आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांना आता मिळणार नाही पॅथॉलॉजिस्टकडून कमिशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सध्या वैद्यकीय क्षेत्रात सुरू झालेल्या प्रथांना पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र पॅथॉलॉजिस्ट संघटनेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. याची सुरुवात मुंबई व रायगड जिल्ह्यापासून झाली आहे. यापुढे डॉक्टरांनी रुग्ण पाठवले अथवा नाही पाठवले तरी त्यांना कमिशन न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जळगाव जिल्हा संघटनेनेही याबाबत पाऊल उचलले आहे. सदस्यांना पत्र लिहून भूमिका स्पष्ट करणार आहे.

सध्या वैद्यकीय क्षेत्रातील वेगवेगळ्या शाखांमधील कारभाराविषयी समाजात वाईट प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसतात. त्यामुळे रुग्ण व डॉक्टर यांच्यातील नाते घट्ट होण्याऐवजी त्यात दरी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबॉयोलॉजीने 1 आॅगस्ट रोजी पत्रक जारी केले आहे. यात वैद्यकीय व्यवसायामध्ये दृढ होत चाललेल्या कट व कमिशन पद्धतीचा विद्रूप चेहरा उघडकीस आल्याचे व त्याची भारतीय वैद्यकीय परिषदेने गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला अशा प्रकारच्या गैरवर्तनावर दंडात्मक योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे नमूद केले आहे.

संघटना सध्या त्यांच्या क्षेत्रात सुरू असलेल्या तीन बाबींवर अधिक भर देणार आहे. यात डॉक्टरांनी रुग्ण पाठवले तरी त्यांना कमिशन देणार नाही. त्यापेक्षा आपल्या लॅबमधील तंत्रज्ञान वाढवून त्याचा दर्जा वाढवणे व गुणवत्तेवर भर देणार.

बहुसंख्य हॉस्पिटलमध्ये डॉक्टर पॅथॉलॉजी लॅब सुरू असून ते बंद करावेत. कारण त्यात पॅथॉलॉजिस्ट न ठेवता टेक्निशिअनच्या माध्यमातून रिपोर्ट तयार केले जातात. त्यात डॉक्टर आपल्या पद्धतीने रिपोर्ट तयार करून घेत असल्याचेही संघटनेच्या लक्षात आले आहे. यामुळे रुग्णांची मानसिक, आर्थिक व शारीरिक पिळवणूक होते.

एकच पॅथॉलॉजिस्ट अनेक लॅबमध्ये स्वत:चे नाव वापरण्याची परवानगी देतात. प्रत्यक्षात ते नमुन्यांची तपासणी करीत नाहीत. त्यामुळे ब-याचदा चुकीचे रिपोर्ट दिल्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळले जाते. यास पायबंद घालण्यावर भर दिला जाणार आहे.

मुंबई, रायगडमध्ये केली प्रतिज्ञा
या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व रायगडमधील सर्व पॅथॉलॉजिस्टनी प्रतिज्ञा केली आहे, की दैनंदिन वैद्यकीय व्यवसायामध्ये भारतीय वैद्यकीय परिषदेने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून व कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार, भेट वस्तूंची देवघेव व इतर गैरमार्ग व्यवसाय वृद्धीसाठी इतर व्यावसायिकांशी संबंध ठेवणार नाही.

गैरप्रकाराबाबत माहिती कळवा
संघटनेचे जे सभासद या ठरावाशी सहमत नसतील, त्यांना संघटना कोणत्याही प्रकारे मदत करणार नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच त्या व्यावसायिकाची तक्रार महाराष्ट्र वैद्यकीय परिषद व भारतीय वैद्यकीय परिषदेकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नियमबाह्य वर्तन करणा-या सहका-यांची नावे संघटनेला तसेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषद व भारतीय वैद्यकीय परिषदेला कळवण्याचे आवाहन केले आहे.