आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्याची चिंता - बालकांसाठी औषधी नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पावसाळ्यात शासनाच्या आरोग्य विभागाकडून 28 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत अतिसार नियत्रंण पंधरवडा राबवला जातो. मात्र, आवश्यक औषधसाठाच उपलब्ध न झाल्याने हा अतिसार नियंत्रण पंधरवडा पुढे ढकलण्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढवली आहे. केवळ भुसावळ तालुकाच नव्हे, तर जिल्हाभर हीच स्थिती असल्याची धक्कादायक माहिती आहे.

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे लहान बालकांना अतिसाराची लागण होण्याची शक्यता वाढते. शिवाय कुपोषणाचे प्रमाणही वाढते. त्यामुळे शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत अतिसार नियंत्रण पंधरवडा साजरा केला जातो. या पंधरवड्यात पाच वर्षे वयोगटाच्या आतील बालकांना आशा स्वंयसेविका व आरोग्य विभागाचे कर्मचारी अतिसाराने बाधित बालकांना ओआरएस पावडर आणि पुढील 14 दिवसांसाठी झिंक गोळ्या देतात. ओआरएसचे द्रावण कसे तयार करावे? याचे पालकांना प्रात्यक्षिक करून दाखवले जाते. नियंत्रण पंधरवड्यात तालुक्यातील 6 हजार 705 मुली आणि 5 हजार 894 मुले, असे एकूण 12 हजार 599 बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्व बालकांना पंधरवड्यादरम्यान ओआरएस आणि झिंकच्या गोळ्या देणे अपेक्षित असताना 4 ऑगस्टपर्यंतही आरोग्य विभागाकडून आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध झालेला नाही.

पंधरवड्याला मुदतवाढ
अतिसार नियंत्रण पंधरवडा 28 जुलैपासून सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, आरोग्य विभागाकडूूनच अपेक्षित औषधसाठा उपलब्ध न झाल्याने या पंधरवड्याची मुदत 30 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केल्याचे स्थानिक आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

तालुक्यात सर्वेक्षण पूर्ण झाले आहे
- अतिसार नियत्रंण पंधरवडा राबवण्यासाठी 30 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याचे समजते. तत्पूर्वी आम्ही तालुक्यातील प्रत्येक गावामधील लहान बालकांचे सर्वेक्षण केले आहे. औषधाचा साठा उपलब्ध होताच नियोजित उपक्रम राबवू. डॉ. पी.बी.पांढरे, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी, भुसावळ