आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलाशये अद्याप कोरडीठाक; दमदार पाऊसच नाहीर, अनेक गावे तहानलेलीच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा- नाशिक जिल्ह्यातील बागलाण पट्टय़ात झालेल्या तुरळक पावसामुळे तेथील धरणे भरली नाहीत. त्यामुळे गिरणावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चाळीसगाव व पाचोरा तालुक्यातील धरणे कोरडीठाक असून, आता तर पिकांनाही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. गत आठवड्यापर्यंत पिकांसाठी समाधानकारक पाऊस होता. आता दमदार पाऊस हवा आहे. कारण पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होत आहे.

अवर्षणामुळे आहेत ते टँकर पूर्ववत चालू ठेवून त्यात आणखी वाढ करण्याची मागणी आता जोर धरत आहे. चणकापूर व केळझर या क्षेत्रात पाऊस न झाल्याने पाण्याचा फक्त मृत साठा शिल्लक आहे. त्यामुळे गिरणा नदीकाठावरील गावांमध्ये चिंता वाढली आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे 62 धरणे व पाझर तलाव पाचोरा तालुक्यात आहेत. कै.के.एम.बापू पाटील हे राज्याचे पाटबांधारेमंत्री असताना हिवरा, बहुळा, अग्नावती, सारवे पिंप्री, कोल्हे, डांभूर्णी पिंप्री, पिंपळगाव, घोडसगाव, लोहारा, म्हसाळा, दिघी, गाळण, गारखेडा, बांबरूड या लघु पाटबंधार्‍यांच्या मध्यम प्रकल्पांसह जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडून धरणे व पाझर तलावांचे काम झाल आहे. गेल्या वर्षी तालुक्यात अत्यल्प पावसाळा झाल्याने पिंपळगाव, घोडसगाव, डांभूर्णी पिंप्री, मडगव्हाण, कोल्हे, सातगाव, सारवे पिंप्री, बहुळे हे पिंपळगाव व सातगाव परिसरातील प्रकल्प वगळता मोठे असलेले बहुळा, अग्नावती, हिवरा, गाळण, दिघी, लोहारा, म्हसास, मालेगाव, राजुरीसह सर्व प्रकल्प कोरडेठाक आहेत. तालुक्यात पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागल्याने पाणीपुरवठय़ासाठी शासनाच्या तिजोरीतून करोडो रुपये खर्च झाले. त्यात विहिरी खोल व अधिग्रहित करणे आदी योजना राबवूनही फारसा उपयोग झाला नाही. पाचोरा तालुक्यात पावसाची सरासरी 549.05 असून, 10 जूनअखेर 221.09 इतकी नोंद झाली आहे. तालुक्यात कोणत्याही भागात जोरदार पाऊस झाला नसल्याने नद्या-नाल्यांना पूर आलेला नाही. तसेच विहिरींच्या जलसाठय़ातही वाढ झालेली नाही. लोहारा, म्हसाळा, कोकडी, बाणेगाव, राजुरी, कोल्हे, अटलगव्हाण, सारवे पिंप्री, घोडसगाव, पिंपळगाव येथील तलावांमधील डी ब्लॉकमध्ये 10 ते 15 टक्के जलसाठा वाढला आहे. त्यामुळे परिसरातील गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करून उगवणशक्ती चांगली असल्याने पिकांची निंदणी, कोळपणी, खते देणे यासारखी कामे झालेली आहेत. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसात पिकांसाठी व धरणे भरण्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. नगरदेवळय़ाला पाणीटंचाईची जास्त झळ बसली. कारण सर्वाधिक निधी येथील पाणीटंचाई निवारण्यात खर्च झाला. आजही या गावात पाण्यासाठी हाल आहे.

मन्याड क्षेत्रही चिंतित
चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरण जिल्ह्यातील अधिक क्षमतेचे धरण आहे. मन्याड धरणावर 25 गावे अवलंबून आहेत; मात्र या गावांमध्ये सध्या 6 ते 7 दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. मागील वर्षी मोठय़ा मुश्किलीने मन्याडमध्ये समाधानकारक पाणीसाठा शिल्लक होता. यंदा जुलै महिना अध्र्यावर आला असला तरी, मन्याडमध्ये मात्र पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे शिरसगावसह आडगाव, देवळी, चिंचगव्हाण व परिसरातील बहुसंख्य गावांना पाण्याचीच चिंता आहे. मन्याड धरणातील गाळही मोठय़ा प्रमाणावर काढला असल्याने पुढील वर्षी त्याचा फायदा होणार असला तरी, आजच्या परिस्थितीत मन्याड धरण पूर्ण क्षमतेने भरणे गरजेचे आहे. तरच गाळ काढल्याचा फायदा होणार आहे.

लाइव्ह रिपोर्ट हरणबारी व केळझर
नाशिक जिल्ह्यातील हरणबारी धरणात अवघा 70 दशलक्ष घनफूट, तर केळझर धरणात तीन दशलक्ष घनफूट इतकाच जलसाठा शिल्लक आहे. हरणबारी धरण क्षेत्रात 193 मिलिमीटर, तर केळझर धरण क्षेत्रात सरासरी 105 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या धरणांच्या जलसाठय़ात वाढ झालेली नाही. याउलट बदलत्या हवामानामुळे मृत साठय़ातील पाण्यात घट होत आहे. तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याशिवाय दोन्ही धरणातील पाणीसाठा वाढणार नाही व विहिरींनाही हवे तेवढे पाणी येणार नाही. त्यामुळे आगामी काळात दुष्काळाची चाहूल लागल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यातील या दोन धरणांवरच गिरणा धरणाचा साठा वाढणे अवलंबून आहे; मात्र बागलाण भागात अपूर्ण पावसाअभावी चिंतेचे वातावरण आहे. गेल्या तीन वर्षांपासून या भागात कमी पाऊस होत आहे. त्यामुळे गिरणा धरणही शंभर टक्के भरत नाही. या दोन्ही धरणांतील मृत साठय़ातून या भागास पाणीपुरवठा होत आहे.

धरणात जलपर्‍या टाकणे अशक्य
गिरणा पाटबंधारे विभाग वर्तमान परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. दमदार पावसाची प्रतीक्षा केल्याशिवाय पर्याय नाही. धरणातून आवर्तन देणे आता शक्य नाही. कारण पुरेसा साठा नाही. जलपरीद्वारे धरणातून पाणी काढण्यासाठी जवळ जॅकवेलही नाही. त्यामुळे हा प्रयोग अवघड आहे.
-एस.पी.ठाकरे, अभियंता