आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाजंत्री झाली बंद; आता नोव्हेंबरनंतरच शुभमंगल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - लग्नसराईची वाजंत्री तब्बल सात महिन्यांनंतर शनिवारी शांत झाली. त्यामुळे आता नवविवाहेच्छुकांना नोव्हेंबरपर्यंत थांबावे लागणार आहे. त्यातही पुढील वर्षात सुरुवातीलाच शुक्राचा अस्त आल्याने तुलसी विवाहानंतर 15 दिवस उशिरा विवाह मुहूर्त आहेत.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विवाह मुहूर्ताच्या तारखांची संख्या अधिक होती. 2013 मध्ये तुलसी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ झाला. दाते पंचांगानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबर ते जून-जुलैदरम्यान तब्बल 58 मुहूर्त आले. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यातील तारखांना विवाहांची संख्या मोठी होती. त्यावेळी राजकारणी असो की आम नागरिकालाही एका दिवसाला किमान दोन-तीन विवाहांच्या निमंत्रण पत्रिका आल्याने लग्नांना हजेरी लावण्याची तारांबळ उडाली. काही महिन्यांपासून लग्नसराईचा धूमधडाका सुरू होता. तो शनिवारी शांत झाला. 5 जुलै ही तारीख विवाह मुहूर्ताची शेवटची तारीख होती. 10 जुलैला आषाढी एकादशीपासून आषाढ महिना लागतो आहे. त्यामुळे तुलसी विवाहापर्यंत विवाहांना ब्रेक आहे. पुढील वर्षाचे लग्नसराईचे नियोजन लक्षात घेता विवाहासाठी आतापासूनच नियोजन सुरू झाले आहे.

26 नोव्हेंबरला पहिला मुहूर्त
4 नोव्हेंबरला तुलसी विवाह होणार आहे. त्या दिवसापासून लग्नसराई सुरू होते. मात्र, यंदा याच काळात शुक्राचा अस्त आल्याने 22 नोव्हेंबरपर्यंत कुठलेच विवाह मुहूर्त नाहीत. तब्बल 15 दिवसांनी म्हणजेच 26 नोव्हेंबरपासून विवाहाला प्रारंभ होणार आहेत. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये दोनच मुहूर्त आहेत. 2 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबरदरम्यान शुक्राचा अस्त आहे. शास्त्रानुसार या काळात विवाह होत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

12/12चाही मुहूर्त
गेल्या वर्षी 11/12/13 अनोखा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न विवाहेच्छुकांनी रजिस्टर विवाह नोंदणीतून केला. मात्र, त्या दिवशी पंचांगानुसार विवाह मुहूर्त न आल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला. मात्र, यंदा 12/12/14 या दिवशी विवाहाचा मुहूर्त आहे. त्यामुळे ही तारीखदेखील विवाहेच्छुकांना साधता येऊ शकेल.

विवाहाचे पुढील मुहूर्त असे
नोव्हेंबर 26, 28
डिसेंबर 1, 3, 6, 7, 12, 15, 16, 17, 18
जानेवारी 24, 25, 26, 29
फेब्रुवारी 7,8,9,10,11,12,13, 15, 22, 23, 25, 27
मार्च 4,5,9,10,12,17
एप्रिल 21,27,28,30
मे 2, 5, 6,7, 8, 9, 11, 14, 15, 27, 28, 30
जून 3,4,6,7,11,12