आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Niradhar Mahila Yojna Tahsildar Arrested For Sexual Harassment

शिवसेनेच्या महिलांचे धुळ्यात ‘दुर्गारूप’; लंपट तहसीलदाराला विवस्त्र करून बदडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - सरकारी योजनांचा लाभ निराधार, गरजू महिलांना देताना एका ‘सही’चा मोबदला म्हणून शरीरसुखाची मागणी करणार्‍या धुळ्याच्या 57 वर्षीय तहसीलदाराचा शिवसेनेच्या महिला पदाधिकार्‍यांनी गुरुवारी भंडाफोड केला. एवढेच नाही तर संतप्त महिला व शिवसैनिकांनी विवस्त्र करून बेदम मारहाण करत त्याची थेट जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत धिंड काढली. ईश्वर राणे असे या विकृत तहसीलदाराचे नाव असून ‘मी प्रेमाचा भुकेला आहे’, ‘प्रेमाने सर्व कामे होतात’, ‘प्रेम दे, काम घे’ असे म्हणत तो शरीरसुखाची मागणी करत होता. शहर पोलिसांत भादंवि 383, 384, 554, 166, 509 कलमान्वये गुन्हा दाखल करून अधिकार्‍याला अटक करण्यात आली.

असे घडले स्टिंग ऑपरेशन
एका विधवा महिलेचे प्रकरण मंजूर करण्यासाठी राणे याने तिच्या नातीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. 2011 पासून हे प्रकरण त्याने प्रलंबित ठेवले होते. शिवसेना महिला आघाडीच्या शहर संघटक हेमलता हेमाडे यांनी या प्रकरणी स्टिंग ऑपरेशन करण्याचे ठरवले. संबंधित तरुणी तयार असल्याचे सांगून 13 जून रोजी राणेला आविष्कार कॉलनीतील एका घरी बोलावण्यात आले. त्या ठिकाणी आधीच छुपा कॅमेरा बसवण्यात आला होता. राणेने अतिप्रसंग करू नये म्हणून दाराच्या आड एका तरुणाला उभे करण्यात आले होते. घरात आल्यावर राणेने सही करण्यासाठी रोख रक्कम घेतली. ती मोजून स्वत:कडे ठेवून घेतल्यानंतर त्याने तरुणीला जवळ ओढून घेत तिच्याशी चाळे सुरू केले.मोबाइलमधील अश्लील फिल्मही दाखवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात दाराआड लपलेला तरूण बाहेर आला. त्यामुळे राणे पळून गेला.

गुरुवारी हाती लागला
नायब तहसीलदार राणे गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दिसला. माहिती मिळताच शिवसेना पदाधिकारी दाखल झाले. तेथेच जबर मारहण करून त्याचे कपडे फाडण्यात व काढण्यात आले. संपूर्ण विवस्त्रावस्थेतच त्याला जिल्हाधिकार्‍यांसमोर नेण्यात आले. हा अधिकारी हाती लागला नसता तर स्टिंगमधील व्हीडीओच्या आधारे त्याच्याविरुद्ध पोलिसांत फिर्याद देण्याचे ठरले होते, असे शिवसेनेचे भुपेंद्र लहामगे यांनी सांगितले.

आजीचे काल झाले निधन
ज्या विधवा महिलेच्या कामासाठी तिच्या नातीकडे राणे शरीरसुखाची मागणी करत होता, त्या विधवेचे 26 जून रोजी निधन झाले. योजनेचा लाभ मिळण्यासाठी 2011 पासून त्या पाठपुरावा करत होत्या. परंतु अखेर तो त्यांना मिळालाच नाही.