Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» News About Theft On Three Houses

जळगाव: समतानगरातील तीन घरांमध्ये चोरी; लग्नाचे पैसे लांबवले

प्रतिनिधी | Mar 20, 2017, 08:45 AM IST

  • जळगाव: समतानगरातील तीन घरांमध्ये चोरी; लग्नाचे पैसे लांबवले
जळगाव -समतानगर परिसरात शुक्रवारी रात्री चोरट्यांनी तीन घरांमध्ये चाेरी केली. यात २३ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, ७०० ग्रॅम चांदी, हजार रुपये रोख असा ९० हजारांचा ऐवज लंपास केला. या चोरीच्या घटनेबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
समतानगरात राहणारे हल्ली पुणे (मुळशी) येथे कामानिमित्त गेलेल्या कैलास हरिचंद्र पवार यांच्या घरातून सोने, चांदीचे दागिने लंपास झाले. तर सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या सुमनबाई श्यामजी सोनवणे यांच्या घरातून हजार रुपयांची रोकड चोरीस गेली. चोरट्यांनी भीमराव मोरे यांच्या घराचेही कुलूप तोडले. पण हे घर रिकामे असल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. पवार हे सेंट्रिंगचे काम करतात. २९ जानेवारी २०१६ रोजी ते पत्नी तीन मुलांसह कामानिमित्ताने पुण्याला गेले आहेत. तेव्हापासून पवार यांचे घर बंद आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री चोरट्यांनी पवारांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी स्वयंपाकघरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करून कपाटाची तपासणी केली. मात्र, चोरट्यांना त्या ठिकाणी काहीच आढळून आले नाही. त्यामुळे त्यांनी धान्यांच्या कोठ्यांची तपासणी करून तेथे ठेवलेले दागिने लंपास केले. चोरट्यांनी पवार यांच्या घरातून ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, ४०० ग्रॅम वजनाची चांदीची पाटली, ३०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दंडातील कडे असा ऐवज चोरला, तर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या भीमराव मोरे यांचेही घर चोरट्यांनी फोडले. मात्र, चोरट्यांना तिथे काही मिळाले नाही. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा सुमनबाई श्यामजी सोनवणे यांच्या घराकडे वळवला. तेथून हजार रुपयांची रोकड गल्ल्यातील चिल्लर लांबवली. शनिवारी सकाळी चोरी झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पवार यांची बहीण चंदाबाई गोविंदा चव्हाण यांनी फोन करून माहिती दिली. त्यानुसार शनिवारी रात्री ११ वाजता पवार हे जळगावात आले. घरफोडीबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी दुपारी सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद भोळे, पोलिस उपनिरीक्षक राजेश घोळवे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
सेंट्रिंग काम करून पै-पै गोळा
पवार कुटुंबीयाने मजुरी, सेंट्रिंग काम करून पै-पै गोळा केली होती. पैसे गोळा करून त्यांनी सोने खरेदी करून ठेवले होते. पवार यांचा मुलगा योगेश मुलगी आशिका यांच्या लग्नासाठी हे सोने खरेदी केले होते. लग्न ठरल्यानंतर सोने मोडून ते पैसे उपयोगात येतील, असा त्यांचा विचार होता. परंतु, चोरट्यांनी पवार यांच्या मुलांच्या लग्नाची गुंतवणूकच चोरून नेली आहे.
परिसरात भुरट्या चोऱ्यांचा उपद्रव
समतानगर परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या आठवड्यात याच भागात एकाच रात्री चार किराणा दुकाने, पानटपऱ्याही चोरट्यांनी फोडल्या होत्या. काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडा-आेरड करून चोरट्यांना दगड फेकून मारले. त्यामुळे चोरटे पसार झाले होते. या भागात पोलिसांनी रात्रीच्या गस्ती वाढवल्या पाहिजे, अशी मागणी हाेत आहे.

Next Article

Recommended