आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३२६ किलोमीटरच्या भूमिगत गटारी; ९० कोटींची तरतूद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - सांडपाणी वाहून नेण्यासाठी शहरातील विविध भागात ३२६ किलोमीटर भूमिगत गटारी बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने शासनाला २१९ कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार शासनाने पहिल्या टप्प्यात या कामासाठी अर्थसंकल्पात ९० कोटींची तरतूद केली असून, तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना महापालिकेला केल्या आहेत. भूमिगत गटारीचे काम झाल्यावर सांडपाण्याचा निचरा होण्याची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. 
शहरातील जुन्या वसाहतींमध्ये सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारी करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे अद्यापही अनेक वसाहतींमध्ये गटारी नाहीत. त्याचबरोबर अनेक भागातील गटारी एकमेकांना जोडण्यात आलेल्या नाहीत. बहुतांश वसाहतींमध्ये सांडपाणी मोकळ्या जागेत सोडल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील काही भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, सांडपाणी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी तुंबून राहत असल्याने नागरिकांचे आराेग्यही धाेक्यात आले आहे. त्याचबरोबर पेठ भागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करता ते थेट पांझरा नदीपात्रात सोडण्यात आल्याने नदी प्रदूषित होत आहे. 

शहरात सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्पच नसल्याने काही महिन्यापूर्वी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने महापालिकेला नोटीस दिली होती. त्यानंतर महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. यूआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत शहरात भुयारी गटार सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे दोन प्रकल्प तयार करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता. तो १९४ कोटी रुपयांचा होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पुन्हा २१९ कोटी रुपयांचा नवीन प्रस्ताव तयार करून तो शासनाला सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाची दखल घेत शासनाने भुयारी गटारीसाठी अर्थसंकल्पात ९० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

या निधीतून शहरात कोणती कामे होतील याचा अहवाल पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या अहवालाला तांत्रिक मंजुरी मिळाल्यावर शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे शहरात पहिल्या टप्प्यात सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प गटारी तयार करण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी जून महिन्यात निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. 

दुसऱ्यांदा मिळेल मोठा निधी 
शहरात भूमिगत गटारी कराव्यात, अशी मागणी सातत्याने होत होती. हा विषय आता मार्गी लागल्याने समाधान व्यक्त होत आहे. पाणी पुरवठा योजनेच्या कामानंतर शहराला प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहे. 

नाल्याचे पाणीही वाहून नेणार 
शहरातीलविविध भागात असलेल्या नाल्यांमधील सांडपाणीही भूमिगत गटारीच्या साह्याने वाहून नेण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यानंतर या पाण्यावर जलशुद्धीकरण प्रकल्पात प्रक्रिया हाेईल. केवळ पावसाळ्यात भूमिगत गटारीतून नाल्याचे पाणी सोडले जाणार नाही. 

दोन शुद्धीकरण प्रकल्प 
शहरातहोणाऱ्या भूमिगत गटारीच्या कामासाठी शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या पांझरा नदीच्या अलीकडे पलीकडे असे दोन भाग करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शहराच्या बाहेर वरखेडी रस्ता कुंडाणे रस्त्यालगत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यातील एका प्रकल्पाची क्षमता ४० तर दुसऱ्या प्रकल्पाची क्षमता १६ एमएलडी असेल. शहरातील सांडपाणी भूमिगत गटारीच्या माध्यमातून या प्रकल्पापर्यंत एकत्रित वाहून नेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

पाच ते दहा फूट खोल गटारी 
शहरातएकूण ३२६ किलोमीटर भूमिगत गटारी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांकडून देण्यात आली. त्यातील बहुतांश गटारी या कमीत कमी पाच ते दहा फुटांपर्यंत खोल असतील. गटारी तुंबणार नाही यादृष्टीने त्या तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी आराखडा तयार करण्यात येईल. 
 
बातम्या आणखी आहेत...