आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हद्दपारी आदेशाचे उल्लंघन; तीन आरोपींना केली अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नियोजनामुळे आरोपी अलगद जाळ्यात फसले. - Divya Marathi
नियोजनामुळे आरोपी अलगद जाळ्यात फसले.
भुसावळ - बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी पहाटे शहरातील विविध भागांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या मोहीमेत शहरातून हद्दपार केल्यानंतरही शहरातच वास्तव्य करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली. २५ पोलिसांच्या दोन पथकांनी सोमवारी पहाटे वाजता केलेल्या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली. 
 
शहरात गेल्या दोन महिन्यांपासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. किरकोळ गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. यामुळे पोलिसांनी आता कारवाईचे सत्र सुरु केले आहे. शहरातील बाजारपेठ पोलिसांनी निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी पहाटे कारवाई केली. या कोम्बिंग ऑपरेशनसाठी २५ पोलिसांचे दोन पथक तयार करण्यात आले होते. पहाटे वाजता बाजारपेठ ठाण्यात पोलिसांच्या पथकांना विशेष कोंबींग ऑपरेशनची माहिती देण्यात आली. गेल्या महिन्यात शहरातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेले तीन जण शहरात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे तिघांना अटक करण्यासाठी ही मोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेत पोलिसांनी श्रध्दानगर भागातून गणेश उर्फ पिंट्या मुरलीधर महाजन, खडकारोड, पटेल कॉलनी भागातील रहिवासी अन्नू उर्फ अरबाज हैदर मलिक दत्तनगर जुना वांजोळारोड भागातील रहिवासी निखिल सुरेश राजपूत या तिघांना अटक केली. हद्दपारीच्या कारवाईनंतरही शहरात वास्तव्य करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. यापुढील काळातही शहरात अशाप्रकारची मोहीम नियमितपणे राबवली जाणार आहे. 

नियम मोडणाऱ्यांवर कारवाई 
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे सत्र सुरू केले जाणार आहे. यासह शहरातील सर्व भागांतील हॉटेल आणि राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल ढाबे रात्री १० वाजेच्या आत बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे. १० वाजेनंतर सुरू असलेले हॉटेल ढाब्यांवर कारवाई केली जाईल. या कारवाईमध्ये पोलिसांना हवे असलेले आरोपी देखील जाळ्यात येतील, अशी अपेक्षा आहे. 

चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर गस्त 
शहरात गेल्या दोन महिन्यांत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. भुरट्या चोऱ्यांमुळे शहरातील विस्तारीत भागांमध्ये भीतीदायक वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आता शहर आणि बाजारपेठ पोलिसांनी गस्त वाढवली आहे. शहरातील विस्तारित भाग आणि अंतर्गत भागात रात्रीच्या वेळी गस्त ठेवणे तसेच १० वाजेच्या आत शहरातील सर्व दुकाने बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. यामुळे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण येणार आहे. 
 
- हद्दपारीच्या कारवाईनंतरही सराईत गुन्हेगार शहरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे सोमवारी पहाटे कोम्बिंग ऑपरेशन राबवून तीन आरोपींना अटक केली. याच प्रकारे बाजारपेठ पोलिसांकडून शहरात निरंतर कारवाई केली जाणार आहे. चंद्रकांतसरोदे, निरीक्षक, बाजारपेठ पोलिस ठाणे 
 
बातम्या आणखी आहेत...