत स्थायी समितीची पहिलीच सभा झाली. यात शाहू महाराज रुग्णालयासाठी पालिकेने जनरेटर उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, दोन जनरेटर सध्या नादुरुस्त असल्याची माहिती समोर आली. यातील एक जनरेटरच्या दुरुस्तीसाठी दोन वर्षांपासून संबंधित मक्तेदाराला कार्यादेश देण्यात आले अाहेत. मक्तेदाराने दुरुस्तीसाठी त्यातील काही पार्ट््स काढून नेले आहेत. त्यामुळे सध्या या जनरेटरची अवस्था अगदी भंगार झाली अाहे. ४० दिवसांचा अवधी दिल्यानंतरदेखील दोन वर्षांपासून मक्तेदाराने ते दुरुस्त केले नाही, अशी माहिती स्थायी समितीचे सदस्य नितीन बरडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

यावर विद्युत अभियंता अरुण पाटील यांनी संबंधित ठेकेदाराला ‘कारणे दाखवा’ नोटीस शिस्तभंगाची शिफारस पाठवली आहे. मागील पैसे देणे बाकी असल्यामुळे तो आडमुठेपणा करीत आहे, अशी माहिती दिली. मात्र, अभियंता पाटील यांची उत्तरे समाधानकारक नव्हती. त्यावर आयुक्त जीवन सोनवणे यांनी ‘तुम्ही मनपाचे प्रतिनिधी आहात की मक्तेदाराचे?’ असे खडसावले अभियंता पाटील यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्याचे आदेश दिले. तसेच संबंधित मक्तेदाराला काळ्या यादीत टाकून त्याने जर दुरुस्तीसाठी नेलेले जनरेटरमधील साहित्य मनपाला परत केले नाही, तर गुन्हा दाखल करा, असेही आदेश दिलेे. सभेच्या सुरुवातीला खडके यांनी मनोगत व्यक्त केले. सहकारी, अधिकारी, कर्मचारी पक्षश्रेष्ठींच्या सहकार्याने शहरातील नागरिकांना न्याय देऊ, असे सांगितले.

भोंगळ कारभाराचे सभेत वाभाडे
आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे या सभेत निघाले. यावर अायुक्तांनी बुधवारपासून घंटागाडी कचरा वाहनावरील जीपीएस यंत्रणा सुरू होणार असून, त्यानंतर सर्व प्रकारांवर नियंत्रण ठेवता येईल, असे सांगितले. तसेच घंटागाड्यांचे वेळापत्रक प्रत्येक नगरसेवकाला देण्याचे आदेशही दिले.

गळती थांबवा
काव्यरत्नावली चौकातील पाइपलाइनला गळती लागली आहे. त्यामुळे रस्ता खराब होत आहे. शहराला मुबलक पाणी मिळत असल्यामुळे नासाडीकडे लक्ष दिले जात नाही, असा आरोप श्यामकांत सोनवणे नितीन बरडे यांनी केला. त्यावर बुस्टर पंप खराब असल्याची माहिती अभियंता डी. एस. खडके यांनी दिली. यावर दुरुस्तीसाठीची अनामत रक्कम ६० हजारांवरून लाख करा; पण दुरुस्ती वेळेवर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. तर शहरात बसवण्यात येणाऱ्या हायमास्ट लॅम्प पोल खरेदीत नफेखोरी होत असल्याचा आरोप करण्यात आला.

घंटागाडी येत नसल्याची तक्रार
सभेतील विषय संपल्यानंतर नगरसेविका ज्योती इंगळे यांनी वॉर्डातील साफसफाईचा विषय चर्चेला आणला. आपल्या वॉर्डात घंटागाडी नियमित येत नसल्याची तक्रार त्यांनी केली. आरोग्य विभागाकडून आरोग्य निरीक्षक, कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असतात. त्यामुळे सफाईच्या कामात नियमितता नसते; कर्मचारी गैरहजर असतात, असे आरोप त्यांनी केले. नगरसेवक चेतन शिरसाळे, कंचन सनकत, नवनाथ दारकुंडे यांनीदेखील आपापल्या वॉर्डातील समस्या मांडल्या.
बातम्या आणखी आहेत...