आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Niradhar Mahila Yojna Tahsildar Ishwar Rane Arrested For Sexual Harassment

महिलांचे लैंगिक शोषण थांबविण्यासाठी केले स्टिंग ऑपरेशनचे धाडस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - मी गरिबी पाहिली आहे. सकाळच्या चहा, दुधापासून तर रात्रीचे जेवण मिळवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात, हे मला माहीत आहे. माझ्या परिसरातील गोरगरीब महिलांना न्याय मिळावा, त्यांचे होणारे शोषण थांबावे म्हणून मी स्वत: एका आर्थिक दुर्बल तरुणीला तिच्या इच्छेने सोबत घेऊन शरीरसुखाची मागणी करणार्‍या लंपट, नालायक नायब तहसीलदार ईश्वर राणे याचे वाचाळ चाळे ‘स्टिंग ऑपरेशन’ करून जगासमोर आणले. आता प्रशासन, शासनाने राणेसह त्यात सहभागी अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या उपशहरप्रमुख हेमलता विजय हेमाडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केली.

संजय निराधार योजनेचे प्रकरण मंजूर करून देण्यासाठी गरीब, विधवा, परित्यक्ता महिलांच्या असहायतेचा फायदा घेऊन लैंगिक छळ करणार्‍या नायब तहसीलदाराविरुद्ध तक्रार करण्यास कुणी पुढे येत नव्हते, आम्हीही तक्रारी केल्या ; पण सर्वच पुरावे मागत होते. त्यामुळे या लंपट नायब तहसीलदाराला असे वाटत होते की, त्याचे कुणीच काही करणार नाही. त्यामुळे मी शिवसेना पदाधिकारी आणि महिला पदाधिकार्‍यांना विश्वासात घेऊन हे स्टिंग ऑपरेशन केले. स्टिंग ऑपरेशन का आणि कसे केले याची माहिती शिवसेनेच्या महिला पदाधिकारी हेमलता हेमाडे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली


हेमांडेंचा ‘दिव्य मराठी’शी संवाद..
प्रश्न : नायब तहसीलदार ईश्वर राणे यांच्याकडे आपले कोणत्या योजनेच्या प्रस्तावाचे प्रकरण प्रलंबित होते?
ईश्वर राणे हा संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार म्हणून काम पहात आहे. या योजनेंतर्गत विधवा, परित्यक्ता महिलांसाठी शासनाच्या आर्थिक लाभाच्या योजना आहेत. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून मी माझ्या परिसरातील पंचवीस गरीब महिलांचे प्रकरण 2011 पासून मंजुरीसाठी टाकले आहे. ते मंजूर करण्यासाठी अनेकवेळा कार्यालयात फेर्‍या मारल्या, आज या, उद्या या असेच तो सांगत राहिला.

प्रश्न : मग कुणाकडे तक्रार केली?
गरीब महिलांचे प्रकरण मंजूर करीत नाही, असे मी शिवसेनेच्या आमच्या पदाधिकार्‍यांना सांगितले. मी एका राजकीय पक्षाची पदाधिकारी असून, मला दाद देत नाही तर सामान्य महिलांची कामे कशी होत असतील, असे मी जेव्हा सेनेचे भूपेंद्र लहामगे, अतुल सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकार्‍यांना सांगितले तेव्हा त्यांनीही फोन करून सांगितले. त्यानंतरही नायब तहसीलदार राणे मात्र काम करीत नव्हता. त्यामुळे मी देखील वैतागले होते.

प्रश्न : मग पुढे काय केले?
मी एके दिवशी तहसील कार्यालयात गेले. तिथे अनेक महिला होत्या. त्यांना त्यांच्या प्रकरणाबद्दल विचारणा केली. त्या महिलांनीही मला तेच सांगितले. ईश्वर राणे वारंवार फिरवतो आणि महिलेशी कसे बोलावे हे त्याला माहीत नाही. घाण शब्दात तो बोलतो. मग राणेला विचारले, काय साहेब, आमचे प्रकरण मंजूर न होण्याचं कारण काय? यावर तो म्हणाला, मी प्रेमाचा भुकेला आहे. प्रेम मिळालं की झालं समजा तुमचं काम, दुसरे काय? माझ्या सोबत एक तरुणी होती, तिच्या आजीचे प्रकरणही पडून होते. तिच्याकडे बघून त्यांनी वाचाळ मागणी केली. ते चित्र बघून मी निघून गेले.

