आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Niradhar Mahila Yojna Tahsildar Ishwar Rane Arrested For Sexual Harassment

सीडी पाहून प्रशासन चक्रावले!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणार्‍या नायब तहसीलदार ईश्वर राणेला चोप दिल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नेले. तेथे हेमलता हेमाडे यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनची सीडी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अशोक करंजकर यांच्या दालनात जिल्हाधिकारी प्रकाश महाजन, जिल्हा पोलिसप्रमुख प्रदीप देशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांना दाखविण्यात आली. सुमारे 29 मिनिटांची ही सीडी बघितल्यानंतर अधिकारी चक्रावले. स्टिंग ऑपरेशनदरम्यान राणे यांनी जिल्हाधिकार्‍यांबद्दलही अपशब्द वापरले. अधिकारी कोणत्या थराला जाऊ शकतो, हेच लक्षात आले आहे.

तीन दिवसांपासून राणेच्या मागावर
राणेचे सुमारे पंधरा दिवसांपूर्वी आविष्कार कॉलनीतील एका घरात स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते. त्यानंतर तो तहसीलदार कार्यालयात न जाता जिल्हाधिकारी कार्यालयातून कामकाज बघत होता. त्यानंतर राणे रजा टाकून गायब झाला होता. ही माहिती शिवसेनेच्या महिला पदाधिकार्‍यांना समजल्यानंतर ते गेल्या सोमवारपासून त्याच्या मागावर होते. राणेला पकडण्यासाठी काही महिलांनी बुरखा घालून जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारपासून पहारा ठेवला होता. त्यानंतर गुरुवारी राणे जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असल्याची माहिती नीलम व्होरा यांना मिळाली. त्यांनी ही माहिती इतर महिलांना दिली. त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी, महिलांनी राणेला पकडले.

महिलांच्या हातातून निसटण्याचा प्रयत्न
जुने जिल्हाधिकारी कार्यालयात पकडल्यानंतर राणेला महिलांनी चोप दिला. तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी परिसरात उपस्थित असलेले शिवसेनेचे महानगरप्रमुख भूपेंद्र लहामगे, धीरज पाटील, नगरसेवक महेश मिस्तरी, नरेंद्र परदेशी, विनोद जगताप यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी त्याला पकडले. त्यांना गुंगारा देण्याचा प्रयत्न राणेने केला. त्यानंतर त्याला मारहाण करत विवस्त्र करून त्याची जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून धिंड काढण्यात आली.

57 हजार रुपये लाच घेतली
स्टिंग ऑपरेशनच्या वेळी हेमलता हेमाडे यांच्याकडून राणेने 57 हजार रुपये लाच घेतल्याची माहिती शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी दिली. एका प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी राणे याने प्रथम दोन हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर एका प्रकरणासाठी एक हजार रुपये देण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार 57 हजार रुपये राणेला देण्यात आल्याचे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

देखण्या महिलांचे प्रकरण प्रलंबित
संजय गांधी योजनेचा लाभ घेण्यासाठी दाखल होणार्‍या प्रस्तावावर संबंधित महिलेचे छायाचित्र असते. ज्या महिलांचे छायाचित्र चांगले असायचे त्या महिलांचे प्रस्ताव राणे प्रलंबित ठेवत असल्याचा आरोप या वेळी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांतर्फे करण्यात आला. या महिला प्रस्तावाचा तपास करण्यासाठी आल्यावर राणे महिलांना त्यांचा प्रस्ताव शोधण्याचे कारण सांगून प्रस्तावाच्या फाइलमध्ये ईल छायाचित्र ठेवत असे, अशी तक्रार या वेळी जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्याकडे करण्यात आली.

राणेला बसविले कॉन्फरन्स रूममध्ये
राणेला चोप दिल्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी त्यास जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्याकडे घेऊन गेले. पोलिसांनी ताब्यात घेत जिल्हाधिकार्‍यांच्या दालनासमोर असलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स रूममध्ये बसविले. दोन तास राणे तेथे बसून होता. त्यानंतर तीन वाजेच्या सुमारास पोलिसांनी त्याला खाकी रंगाची पॅन्ट, शर्ट देऊन चेहर्‍यावर रुमाल बांधून शहर पोलिस ठाण्यात नेले. त्या वेळी राणेचा चेहरा पाहण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी झाली होती.

यापूर्वीही तक्रारी;प्रशासनाकडून दुर्लक्ष
काही महिलांनी राणेविरुद्ध जिल्हा प्रशासनाकडे लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या होत्या ; परंतु प्रशासनाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. त्याच्या विरोधात साक्री येथेही तक्रारी होत्या. त्यामुळे राणेच्या बदलीबाबतही संबंधितांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांमध्ये होती.

प्रशासकीय कामकाज ठप्प
जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले. घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त येणार्‍या नागरिकांना पोलिसांनी प्रवेशद्वारावरूनच परत पाठविले. कार्यालयात येणार्‍या अनेकांना पोलिसांनी चुकीची वागणूक दिल्याची तक्रार करण्यात आली. चार वाजेपर्यंत हा सारा गोंधळ सुरू होता. त्यातच जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी अप्पर जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात एक शासकीय बैठक घेतली.

माहिती देण्यास जिल्हाधिकार्‍यांची ना
घटनेनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांची भेट घेतली. त्या वेळी प्रशासनाला सहकार्य करा, असे सांगून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास आणि त्या विषयावर बोलण्यास नकार दिला. त्यानंतर सायंकाळी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता जिल्हाधिकार्‍यांनी मोबाइल न उचलल्याने त्यांची किंवा प्रशासनाची या प्रकरणाबाबतची भूमिका समजू शकली नाही.

राणेला केले प्रशासनाने निलंबित
स्टिंग ऑपरेशननंतर राणेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनानेदेखील त्यास निलंबित केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.


( फोटो छ नायब तहसीलदार राणेला जिल्हाधिकारी कार्यालयात आणल्यावर जिल्हाधिकारी प्रकाश महाजनांच्या दालनाबाहेर झालेली गर्दी.)