आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक दिसताच ठिय्याधारी महिलांनी गुंडाळला गाशा; अखेर उठले बिऱ्हाड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - पाच दिवसांपासून महापालिकेच्या प्रवेशद्वारासमाेर ठिय्या देऊन बसलेल्या महिलांची शुक्रवारी बराच वेळ पाेलिसांशी बाचाबाची झाली. अखेर अटकेची तयारी दिसताच महिलांनी अापापला गाशा काखाेटीला मारून काढता पाय घेतला. पाचव्या दिवशी मनपासमाेरील बिऱ्हाड उठलं.
 
यावेळी पाेलिसांसाेबत शाब्दिक चकमकीसाेबत वाद घालणाऱ्यांपैकी एका महिलेने पदर गळ्याभाेवती गुंडाळून गळफासाचाही प्रयत्न केला. या वेळी सगळ्यांची एकच धांदल उडाली. त्यानंतर यशवंतनगर माेहाडीतील घरकुलांमध्ये तात्पुरत्या स्थलांतराला अतिक्रमितांनी हाेकार दिला. सायंकाळी वाजता आंदोलकांचे नेते आनंद बागुल यांनी शीतपेय घेऊन सांगता केली. त्यानंतर मनपासमाेरील मार्ग माेकळा झाला. दुपारपासून मनपाने विस्थापितांसाठी अर्जही दिले होते.
 
शहरातील रेल्वेस्थानक मार्गावरील २४४ घरकुलांचे अतिक्रमण काढल्यानंतर तेथील रहिवाशांनी पाच दिवसांपासून महापालिकेसमोर ठिय्या दिला हाेता. ठिय्या कायम असताना चर्चा सुरू हाेती. त्यात आनंद बागुल, लक्ष्मण जावरे, पवन अहिरे यांनी तीन दिवसांपासून उपोषणही आरंभले होते. तर दुसरीकडे मनपा पोलिस यांनी संयमाने प्रकरण हाताळून आंदोलकांची मनधरणी पाचव्या दिवशीही सुरू ठेवली होती. अप्पर तहसीलदार ज्योती देवरे, उपअधीक्षक हिम्मत जाधव, उपायुक्त रवींद्र जाधव अधिकारी वारंवार आंदोलकांना विनंती करत होते. दुपारी १२ वाजता महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे यांनी उपोषणकत्यांची वैद्यकीय तपासणी केली. तसेच रुग्णवाहिकाही उभी केली. त्याला काहीअंशी विरोधही झाला. त्या वेळीही आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम होते. यानंतर उपोषणकर्ता लक्ष्मण जावरे यांची प्रकृती दुपारी बिघडली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना बळजबरीने वैद्यकीय उपचारासाठी नेले.

रेटरेटी करणाऱ्या महिलांना आरसीपी पथकाच्या महिला कर्मचाऱ्यांनी बाजूला केले. दुपारी तीन वाजेपर्यंत वाटाघाटी चर्चा सुरू होती; परंतु यश मिळत नव्हते. याचवेळी आंदोलकांचे प्रमुख बागुल यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांनाही रुग्णालयात हलवण्यात आले. प्रमुख आंदोलक रुग्णालयात दाखल होऊनही रस्त्यावर बसलेल्या महिला पुरुष मागण्यांवर ठाम होते. त्यामुळे प्रांतांधिकाऱ्यांनी आदेशित केलेले पत्र दाखविण्यात येऊन त्यांची मनधरणी करण्याच पुन्हा प्रयत्न झाला. सायंकाळपर्यंत कारवाईचे आदेश असल्यामुळे निर्णयासाठी दहा मिनिटांचा अवधी देण्यात आला. या वेळी अॅड. विशाल साळवे, अॅड. राहुल वाघ यांनी आंदोलकांची भूमिका मांडली. परंतु, प्रमुख आनंद बागुल यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, पोलिसांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी काही आंदोलकांनी केली. निर्णय आपल्यास्तरावर घ्यावा असे सांगून पोलिसांनी सावध भूमिका घेतली. त्यानंतर पोलिस वाहनातून निवडक दोन आंदोलक बागुल यांचा निर्णय घेण्यासाठी रुग्णालयाकडे रवाना झाले. बऱ्याच वेळानंतरही प्रतिसाद नसल्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांनी आपला ताफा रस्त्यावर लावला. हेल्मेटधारी महिला पोलिस लोंखडी जाळी हाती घेऊन पुढे आल्यात. आंदोलकांच्या सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेट्स त्यांनी बाजूला केले. यानंतर उपोषणकर्ते पवन अहिरे इतर चार जणांना पोलिस वाहनात बसविले. पोलिस आक्रमक होऊन अटकेची कारवाई करत असल्याचे पाहून आंदोलनकर्त्या काही महिलांनी झाशी राणी चौकाकडून काढता पाय घेतला. दरम्यानच्या काळात बागुल यांना घेण्यासाठी गेलेल्यांशीही संपर्क केला जात होता.
 
