आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दशकांची यशस्वी राजकीय कारकीर्द; सध्या वाचनासह युवावर्गाला मार्गदर्शन हेच बनले शुक्राम पाटील यांचे विश्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाचनात व्यस्त असलेले शुक्राम पाटील. - Divya Marathi
वाचनात व्यस्त असलेले शुक्राम पाटील.
यावल- सलग १७ वर्ष किनगाव खुर्दचे सरपंचपद आणि दोन दशकांपेक्षा अधिक काळ सहकार क्षेत्रातील यशस्वी कारकीर्दीचा विक्रम शुक्राम व्यंकट पाटील (वय ७५) यांच्या नावावर जमा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. मात्र, कालपरत्वे वाढत्या वयोमानामुळे शारीरिक हालचालींवर मर्यादा आल्याने ते सध्या राजकारणापासून अलिप्त आहेत. राजकारणात घराणेशाहीचा बोलबाला असताना पाटील यांनी आपल्या कुटुंबीयांना राजकारण पासून लांब ठेवले आहे. सध्या किनगाव खुर्दमधील धार्मिक कार्यक्रमात सहभाग, युवकांना मार्गदर्शन आणि वाचन हेच पाटील यांचे विश्व आहे. 
 
किनगाव खुर्द (ता.यावल) ग्रामपंचायत सदस्यपदी वयाच्या २१व्या वर्षी शुक्राम पाटील निवडून आले. नेतृत्वगुण आणि संवादकौशल्यामुळे राज्यस्तरावर त्यांची दखल घेतली गेली. माजी मंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील यांनी सुरूवातीच्या काळात काँग्रेसचे काम पाहिले. त्यानंतर काँग्रेस (एस.) आणि नंतर राष्ट्रवादी असा राजकीय प्रवास त्यांनी केला. 
 
विलासरावांनी केला गौरव : 
सलग १७ वर्ष सरपंच म्हणून कामगीरी केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी किनगावात पाटील यांचा सत्कार केला होता. बाजार समिती संचालक, तालुका खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन, फ्रुटसेल सोसायटी संचालक, विकासो चेअरमनपदासह, पिक संरक्षण संस्थेची कारकीर्द त्यांनी गाजवली. सध्या युवकांना मार्गदर्शन आणि वाचन असा त्यांचा दिनक्रम आहे. 
 
 
शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन 
पाटील यांच्या पुढाकाराने तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते किनगावात जिल्हा परिषद उर्दू शाळेचे भूमीपूजन झाले होते. माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांना सुरूवातीच्या काळात शुक्राम पाटील यांची मोलाची साथ लाभली. त्यासोबतच परिसरातील तरूणांना त्यांनी राजकारणासह सहकार क्षेत्रात वेळोवेळी संधी दिली. 
 
माजी पंतप्रधानांसोबत पदयात्रा 
देशाचे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ‘भारत जोडो’ पदयात्रा काढली होती. या पदयात्रेत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये शुक्राम पाटील यांचा समावेश होता. पदयात्रेत त्यांच्याकडे मोठी जबाबदारी होती. 
 
बातम्या आणखी आहेत...