आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वाळांनी वेढलेल्या घरातून सहा महिन्यांच्या मुलास वाचवणाऱ्या निशाला बालशौर्य पुरस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ, भडगाव - जीवाची पर्वा न करता आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या घरात शिरून झोळीतील सहा महिन्यांच्या बालकाचे प्राण वाचवणाऱ्या भडगाव येथील निशा दिलीप पाटील या विद्यार्थिनीची यंदाच्या राष्ट्रीय ‘बालशौर्य’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्कारासाठी देशातून ८०, तर महाराष्ट्रातून पाच प्रस्ताव गेले होते. पैकी महाराष्ट्रातून पुरस्कारासाठी निवड झालेली निशा एकमेव आहे.

भडगाव येथील निशा दिलीप पाटील ही आदर्श कन्या विद्यालयात बारावीत शिकत अाहे. १४ जानेवारी २०१६ रोजी घराशेजारील रहिवासी कस्तुराबाई नथ्थू देशमुख त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेल्या होत्या, तर सहा महिन्यांचा मुलगा घरातील झोळीत झोपला होता. यादरम्यान घराला आग लागली. आगीच्या ज्वाळा आणि घरातून बाळाच्या रडण्याचा आवाज येताच निशाने क्षणाचाही विलंब करता पेटत्या घरात धाव घेतली. झोळीतील बालकाला सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले.
महाराष्ट्र राज्य बालकल्याण समितीचे राज्याध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी राष्ट्रीय ‘बालशौर्य’ पुरस्कारासाठी इंडियन कौन्सिल फॉर चाइल्ड वेलफेअरकडे निशाचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर निशाची राष्ट्रीय ‘बालशौर्य’ पुरस्कारासाठी निवड केली. दिल्लीत २६ जानेवारी राेजी निशाला पुरस्कार देण्यात येईल.

दिव्य मराठी मुळे दखल
दिव्यमराठीच्या वृत्तामुळे गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील तिघांचा राष्ट्रीय ‘बालशौर्य’ पुरस्काराने सन्मान झाला. शुभम चौधरी (भुसावळ), नीलेश भील (मुक्ताईनगर),यंदा निशा पाटील (भडगाव) हिला हा पुरस्कार जाहीर झाला. यापूर्वी १९९०च्या दशकात रवींद्र राजाराम सपकाळे यांचाही गौरव झाला होता.

निशाने स्वत:चा जीव धोक्यात घालून पेटत्या घरातून बालकाला वाचवले. या धाडसाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. ‘दिव्य मराठी’ने निशा पाटीलच्या शौर्याचे वृत्त प्रकाशित केल्याने साहसाची दखल घेता आली - चंद्रकांतचौधरी, राज्याध्यक्ष, बालकल्याण समिती
बातम्या आणखी आहेत...