आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी इम्पॅक्ट: रातोरात काढले पोस्टर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या जाहिरातींवरील कर वाचवण्यासाठी प्रमुख रस्त्यांवरील दुभाजक आणि पालिकेच्या कचराकुंड्यांचा वापर सुरू असल्याकडे ‘दिव्य मराठी’ने लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत पालिका प्रशासनाने संबंधितांवर शहर विद्रुपीकरणांतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
उन्हाळी सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण, इंग्लिश स्पीकिंग क्लासेसच्या जाहिराती करून पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत चटकन पोहोचवण्यासाठी पोस्टरचा वापर केला जातो. त्यानुसार शहरातील प्रमुख चौक, सार्वजनिक मालमत्तांच्या भिंती, पालिकेच्या कचराकुंड्या, एमएसईबीच्या फ्यूज डीपी आदीवर या जाहिराती लावण्यात आल्या आहेत. याकडे ‘दिव्य मराठी’ने लक्ष वेधताच पालिका प्रशासनाच्या जाहिरात करवसुली विभागातर्फे सोमवारी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्यात संबंधित जाहिरातदारांनी पालिकेत जाहिरात कराचा भरणा केला असल्याच्या नोंदी आढळून आल्या नाहीत. त्यामुळे करवसुलीसह शहर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली पालिकेतर्फे सुरू झाल्या आहेत. याबाबत केवळ स्वातंत्र्य चौकातच नव्हे, तर शहरातील इतर प्रमुख चौकांमध्येही पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विनापरवानगी जाहिराती लावणाऱ्या इतर जाहिरातदारांवरही कारवाईची दाट शक्यता आहे.

परवानगी घेतलेली नाही
- स्वातंत्र्य चौकात जाहिरात-पोस्टर्स लावणाऱ्यांनी परवानगी घेतल्याच्या नोंदी आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे त्या चौकातून पोस्टर्स काढले आहेत. त्यामुळे शहर विद्रुपीकरणांतर्गत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करू.
टी. के. पवार, वसुली अधिकारी, पालिका
जाहिरात विभागाला दिले आदेश
- संबंधिताने जाहिरात-पोस्टर्स लावण्यासाठी परवानगी घेतली आहे किंवा नाही, याची पडताळणी करून कारवाई करावी, असे आदेश जाहिरात करवसुली विभागाला देण्यात आले आहेत.
प्रदीप जगताप, उपायुक्त