जळगाव- 'लिव्ह इन रिलेशनशिप'सारख्या पाश्चात्य संस्कृतीचे सर्रास अनुकरण करणार्या भारतीय तरुणाईला मराठमोळ्या एका तरुणाने आदर्श ठेवला आहे. त्याने सातासमुद्रापार भारतीय संस्कृतीचा ठसा उमटवला आहे.
न्यूयॉर्कमधील कोलंबिया येथे राहणारी डियाना रोजस आणि जळगाव शहरातील श्रद्धा कॉलनी राहणारा राजू जगन्नाथ नेवे यांचा विवाह बुधवारी भारतीय वैदीक पद्धतीने पार पडला. विवाह समारंभातील आंतरपाठ, घोडा, वरात, नवरीची वेशभूषा, मंगलाष्टक या सगळ्याच बाबींचे तिला अप्रुप वाटत होते.
एका प्रेमाची गोष्ट...
राजू सॉफ्टवेअर डिझाइनर आहे. नोकरीनिमित्त राजू चार वर्षांपासून कोलंबियात आहे. कोलंबियामध्ये राजू आणि डियाना पहिल्यांदा भेटले. दोघांमध्ये चांगली गट्टी जमली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही कळले नाही. दोघांनी विवाह करायचे ठरवले आणि तोही भारतीय रुढीपरंपरेने करायचे ठरयले. राजू आणि डियाना यांच्या या विवाहाला राजूच्या घरातून विरोध झाला नाही हे विशेष...
विशेष म्हणजे डियाना ही भारतीय रिती-रिवाज शिकण्यासाठी 1 ते 15 जानेवारी 2014 दरम्यान नेवे यांच्या घरी येऊन राहिली होती. या कालावधीत तिने लग्नाचे प्रकार जवळून बघितले. स्वयंपाक करायला शिकली. मराठीत बोलण्याचाही प्रयत्न केला. विशेष म्हणजे आता ती थोडे मराठीही बोलून घेते. 15 दिवसांच्या नेवे कुटूंबियाच्या सहवासानंतर तिने लग्नाला होकार दिला. लग्न भारतातच आणि भारतीय पद्धतीने करण्याचा तिचा मानस होता. बुधवारी तो पूर्ण झाला. दुपारी 1 वाजेच्या सुमारास हॉटेल रॉयल पॅलेस येथे हा लग्न सोहळा पार पडला. मात्र, डियानाच्या कुटूंबातून ती एकटीच या सोहळ्याला उपस्थित होती. यावेळी नेवे परिवारासह नातेवाइकांची उपस्थिती होती.
मंगलाष्ठकांचा अर्थही डियाना हिने समजून घेतला. भारतीय पद्धतीने लग्नाची तयारी, त्यानंतर नवरदेव घोड्यावर बसून मंडपात येणे, ब्राह्मणाकडून मंगलाष्टक हे सारे डियानाला अप्रुप वाटत होते. मंगलाष्टक सुरू असताना चौरंगावर उभी असलेली डियाना प्रत्येक सेकंदाला होणारा राजूकडून समजून घेत होती. आरतीचे ताट, फुलमाळा, अक्षता हे सारे काही तिच्यासाठी नवीन होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, डियाना आणि राजूच्या विवाहाची छायाचित्रे...