आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छताचे प्लास्टर कोसळले, सुदैवाने जीवितहानी टळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- पालिकेच्याछत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील पहिल्या मजल्यावरील गाळा क्रमांक १९मधील छताचे प्लास्टर सोमवारी मध्यरात्री अचानक काेसळले. घटना घडली त्या वेळी दुकान बंद होते, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, या घटनेमुळे संकुलाच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संकुलातील समस्यांबाबत व्यापाऱ्यांकडून वारंवार पालिकेकडे तक्रारी केल्या जातात. मात्र, निद्रित पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे समस्या सुटण्याऐवजी वाढतच आहेत.

पालिका प्रशासनाला व्यापारी संकुलांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते. तसेच शहरातील विविध व्यवसायांचे केंद्रीकरण झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल आर्थिक उलाढालींचे प्रमुख केंद्र बनले अाहे. मात्र, या संकुलाची स्थिती गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत विदारक झाली आहे. सोमवारी मध्यरात्री पहिल्या माळ्यावरील संदीप चौधरी यांचा गाळा क्रमांक १९ मधील छताचे प्लास्टर अचानक कोसळले. सुदैवाने हा प्रकार मध्यरात्री घडला त्या वेळी दुकान बंद होते, यामुळे जीवितहानी टळली. दरम्यान, स्लॅब प्लास्टरचा काही भाग कोसळल्याने चार कॉम्प्युटर, एक स्कॅनर, एक सीलिंग फॅन, खुर्च्या आणि कॉम्प्युटरचे इतर साहित्य कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले, त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाच्या छतावर मोठ्या प्रमाणात पाणीही साचते. त्यामुळे संकुलाचा संपूर्ण स्लॅब कमकुवत झाल्याची भीती आहे. याबाबत गाळ्यांचा मालकी हक्क असलेल्या व्यापाऱ्यांनी पालिकेकडे वारंवार तक्रार केली. मात्र, पालिकेतर्फे कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही. या तक्रारीकडे पालिकेने वेळीच लक्ष दिले असते तर सोमवारी रात्री झालेली दुर्घटना घडली नसती, असा नाराजीचा सूर व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. पालिकेच्या शहरातील इतरही संकुलांची स्थिती यापेक्षा वेगळी नसल्याने दुरुस्तीसाठी प्रयत्न गरजेचे आहेत.

शॉर्ट सर्किटची भीती
संकुलातीलइलेक्ट्रिक फिटिंगची अनेक ठिकाणी मोडतोड झाली आहे. अनेक ठिकाणी विद्युत प्रवाह सुरू असलेल्या वायरिंग लटकलेल्या स्थितीत आहेत. पालिकेच्या लाइट विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. व्यापाऱ्यांनाच पदरमोड करून काही प्रमाणात डागडुजी करावी लागते. या प्रकाराकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आता शॉर्ट सर्किट होण्याची भीती वाढली आहे.

स्लॅबला लागली गळती
छत्रपतीशिवाजी महाराज व्यापारी संकुलातील छताचे प्लास्टर अनेक ठिकाणी तुटले आहेत. बहुतांश ठिकाणी तर अातील लोखंडी सळयादेखील उघड्या पडल्या आहेत. लोखंडी सळया गंजल्यामुळे स्लॅब कमकुवत होतो. तसेस्लॅब कोसळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पालिकेने संकुलाच्या डागडुजीकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. व्यापारीवर्गातही समस्यांबाबत नाराजी आहे.

सर्वच संकुलांमध्ये समस्या
पालिकेचेकपडा मार्केट, चुडी मार्केट, तार ऑफिस रोडवरील संकुल, स्व. छबीलदास चौधरी व्यापारी संकुल, अण्णा भाऊ साठे संकुल या संकुलांची स्थितीही विदारक आहे. पावसाचे पाणी संकुलांच्या भिंतीत मुरते, यामुळे भिंती कमकुवत होत आहेत. याबाबतही पालिका धोरणात्मक निर्णय घेत नाही. यामुळे आता व्यापाऱ्यांसह या संकुलांत येणाऱ्या ग्राहकांचाही सुरक्षा धोक्यात आली आहे.

आढावा घेतला जाईल
पालिकेच्यासर्व संकुलांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेणार आहे. पालिकेच्या आगामी बैठकीत यासंदर्भात ठराव करण्यात येईल. व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी योग्य ते सर्व निर्णय पालिका घेईल. आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास प्राधान्य देऊ. विजयचौधरी, नगराध्यक्ष, भुसावळ