आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात होत आहे छुप्या पद्धतीने पोपटांची विक्री, नऊ पोपटांची केली सुटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सुभाष चौकातील भवानी माता मंदिर परिसरात पोपट विक्री करणाऱ्या महिलेच्या ताब्यातील पोपटांची सुटका वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता केली. पाेपटाच्या सुटकेसाठी अालेल्या सदस्यांना पाहून महिलेने पळ काढला होता. गेल्या वर्षी दोन वेळा हीच महिला पोपट विक्री करताना आढळून आल्याचे पक्षीमित्र वासुदेव वाढे यांनी सांगितले.

सुभाष चाैकात एक अनोळखी महिला पोपट विक्री करत असल्याची माहिती मंगळवारी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांना मिळाली. यावरून संस्थेचे वासुदेव वाढे, ऋषिकेश राजपूत आणि बाळकृष्ण देवरे हे घटनास्थळी दाखल झाले हाेते. वाढे यांना पाहून पाेपट विक्री करणाऱ्या महिलेने घटनास्थळावरून पळ काढला. वाढे यांनी महिलेच्या ताब्यातील पोपटांची सुटका करून त्यांना एका झाडावर सोडले.

ती महिला कांचननगरातील असल्याचा संशय
वाढे यांनी गेल्या वर्षी दोन वेळा याच महिलेला पोपट विक्री करताना पकडण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही वेळा महिला पळून गेली हाेती. दरम्यान, ही महिला कांचननगरातील असल्याचा संशय अाहे. शहरात परिसरातील जंगलात जाळे लावून पोपट पकडले जातात किंवा झाडांच्या ढोलीतून पोपटांची पिले चोरून नंतर त्यांची विक्री केली जात असल्याचा संशय वाढे यांनी व्यक्त केला आहे.

वनविभाग संस्थेला मदत करणार
घटना घडल्यानंतर संस्थेच्या सदस्यांनी वनाधिकारी सिंग यांच्याकडे तक्रार केली आहे. या वेळी त्यांनी यापुढे संस्थेच्या सोबत वनविभागाचे कर्मचारी पाठवून महिलेला ताब्यात घेऊ असे सांगितले.
छुप्या पद्धतीने विक्री
पाेपट विक्री करणारी महिला दुकान, रहिवासी भागांमध्ये जाऊन कुणाला पोपट हवे आहेत काय? अशी विचारणा करते. त्यानंतर ती इच्छुकांकडे पोपट घेऊन जाते. ३०० ते ५०० रुपये जोडी प्रमाणे ती पोपटांची विक्री करते.

कायद्याला झुगारून पोपट खरेदी-विक्री
पोपटविक्री करणाऱ्यांसह खरेदी करणारेही दोषी असतात, असे कायद्यात म्हटले आहे. मात्र, कायदा झुगारून शहरात छुप्या पद्धतीने पोपटांची विक्री होत आहे.