आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाइट गेल्याचा फायदा घेत २२ सेकंदांत उडवले लाख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वादळी पावसामुळे काही मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित झाल्याचा फायदा उचलत दाेघा चोरट्यांनी २२ सेकंदांत वृद्ध व्यापाऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून पाच लाख रुपये लांबवल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री ७.३० वाजता गुजराती गल्लीत घडली. मेहरूण परिसरातील इकरा उर्दू हायस्कूलच्या मागे राहणाऱ्या जिकर हाजी युसूफ राणानी यांच्यासोबत हा प्रकार घडला. 
 
राणानी यांचे दाणाबाजारात मिठाचे हाेलसेलचे दुकान आहे. शनिवारी रात्री वाजेच्या सुमारास ते दुकान बंद करून दुचाकीने (क्र.एमएच-१९/एव्ही-२४१४) घरी जाण्यासाठी निघाले होते. मिठाई घेण्यासाठी ते साडेसात वाजेच्या सुमारास गुजरात स्वीट मार्ट येथे थांबले. ते दुचाकी लावून दुकानात जात नाहीत तोच अगदी त्यांच्यामागून दोन भामटेदेखील दुचाकीने आले. राणानींची पाठ वळताच एक भामटा त्यांच्या दुचाकीजवळ आला, तर दुसरा स्वत:जवळील दुचाकीवरच बसून राहिला. दुचाकीजवळ आलेल्या भामट्याने खाली बसून डिक्की उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पहिल्या पाच सेकंदांच्या प्रयत्नात त्याला यश आले नाही. त्या वेळी राणानी हे दुकानातच शिरत होते. त्यांच्या पाठीमागेच भामट्याने डिक्की उघडण्याचा प्रयत्न सुरू केला होता. दुसऱ्यांदा प्रयत्न करण्यासाठी चोरटा पुन्हा खाली बसला. या वेळी तो थेट १५ सेकंदांनी उभा राहिला. त्याने खालच्या बाजूने काही तरी छेडखानी करीत डिक्की उघडली होती, तर दुसऱ्या भामट्याने पळ काढण्यासाठी त्यांची दुचाकी सुरू करून ठेवली होती. त्यामुळे पुढील दोन सेकंदातच डिक्कीमध्ये ठेवलेली कापडी पिशवी घेऊन दोघे भामटे चित्रा चौकाच्या दिशेने भरधाव निघून गेले. या कापडी पिशवीत सुमारे साडेचार ते पाच लाख रुपयांची रोकड होती. दरम्यान, या भामट्यांनी केलेली चोरी गुजरात स्वीट मार्टबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. याबाबत राणानी यांनी रात्री जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून माहिती दिली. पोलिसांनी तपासचक्रे फिरवली. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. रात्रीची गस्त घालणाऱ्या पथकांनीदेखील कसून तपास केला. 
घरीगेल्यावर पैसे गेल्याचे कळले : गुजरातस्वीट मार्ट येथून मिठाई खरेदी केल्यानंतर राणानी घरी निघून गेले. घरी गेल्यानंतर त्यांनी पैसे काढण्यासाठी दुचाकीची डिक्की उघडली; परंतु त्या वेळी डिक्कीत पिशवी नसल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. दुकान बंद केल्यापासून ते घरी पोहोचेपर्यंत रस्त्यात काय झाले? याचा विचार त्यांनी केला. गुजरात स्वीट मार्ट येथे थांबल्यावरच पैसे गेल्याचा संशय बळावला. त्यांनी जिल्हापेठ पोलिसांना माहिती देत गुजरात स्वीट मार्ट गाठले. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर घडलेला प्रकार उघडकीस आला. हे फुटेज जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे. 

...तर वाचले असते पैसे 
राणानी यांच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये शुक्रवार शनिवार अशा दोन दिवसांच्या हिशेबाचे पैसे होते. शनिवारी बाजारात रेलचेल जास्त असल्यामुळे कॅशही जास्त होती. मात्र, शनिवारी बँकांना सुटी असल्यामुळे पैसे जमा करता आले नाही. तसेच वादळी पावसामुळे लाइट गेल्यामुळे त्यांनी दुकान बंद करताना पैसे मोजलेदेखील नव्हते. गल्ल्यातील सर्व पैसे पिशवीत भरून ते घराकडे निघाले होते. जर शनिवारी बँक सुरू असती तर कदाचित त्यांचे पैसे वाचले असते. 

माग काढत आले भामटे 
राणानी यांच्या दुचाकीच्या डिक्कीत पैसे असल्याची पक्की माहिती भामट्यांना होती. त्यामुळे ते ज्या दिशेने आले त्याच बाजूने अगदी त्यांच्यामागेच दोघे चोरटे पोहोचले हाेते. म्हणजेच, त्यांनी पूर्णपणे माग काढूनच राणानींना टार्गेट केले होते. शिवाय राणानी दुकानात पूर्णपणे शिरलेलेही नव्हते तोच त्यांनी डिक्की उघडण्याचे कामही सुरू केले होते. यावरून भामट्यांनी नियोजनबद्धरीत्या ही चोरी केल्याचे सिद्ध होत आहे. 

 
बातम्या आणखी आहेत...