आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुण गवळी व्हायचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणास अटक, मोठा गेम करण्याचा मानस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- धडधाकट शरीरयष्टीचा उपयोग करून मुंबईत फिल्मसिटीत स्टार बाउन्सरची नोकरी करीत असतानाच अरुण गवळी आणि अंडरवर्ल्डच्या गँगस्टर्सप्रमाणे जगायचा निश्चय करून फिल्मी स्टाइलमध्ये लोहारा येथील एका व्यक्तीकडे खंडणी मागणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी जळगावात अटक केली. त्याच्यावर गेल्या महिन्यातच पहूर पोलिस ठाण्यात खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल आहे.
 
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे राहणाऱ्या २१ वर्षीय विशाल आनंदा माळी (काकडे) असे या भामट्याचे नाव आहे. विशाल दिसायला देखणा धडधाकट शरीरयष्टीचा आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वी तो मुंबईत फिल्मसिटीत नोकरी शोधण्यासाठी गेला. त्याला एका अभिनेत्रीच्या सुरक्षा टीममध्ये स्टार बाउन्सरची नोकरी मिळाली. ही नोकरी करीत असताना फिल्मसिटीची हवा त्याच्या अंगात संचारली. चित्रपटांसाठी कथा लिहिण्याचा तो सराव करू लागला. कथा लिहिण्यासाठी विशालने पुणे गाठले होते. येथे मुंबईतले गँगस्टर म्हणून ओळख असलेले अरुण गवळी, दाऊद, छोटा राजन यांच्याबद्दलची माहिती असलेली काही पुस्तके, कात्रणे त्याच्या वाचनात आली. येथूनच त्याने स्वत:चे मनपरिवर्तन करून आपणही गँगस्टर्सप्रमाणे जीवन जगण्याचा निश्चय केला. गैरमार्गाने, खंडणी वसूल करून लोकांकडून पैसे उकळायचे त्यातील काही भाग समाजसेवेसाठी वापरायचा, असे त्याने ठरवले होते. हे करण्यासाठी विशालने सर्वप्रथम खंडणी मागण्याचा निर्णय घेतला. लोहारा येथील भाजपचे कार्यकर्ते शरद सोनार यांना फोन केला. ‘मैंने तेरे को मारने की तीन लाख रुपये की सुपारी ली है... तुझे और तेरे दोनो बच्चों को बचाना है तो मुझे पाच लाख रुपये दे’ अशा टपोरी भाषेत त्याने २३ मार्च रोजी सोनार यांना धमकी दिली. त्यानंतर दिवसातून किमान दोन वेळा तो सोनार यांना फोन करून धमकी देत होता.
 
त्यासाठी त्याने बनावट ओळखपत्र तयार करून नवीन सिमकार्ड खरेदी केले होते. सोनार यांना फोन केल्यानंतर तो मोबाइल बंदच ठेवत होता. सोनार यांनी पहूर पोलिस ठाण्यात त्या क्रमांकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल, उत्तमसिंग पाटील, सुभाषसिंग पाटील, दिलीप येवले, विजय पाटील, नारायण पाटील, राजेंद्र पाटील, बापू पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर, विनय देसले, दीपक पाटील यांच्या पथकाने पाचोरा, पुणे, लोहारा, जामनेर या विविध ठिकाणी शोध घेतला. अखेर रविवारी सकाळी १० वाजता विशालला शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील एका लॉजमधून ताब्यात घेतले. 
 
पोलिसांना गुंगारा देण्यासाठी पुण्याहून दुचाकीने केले पलायन 
वारंवारफोन करून धमकी दिल्यानंतर एलसीबीच्या पथकाने विशालच्या मोबाइल क्रमांकाचे लोकेशन मिळवले होते. शुक्रवारी दुपारी एलसीबीचे पथक लोहारा येथील विशालच्या घरी जाऊन चौकशी करून आले. तो पुण्याला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शुक्रवारी रात्रीच एलसीबीचे पथक पुण्याला रवाना झाले. विशालला सुगावा लागताच त्याने शुक्रवारी रात्रीच दुचाकीने प्रवास करून जळगाव गाठले. दरम्यान, शनिवारी तो पाचोरा येथे थांबला. तेथून सामनेरला येऊन त्याने एक मोबाइल मित्राकडे देऊन घरी देण्यास सांगितले. हा मोबाइल सुरू केल्यानंतर पुन्हा लोहाऱ्याचे लोकेशन डिटेक्ट झाले. शनिवारी सायंकाळी एलसीबीचे पथक पुन्हा लोहाऱ्यात आले; पण तेव्हाही विशाल घरी नव्हता. तसेच मोबाइलबद्दल माहिती घेतली असता, ज्या मित्राकडे त्याने मोबाइल दिला त्याची चौकशी केली. चौकशीअंती विशाल जळगावातील रेल्वेस्थानक परिसरातील लॉजमध्ये थांबल्याचे निष्पन्न झाले. रविवारी सकाळी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. 
 
पोलिसांनी अटक केल्यानंतर विशालला खाक्या दाखवताच त्याने बाउन्सर ते गँगस्टर बनण्याची कहाणी कथन केली. अरुण गवळी व्हायचे असल्याची इच्छा त्याने बोलून दाखवली. हे गँगस्टर्स लोक काहीच काम करता श्रीमंत असतात, समाजसेवा करतात म्हणून मी त्यांना फॉलो करीत आहे. सोनारकडे फक्त पाच लाख रुपये मागितले होते. त्यानंतर मुंबईत ‘मोठा गेम’ करायचा होता, असे त्याने सांगितले. मोबाइल बंद असतानादेखील तुम्ही माझ्यापर्यंत कसे पोहाेचले? असा पोरकट प्रश्नदेखील त्याने पोलिसांना विचारला होता. 
बातम्या आणखी आहेत...