आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे - घोटभर पाण्यासाठी महिलांची झुंबड, जुन्नेरची भयावह स्थिती; पाण्यासाठी जीव धोक्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गावात नळाला पाणी आले की, महिलांची भांडी घेऊन अशी झुंबड उडताना दिसून येते. - Divya Marathi
गावात नळाला पाणी आले की, महिलांची भांडी घेऊन अशी झुंबड उडताना दिसून येते.
धुळे - तालुक्यातील जुन्नेर ग्रामस्थांना पाणीटंचाई आता अंगवळणी पडल्याची स्थिती आहे. सततच्या टंचाईमुळे पाण्यासाठी पायपीट करताना काहींना कायमचे अपंगत्व आले तर काहींचा पाण्याच्या संघर्षात मृत्यू झाला आहे. गावकऱ्यांचे दुर्दैव एवढे की जलयुक्त शिवार अभियानाची कामेही कुचकामी ठरलेली आहेत. या गावालगत बांधण्यात आलेला बंधारा पहिल्याच पाण्यात वाहून गेला आहे. परिणामी टंचाईचे स्थिती जैसे थेच आहे. 
 
शहरापासून २५ ते ३० किलोमीटर अंतरावर असलेले जुन्नेर येथील गावकरी वर्षानुवर्षापासून टंचाईचा सामना करीत आहेत. पाणीटंचाई जणू या गावकऱ्यांच्या नशिबाचाच भाग झाली की काय असा भास होताे. लळिंग पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नेर गावालगतच्या तीन ते चार किलोमीटर परिसरात तीन गावविहिरी खोदण्यात आलेल्या आहेत. दुर्दैवाने या तीनही विहिरी दीर्घकालीन पाणीपुरवठ्यास सक्षम नाहीत. गतवर्षी लळिंग जंगलाच्या परिसरात खोदण्यात आलेली विहीरही कोरडी पडलेली आहे. गावकऱ्यांचे दुर्दैव एवढे की आर्थिक वर्ष २०१६-१७मध्ये जुन्नेर गावाची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड करण्यात आली. 
 
 
गावात नाला खोलीकरणाची कामे नावालाच झाली. बांधबंदिस्तीची कामे निकृष्ट प्रकारची असल्यामुळे पहिल्याच पावसात बांध वाहून गेला. परिणामी पुन्हा जैसे थे परिस्थिती आहे. गत चार वर्षांत पाण्यासाठी पायपीट करताना अनेकांना जीव गमवावा लागला आहे. गतवर्षी पाण्याचे टँकर आल्यानंतर विहिरीवर पाण्यासाठी उडालेल्या झुंबडीत विहिरीत पडून आरती राजू मोरे या मुलीला कायमचे अपंगत्व पदरी अाले आहे. सध्या आरती अंथरुणावर खिळलेली आहे. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशा अनेक आरतींना पाण्यासाठी जीवाची बाजी लावावी लागत आहे.
 
दर दोन, तीन वर्षांनी पाणी योजना राबवण्यात येते. मात्र, नियोजनाअभावी योजना अयशस्वी होऊन पुन्हा टंचाईलाच सामोरे जावे लागते. मार्च महिन्यापासूनच गावासाठी दरवर्षी टँकर सुरू करण्यात येते. या वर्षी अद्याप टँकर नाही. परिणामी तीन ते चार किलोमीटर पायपीट करून गावकऱ्यांना पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे. जेथे माणसांनाच पिण्यासाठी पाणी नाही तेथे गुराढोरांचा प्रश्न तर अधिकच बिकट झालेला आहे. यावर ठोस उपाययोजना करून गावाला कायमस्वरूपी टंचाईमुक्त करण्याची गरज आहे. 
 
जलसंपदा मंत्र्यांनाही साकडे 
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची गावकऱ्यांनी भाजपचे हिरामण गवळी यांच्या माध्यमातून भेट घेतली. गावकऱ्यांनी मंत्री महाजन यांच्याकडे गावाची कैफियत मांडत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केलेली आहे. 
 
हंडाभर पाण्यासाठी तासभर प्रतीक्षा 
गावालगत असलेल्या गावविहिरीने तळ गाठला आहे. विहिरीत पाण्याचे छोटेसे डबके भरलेले आहे. या डबक्यातून परिश्रमपूर्वक तासाभरात हंडाभर पाणी जमा होते. मात्र, असे असले तरी या विहिरीवर गावकऱ्यांची विशेषत: आदिवासी भिल्ल समाजातील महिला, पुरुषांची गर्दी झालेली असते. दरम्यान, दिवस उगवण्यापासून मावळण्यापर्यंत गावकऱ्यांना फक्त पाण्याचाच प्रश्न सतावत असतो. प्रत्येक घरातील दोन सदस्य पाण्याची तजवीज करण्यावर जुंपलेले असतात. धुणे पाण्यासाठी गावालगत असलेल्या विहिरीवर व्यवस्था होते. मात्र पिण्यासाठी पायपीट करावी लागते. 
 
बैलगाडी पाणी वाहतुकीचे साधन 
शेतीच्या कामासाठी गरजेचे साधन असलेली बैलगाडी सध्या जुन्नेर गावात पाणी वाहतुकीचे साधन झालेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या बैलगाडीला ड्रम कायमस्वरूपी बांधले आहेत. सकाळ, सायंकाळ या शेतकऱ्यांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागते. 
 
तात्पुरती पाणीपुरवठा योजना मंजूर
दोन योजना अयशस्वी झाल्यानंतर आता गावासाठी तात्पुरती पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे. तसेच रोजगार हमी योजनेतून विहीर प्रस्तावित आहे. रावेर शिवारातून पाइपलाइन तर महालबर्डी धरणाजवळ विहीर खोदण्याचे गावकऱ्यांनी निश्चित केले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...