आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलच्या उर्दू हायस्कूलमध्ये सर्रास कॉपी, कॉपीप्रकरणी केंद्र प्रमुखाला शो-कॉज नोटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल - येथील जाकीर हुसेन उर्दू हायस्कूलमध्ये गुरूवारी उर्दूच्या पेपरला सर्रास कॉपी झाली होती. माध्यमांमधून हा प्रकार चव्हाट्यावर येताच शिक्षण विभागाने केंद्र प्रमुखास कारणे दाखवा नोटीस बजावत तत्काळ खुलासा देण्यास सांगितले आहे. यानंतर एसएससी बोर्डाचे सचिव आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार पुढील कारवाई होईल, असे संकेत आहेत.
 
गुरुवारी दुपारच्या सत्रात इयत्ता बारावीचा उर्दूचा पेपर होता. त्यात शहरातील जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल परीक्षा केंद्रात सर्रास कॉपी चालली. परीक्षा केंद्र आवारात मोबाईलला बंदी असली तरी चक्क केंद्र प्रमुखांच्या शेजारी बसूनच काही लोक खुलेआम मोबाइलचा वापर करत होते. 
एवढेच नव्हे तर काही बाहेरील व्यक्ती एकाच बेंचवर बसून विद्यार्थ्यांचे पेपर सोडवत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. एवढे होवूनही केंद्र प्रमुखांनी असा कोणताही प्रकार होत नसल्याचे सांगून साळसूदपणाचा आव आणला होता. मात्र, याविषयीचे सचित्र वृत्त प्रसिद्ध होताच शिक्षण विभागात खळबळ उडाली.
 
 शुक्रवारी यावलचे गटशिक्षण अधिकारी एजाज शेख यांनी केंद्रप्रमुख प्रा. रहिम रजा यांना कारणे दाखवा नोटीस बजावून तत्काळ खुलासा देण्याचे आदेश दिले. हा खुलासा माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि एसएससीच्या विभागीय सचिवांकडे पाठवण्यात येईल. यानंतरच कारवाईची दिशा ठरेल असे गटशिक्षण अधिकारी शेख यांनी सांगितले. परिणामी पुढील घडामोडींकडे तालुक्याच्या शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागून आहे. 
 
- यावलमधील संबंधितकेंद्राविषयी अद्यापपावेतो माझ्यापर्यंत अहवाल आलेला नाही. मात्र, केवळ यावलच नव्हे, तर कोणत्याही केंद्रावर कॉपी किंवा अन्य गैरप्रकार होत असतील, तर नियमानुसार कारवाई होईल. यावलमधील प्रकाराची माहिती घेऊ. राजेंद्रमारवाडी, सचिव, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण बोर्ड, नाशिक 
 
केंद्र प्रमुखामुळे मनस्ताप 
नॅशनल एज्युकेशन सोसायटी परिसरातील प्रतिथयश शैक्षणिक संस्था आहे. अतिशय स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले हाजी ताहेर शेख संस्थाध्यक्ष, तर माजी नगरसेवक अताउल्ला खान चेअरमन आहेत. मात्र, केवळ केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापकांच्या ‘प्रतापा’मुळे या सर्व मंडळींना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी ते केंद्रातील गैरप्रकार रोखण्यासाठी पुढाकार घेतील का? याकडे शहराचे लक्ष आहे. 
 
पालक म्हणतात हे थांबवा... 
अनेक पालक मोलमजुरी करून आपल्या मुलांना शिकवतात. मात्र, परीक्षा केंद्रांवर जबाबदार व्यक्तीच्या डोळ्यांसमोरच कॉप्यांचा सुळसुळाट होणे म्हणजेच पाणी कुठेतरी मुरते, याचे द्योतक आहे. काही विशिष्ट लोक सत्ता आणि ताकदीचा दुरुपयोग करून जवळच्या विद्यार्थ्यांसाठी नसती उठाठेव करत असले तरी प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्यांचे मनोधैर्य त्यामुळे खालावते. त्यामुळे कॉप्यांचा प्रकार रोखायला हवा, अशी प्रतिक्रिया सूज्ञ नागरिकांमधून उमटत आहे. 
 
पुढील स्लाईडवर सविस्तर बातमी वाचा.... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...