आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल, अमळनेरातही भामट्याने पळवले पैसे, वेगवेगळ्या माहितीच्या आधारे गुंतवून फसवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- बँकामध्ये रेकी करून वृद्धांना गंडा घालत पैसे पळवणाऱ्या कांचननगरातील भामट्याने यावल अमळनेर शहरातील लोकांनाही लुबाडले असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. कांचन नगरातील डिगंबर कौतिक मानकर याला शनिपेठ पोलिसांनी एप्रिल रोजी अटक केली होती. जामनेर येथील एका बँकेत रेकी करून त्याने एका वृद्धाकडून १२ हजार रुपये घेऊन पोबारा केला होता. ‘मी सुमनबाईंचा नातू’ असल्याची बतावणी करून तो ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर वृद्ध व्यक्तींना वेगवेगळ्या माहितीच्या आधारे गुंतवून त्यांच्याकडून पैसे उकळतो. उधारीच्या नावाने घेतलेले हे पैसे काही वेळेतच परत करण्याचे सांगून तो पोबारा करीत असतो. जामनेर येथील घटनेच्या दिवशी संबंधित बँकेतून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने त्याचा फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्याच आधारावर शनिपेठ पोलिसांनी त्याला अटक केली होती. पोलिस चौकशीत त्याने जामनेरसह यावल अमळनेर तालुक्यात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या अटकेच्या बातमीनंतर विदगाव येथील शेतकरी जळगावात येऊन चौकशी करून गेला आहे. त्याने मानकरचा फोटो ओळखला आहे. आपली फसवणूक करणारा हाच असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. मानकर सध्या जामिनावर मुक्त झाला असून यावलच्या गुन्ह्यात त्याला पुन्हा अटक करण्यात येणार आहे. 
 
भोळेपणाचा आव आणून फसवणूक 
मानकर हा बँक, बाजारात रेकी करीत असताना अत्यंत भोळेपणाचा आव आणतो. त्याच्याकडे असलेल्या पिशवीत बिस्किटाचा पुडा, पाण्याची बाटली असते. कोणाची फसवणूक करायची हे निश्चित झाल्यानंतर तो त्या व्यक्तींना पाणी, बिस्कीट खायला देऊन जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आपली काळजी घेत असल्याचे जाणीव समोरच्याला झाली की, मानकर लागलीच ओळख दाखवून कोणत्या ना कोणत्या बहाण्याने पैशांची मागणी करतो. काही मिनिटांसाठी उधारीवर घेतलेले हे पैसे घेऊन तो पोबारा करीत असतो. अशी माहिती शनिपेठ पोलिसांनी दिली आहे. 
 
बैलजोडी विकल्याचे ४० हजार लांबवले 
गेल्या महिन्यात विदगाव येथील शेतकऱ्याने यावलच्या बाजारात ४० हजारात बैलजोडी विकली होती. त्याच्या हातात ४० हजार रुपये पाहून मानकरने त्या शेतकऱ्यासोबत गप्पा मारल्या. ‘मी सुमनबाईंचा नातू’ असल्याचे सांगून त्या शेतकऱ्याकडून काही मिनिटांसाठी ४० हजार रुपये उधार घेतले. त्यांना एका ठिकाणी थांबायचे सांगून मानकरने पोबारा केला होता. याचप्रमाणे अमळनेर शहरात कुलर विक्रीच्या दुकानासमोर एका व्यक्तीकडून अशाच प्रकारे हजार मानकरने पळवले आहेत. या दोन्ही गुन्ह्यात तो संशयित असून संबंधितांनी त्याचा फोटो पाहून ओळखलेे. त्यामुळे पोलिस मानकरचा शोध घेत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...