आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 लाख वारकऱ्यांनी घेतले संत मुक्ताईंचे दर्शन, महाशिवरात्रीच्या गर्दीचा उच्चांक प्रथमच मोडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीन मंदिराच्या आ‌वारात भाविकांनी फुगड्या खेळून आनंद लुटला. - Divya Marathi
नवीन मंदिराच्या आ‌वारात भाविकांनी फुगड्या खेळून आनंद लुटला.
मुक्ताईनगर - महाशिवरात्रीला झालेल्या गर्दीचा उच्चांक मोडत २० जुलैला गुरुवारी आषाढ भागवत एकादशीनिमित्त सुमारे दोन लाख भाविकांनी आदिशक्ती संत मुक्ताईचे दर्शन घेतले. यासाठी कोथळी, मुक्ताईनगर आणि मेहुण येथील मंदिरात दिवसभर भाविकांची रिघ लागली होती. 
 
गुरुवारी पहाटे जुने कोथळी मंदिरात वढोदा येथील महादेवराव धुरळे यांनी सपत्नीक महापुजा केली. नवीन मंदिरात संस्थानचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांना महापुजेचा मान मिळाला. महापुजा सुरू असल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. कोथळी मंदिरात सुमारे अडीच किलोमीटर अंतराची दर्शनबारीची रांग लागली होती. सुमारे दहा दिंड्यांचे आगमन झाल्याने टाळ-मृदुंग आणि भजन-कीर्तनाच्या मंजूळ स्वरांनी परिसर दुमदुमला. हेच चित्र असलेल्या नवीन मंदिरातदेखील दर्शनबारीच्या सहा रांगा होत्या.
 
दरम्यान, कोथळी मंदिरात अशोक पाटील (टाकळी, ता.जामनेर) रमेश वाणी (वाकडी, ता.जामनेर) यांच्याकडून, तर नवीन मंदिरात मंदिरात संस्थानतर्फे भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. शुक्रवारी वासुदेव न्हावकर (बोदवड) यांच्याकडून कोथळी मंदिरात महाप्रसादाची व्यवस्था केल्याचे व्यवस्थापक उद्धव महाराज जुनारे यांनी सांगितले. तर नवीन मंदिरात एकादशीनिमित्त विशाल महाराज खोले यांचे कीर्तन होईल, असे रवींद्र हरणे, ज्ञानेश्वर हरणे यांनी सांगितले. दिवसभर डीवायएसपी सुभाष नेवे, निरीक्षक अशोक कडलग यांनी बंदोबस्त ठेवला. 
 
७० दिंडी स्पर्धकांची नोंद : आषाडीवारीनिमित्त पंढरपूरला गेलेली मुक्ताई पालखी २९ जुलैला पुन्हा मूळ स्थानी म्हणजे मुक्ताईनगरात परत येणार आहे. यानिमित्त आगमन सोहळा उत्सव समितीतर्फे भव्य वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आतापर्यंत पुरुष गट ३०, महिला गट २५ आणि बालगटातून १५ वारकरी मंडळांनी नोंदणी केली आहे. 
 
मुक्ताई दर्शनानंतरच होते आषाढी वारी सफल 
 - सन १९८१पासूनपंढरीची वारी करतो. आषाढीला पांडुरंगाचे दर्शन घेतल्यावर भागवत एकादशीला संत मुक्ताई चरणी माथा टेकवतो. यानंतरच पंढरपूरवारी सफल होते, अशी अनेक शतकांपासूनची धारणा आहे.
महादेव खोडके, भाडगणी, ता.मलकापूर 
 
- गेल्या २३ वर्षांपासून पंढरीची पायी वारी करतो. त्यात येणारे अनुभव शब्दात वर्णन करता येण्यासारखे नाही. त्यासाठी प्रत्येकाने जीवनात एक तरी वारी अनुभवावी. भक्ती, शिस्त अन् नियोजनाची अनुभूती घ्यावी.
नामदेव महाराज वाघ, नेहता, ता.रावेर 
 
पुढील स्लाइडवर वाचा, चिखल तुडवत काढला मार्ग... 
बातम्या आणखी आहेत...