पोलिसांनी कारवाई थांबवली, विस्थापित यशवंतनगर आणि मोहाडी घरकुलात जातील. बागुल यांच्याशी चर्चा करतो अशी भूमिका महेंद्र निळे बागुल यांनी घेतली. शिवाय उपअधीक्षक हिंमत जाधव यांच्या मोबाइलवरून बागुल यांचे मतही जाणून घेतले. त्यानंतर काही वेळातच पोलिस वाहनातून बागुल दाखल झाले. मूळ मागणी असलेल्या शाळा नंबर २९च्या जागेबद्दल मनपा प्रस्ताव पाठविणार आहे. शिवाय आपल्यास्तरावर प्रयत्न करेल. तोपर्यंत विस्थापितांनी यशवंतनगर मोहाडी येथील घरकुलमध्ये तात्पुरते स्थलांतरित व्हावे. शाळा नंबर २९च्या जागेची मागणी यापुढेही अबाधित राहील. असे लेखी आश्वासन दिले असल्याची भूमिका बागुल अड. राहुल वाघ यांनी सर्वाना सांगितली. त्याला इतरांनीही समर्थन दिल्यानंतर सायंकाळी ठीक सहा वाजता उपायुक्त रवींद्र जाधव, उपअधीक्षक हिंमत जाधव यांच्या हस्ते शीतपेय घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.
 
पोलिसांची तयारी
सकाळपासूनमनपात पोलिसांचा अतिरिक्त ताफा मागवण्यात आला. उपअधीक्षक जाधव, एलसीबीचे निरीक्षक रमेशसिंग परदेशी, धुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, आनंद निकम, दत्ता पवार यांच्यासह सहायक निरीक्षक डी. बी. पाटील, सरिता भांड, वर्षा पाटील, हर्षा जाधव यांच्यासह अनेक अधिकारी नियुक्त होते. मुख्यालयातून वाढीव कुमक व्हॅन मागवण्यात आली. उपोषणाच्या सांगतेनंतर पोलिसांनी ही सुटकेचा नि:श्वास सोडला.
 
रस्ता बंद, पोलिस आक्रमक
सायंकाळी१० मिनिटांचा वेळ देऊनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पोलिसांनी प्रतिबंधात्मक अटकेला सुरुवात केली. या वेळी स्वस्तिक चौक, झाशी राणी चौक, कराचीवाला चौकपासून मनपाकडे येणारी वाहतूक वळविण्यात आली. त्यासाठी शहर वाहतूक शाखेतून १५ कर्मचारी अतिरिक्त बोलावण्यात आले. वेळोवेळी नागरिकांनाही रागवून पिटाळून लावण्यात आले.
 
शाब्दिक चकमक
अप्परतहसीलदार श्रीमती देवरे, उपअधीक्षक जाधव हे बागुल यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले. दुपारी पोलिसांची तयारी सुरू होताच आंदोलक एका महिलेने रक्त दिल्याशिवाय घर मिळणार नाही. तुमची तर आमचीही तयारी, असे संबोधून जवळ पडलेल्या विटा हाती घेण्याचा प्रयत्न केला. नंतर पोलिसांनी त्या बाजूला नेऊन ठेवल्या. दुपारी सव्वा चार वाजता उपअधीक्षक जाधव यांनी प्रांतधिकारी यांचे पत्र दाखविले. बागुल यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना उपचाराची गरज होती. मात्र, यानंतरही कोणी ऐकत नसेल तर बांधून न्यायचे का ? अशा शब्दात ठणकावले. मध्यस्थीसाठी निळे बागुल यांनी हस्तक्षेप केला. परंतु बागुल यांनी पुन्हा घूमजाव केला. तर असा प्रश्न उपअधीक्षक जाधव यांनी उपस्थित केला. त्यानंतर उपोषणाची सांगता झाली.
 
बातम्या आणखी आहेत...