आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे - दारू दुकान स्थलांतरापूर्वीच नव्या बांधकामावर महिलांचा हल्लाबाेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोळवले नगरातील बांधकाम बांबूच्या साहाय्याने पाडताना संतप्त महिला. - Divya Marathi
कोळवले नगरातील बांधकाम बांबूच्या साहाय्याने पाडताना संतप्त महिला.
 धुळे - महामार्गावर बंद झालेले दारूचे दुकान उच्चभ्रू वसाहतीत स्थलांतरित होण्यापूर्वीच संतप्त महिलांनी गुरुवारी त्यावर हातोडा टाकला. अनेक दिवसांपासून गुपचूपरीत्या हे बांधकाम सुरू होते. एवढेच नव्हे तर या रणरागिणींनी जिल्हा प्रशासनालाही निवेदन देऊन आपला तीव्र विरोध मांडला. सकारात्मक कार्यासाठी एकत्र आलेल्या या नारीशक्तीला परिसरातील इतर नागरिकांनीही सहकार्य केले. संतप्त नागरिकांचे नेतृत्व नगरसेवक सतीश महाले यांनी केले. 
 
शहरातील मालेगाव रोडला लागून कोळवले नगर ही उच्चभ्रू वसाहत आहे. या वसाहतीला लागून सहजीवन नगर, समता नगर, भोलेबाबा नगर तसेच शासकीय दूध डेअरी परिसर आहे. कोळवले नगरातील रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून बांधकाम सुरू होते. घराचे बांधकाम सुरू असावे याच विचाराने नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले; परंतु सर्व नागरिकांना गाफील ठेवून या ठिकाणी दारू दुकानाचे बांधकाम केले जात होते. ही बाब अधिक काळ लापून राहिली नाही. कर्णोपकर्णी ही गोष्ट कोळवले नगरसह सहजीवन नगर, समता नगर, भोलेबाबा नगर परिसरात पसरली. त्यामुळे महिलांमधील खदखद वाढीस लागली. अखेर गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शेकडो महिला या ठिकाणी एकत्र आल्या. नगरसेवक सतीश महाले त्यांच्या काही सहकाऱ्यांसह या महिलांनी नवनिर्मित दारू दुकानाकडे आपला मोर्चा वळविला. परिसरातील शांतता बाधित होण्यापूर्वीच संतप्त महिलांनी हे बांधकाम पाडले. या रणरागिणी केवळ एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर त्यांनी आपला मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला. या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांना निवेदन देण्यात आले. 
 
या वेळी नगरसेवक सतीश महाले संतप्त महिलांनी आपली भूमिका मांडली. कोळवले नगरातील उद्यानासमोरील जागेत गलाणी हे दारूविक्रीचे दुकान स्थलांतरित करू पाहत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. नागरी वसाहतीत दारू दुकान स्थलांतरणास तसेच नवीन बांधकामास परवानगी देऊ नये असे मतही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर या महिलांनी आपला मोर्चा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे वळवून निवेदन दिले.
 
दरम्यान, या निवेदनावर कोळवले नगर, सहजीवन नगर, समता नगर, भोलेबाबा नगरातील शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत. याबाबत योग्य पाऊल उचलावे अन्यथा संघर्ष समिती स्थापन करून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, बांधकामाबाबत संबंधिताशी सायंकाळपर्यंत संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची भूमिका मात्र कळू शकली नाही. 
 
प्रबोधनानंतर महिला एकत्र 
या परिसरात दारू दुकान होऊ द्यायचे नाही, अशी भूमिका नगरसेवक सतीश महाले यांची होती. बुधवारी कोळवलेनगर, सहजीवन नगर, समता नगर, भोलेबाबा नगर परिसरातून रिक्षा फिरवण्यात आली. दारू दुकानाच्या बांधकामाबाबत माहिती देऊन महिलांना एकजूट होण्याचे आवाहन करण्यात आले. दुपारी तीन ते रात्री नऊ वाजेपर्यंत ही रिक्षा फिरली. याच दरम्यान, महिलांनी दुकानाच्या विरोधात उभे राहण्याचे ठरविले.
 
सामाजिक स्वास्थ्याला घातक 
बांधकाम सुरू असलेल्या या रस्त्यावरून हजारो नागरिकांची वर्दळ असते. याच परिसरातून शीख बांधवांचे पवित्र गुरुद्वारा, सेंट अॅन्स स्कूल, निम्स शैक्षणिक संस्थेकडेही जाता येते. शिवाय जवळच साईबाबा यांचे मंदिरही आहे. तर दुसऱ्या बाजूला नवनाथ महादेवाचे मंदिर आहे. या दुकानामुळे विद्यार्थी मनावरही दुष्परिणाम संभवला असता. शिवाय भाविकांच्या भावनाही दुखावल्या असत्या. दुकानाजवळच मोठे मैदान आणि दाट काटेरी झुडपे आहेत. त्यामुळे मद्यपींनी याच झाडीमध्ये रात्रीच नव्हे तर दिवसाही ठिय्या मांडला असता. 
 
 
फेब्रुवारीपासून हालचाल 
सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५०० मीटरपर्यंत मद्याच्या दुकानांना बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. या आदेशामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील दुकानेही बंद झाली. यात एका वाइन शॉपचाही समावेश होता. दुकान बंद होण्यापूर्वीच संबंधित मालकाने जागेचा शोध सुरू केला. महामार्गापासून जवळ असलेल्या कोळवले नगरात आपल्या एका जवळील नातलगाची जागा घेऊन त्यावर फेब्रुवारीत बांधकाम सुरू करण्यात आले. सुमारे दहा दिवसांपासून या बांधकामाला अधिक गती देण्यात आली होती. महामार्गावर बंद झालेले दुकान या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार होते. 
 
दक्ष नागरिक म्हणून कर्तव्य 
- नागरिकांचा रोष स्वाभाविक आहे. दारूच्या दुकानामुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ्यही बिघडले असते. लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर दक्ष नागरिक म्हणून त्यासाठी पुढे आलो. याच रस्त्यावरून रोज अनेक विद्यार्थी सुशिक्षित नागरिकही जातात. त्यांच्यावरही यामुळे परिणाम झाला असता. असे प्रयत्न इतर ठिकाणीही होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनीही सावध असले पाहिजे. -सतीश महाले, नगरसेवक 
 
 
बातम्या आणखी आहेत...