आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज दरवाढीनंतर आता रात्रीच्या भारनियमनाचा शॉक ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - वीज वितरण कंपनीने सर्वसामान्यांना दरवाढीचा शॉक दिला आहे. या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच पुन्हा सुधारीत नियमानुसार मंगळवारपासून फीडरनिहाय भारनियमन होणार आहे. या निर्णयामुळे भुसावळ शहरात पुन्हा रात्री 7 ते 10 वाजेदरम्यान वीज गुल होईल. यामुळे शहरातील काही भागात वीजपुरवठा बंद होवून अंधार असेल. तर दुसर्‍या भागात उजेड राहणार आहे. ही विषमता राजकीय पुढार्‍यांची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

मध्यंतरी फीडरनिहाय भारनियमन करण्याचा निर्णय घेण्यात आला. फीडरनिहाय भारनियमानामुळे शहरातील ‘इ’ झोनमध्ये असलेल्या 11 केव्ही भुसावळ टाउन फीडरचा भाग एफ झोनमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. ग्रुप बदलल्याने या फीडरवर दिवसभरातील तब्बल सात तासांचे भारनियमन होणार आहे. 11 केव्ही भुसावळ एक्सप्रेस वन आणि 11 केव्ही भुसावळ सिटी फीडर हे सुद्धा ‘इ’झोनमध्ये आहेत.‘इ’झोनच्या फीडरनिहाय निकषांमध्ये रात्रीच्या भारनियमनाचा उल्लेख आहे. यामुळे भुसावळातही रात्रीचे भारनियमन पुन्हा सुरू होणार आहे. यापूर्वी 2 मेपासून राज्यात नवीन भारनियमन वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात आली होती. रात्री 7 ते 10 वाजेदरम्यान भारनियमन होत असल्याने शहराच्या बाजारपेठेवर विपरित परिणाम झाला होता. या संदर्भात व्यापारी असोसिएशनने आमदार संजय सावकारे यांना साक डे घातले होते. आमदारांनीही वरिष्ठ पातळीवर जोर लावून रात्रीचे भारनियमन बंद करण्यात यश मिळविले. यानंतर आता शहरातील वीज गळतीचे प्रमाण कमी झाले आहे. असे असतानाही फीडरनिहाय पद्धतीने काही भाग भारनियमनमुक्त तर काही ठिकाणी सात तास भारनियमन होवून विषमता वाढणार आहे.
इन्फ्रारेडमुळे फायदा ?
शहरातील एक्सप्रेस वन आणि दोन हा भाग भारनियमनमुक्त होण्याचे संकेत आहेत. सध्या वीज वितरण कंपनीने शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्ड, राम मंदिर वॉर्ड, गंगाराम प्लॉट आदी भागात इन्फ्रारेड वीज मीटर बसविले असल्याने परिसरातील वीज गळती कमी झाली आहे. यामुळे फीडर- निहाय भारनियमन झाल्यास वीज गळती कमी असल्याने, या भागाला दिलासा मिळेल, अशी प्राथमिक शक्यता आहे. मात्र, याबाबतचा निर्णय 21 ऑगस्टनंतरच होणार आहे. असे झाल्यास इन्फ्रारेड मीटर बसविण्याची मोहीम पुन्हा तीव्र होईल.
रात्रीचे भारनियमन - शहरातील काही भागात वीजचोरीचे प्रमाण अंत्यत कमी आहे. या भागात ऑगस्टअखेरचा आढावा आल्यावर भारनियमन कमी होणे शक्य आहे. शहरात गळती अजून कमी झाल्यास रात्रीचे भारनियमनही कमी होणार आहे. रमजान महिन्यामुळे या निर्णयावर अंमलबजावणी तूर्त स्थगित आहे. मात्र, 21 ऑगस्टपासून नियमित भारनियमन होईल. मनोज त्र्यंबके, कार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, भुसावळ
गळती कमी होवूनही त्रास वाढणार - वीज बिलांच्या वसुलीत 96 ते 98 टक्केवसुली होते. मात्र, विजेची गळती 40 ते 41 टक्क्यांपर्यंत होती. यामुळे वीज भारनियमन वाढले होते. शहरातील विविध भागात बसविण्यात आलेले इन्फ्रारेड मीटर आणि वीजचोरीच्या धडक कारवाईमुळे गळती 26 ते 30 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. यामुळे शहरातील भारनियमनही कमी होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, रात्रीचे भारनियमनही वाढणार असल्याने गळती कमी होवूनही उपयोग होणार नाही.