प्रश्न : त्यानंतर तुम्ही काय भूमिका घेतली ?
मी एके दिवशी फोन केला. त्यावर पुन्हा राणे याने तेच उत्तर दिले आणि भेटण्याची मागणी केली. मी हा सारा प्रकार माझे पती विजय हेमाडे आणि काही महिला शिवसेना पदाधिकार्‍यांना सांगितला. त्यानंतर स्टिंग ऑपरेशन करून या लंपट अधिकार्‍याला पकडण्याचा विचार केला. त्यासंदर्भात शिवसेना पदाधिकार्‍यांसह पती विजय हेमाडेंशीही बोलणे केले. पतींनी मात्र तसे करण्यास नकार दिला. सामान्य गरीब महिलांना न्याय मिळावा म्हणून माझ्या मनात वारंवार त्याला धडा शिकविण्याचा विचार मनात येत होता.

प्रश्न: पतीचा विरोध असताना तुम्ही कसे धाडस केले?
- मी माझ्या पतींना सांगितले की, चित्रपट, दूरदर्शन मालिकांमध्ये अनेक संसार करणार्‍या विवाहित महिला प्रेमाचं नाटक करतात, पण त्या मुळात तशा नसतात. त्यांची कला असते, अगदी तसेच मी नाटक करते. आपण गरिबी पाहिली आहे. गोरगरीब महिलांना छळणार्‍या, त्यांचे लैंगिक शोषण करणार्‍या अधिकार्‍याला पकडून दिले तर आपल्याला आशीर्वाद मिळेल आणि एक चांगले काम करण्याचे मला समाधान मिळेल, असे सांगितले. त्यानंतर माझे पती हे स्टिंग ऑपरेशन करण्याला तयार झाले आणि माझे धाडस वाढले.

प्रश्न: मग कसे नियोजन केले?
- शिवसेनेचे भूपेंद्र लहामगे, अतुल सोनवणे आणि अन्य पदाधिकार्‍यांसह आपण महिला संघटनेच्या पदाधिकार्‍यांनाही या प्रकाराची कल्पना दिली होती. या सर्वांनी मला सहकार्य केले. ज्या मुलीच्या आजीचं संजय गांधी निराधार योजनेचं प्रकरण पडून होते, तीही त्रस्त झाली होती. त्यामुळे तिनेही मला साथ दिली.

प्रश्न: कुठे आणि कसे केले स्टिंग ऑपरेशन ?
ठरल्याप्रमाणे मी ईश्वर राणेला फोन केला. आमची पैसे देण्यासह त्यांची मागणी पूर्ण करण्याची तयारी असल्याचे सांगून त्यांना चाळीसगाव रोडवरील आविष्कार कॉलनीतील एका घरी बोलावले. तेथे त्यांना पैसे दिले आणि त्यांनी माझ्यासह सोबत असलेल्या तरुणीला जवळ घेऊन वाचाळ चाळे करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व कॅमेर्‍यात कैद झाले.

प्रश्न: मग राणे यांना हा प्रकार कसा कळला?
तो आमच्याशी जास्तच वाचाळ चाळे करायला लागला. अधिकारी माणूस पैसे वगैरे घेईल ; पण एवढे चाळे करण्याचे धाडस करेल याची मलाही कल्पना नव्हती ; पण तो जास्तच धाडस करायला लागला. आम्ही आत खोलीत होतो आणि एका मुलाला दरवाजाबाहेर उभे केले होते. हा जास्तच करायला लागल्यामुळे तो एकदम पुढे आला आणि राणेच्या लक्षात येताच, तू माले फसाडं, असं म्हणून पळू लागला. तेवढय़ात काही महिलांनी त्याला मारलेही ; पण तो पसार झाला.

प्रश्न : मग लगेच तक्रार का दिली नाही?
राणे त्या दिवसापासून पसार झाला. तो रजा टाकून गेल्याचे आम्हाला समजले. झाला प्रकार शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना माहीत होता. त्यामुळे सर्वच त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याला जिल्हा प्रशासनासमोर उभे करून आम्हाला स्टिंग ऑपरेशनची सीडी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकार्‍यांना दाखवायची होती. त्यामुळे आम्ही त्याला पकडण्यासाठी गोपनीयता ठेवली होती.