आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे: ट्यूशन लावली नाही; स्वत:च नाेट्स काढल्या, तणावमुक्त केला अभ्यास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे: ट्यूशन लावली नाही, स्वत:च नाेट्स काढल्या. रात्री पूर्ण झाेप घेऊन पहाटेच्या नीरव शांत वातावरणातील अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. दरराेज पाच ते सहा तास अभ्यासाचे नियाेजन केले. त्यातूनच दहावीत यशस्वितेचा झेंडा राेवता अाला, असे मत जिल्ह्यात प्रथम अालेल्या निकिता पाटील पीयूष महाजन यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केले. 
 
शिंदखेड्याच्या निकिता पाटील हिला १०० टक्के गुण मिळाले. तर पीयूष महाजनला ९९.२० टक्के गुण मिळाले. तसेच शहरातून प्रथम अालेल्या जयहिंद हायस्कूलच्या प्रांजली पवार हिने ९८ टक्के गुण मिळविले. तिनेही अभ्यासाचे सहा तासांचे नियाेजन केले हाेते. कमलाबाई शाळेच्या नंदिनी गांगुर्डे हिने ९७.२० टक्के गुण मिळविले. विशेेष बाब म्हणजे गुणवंत ठरलेल्या या विद्यार्थ्यांनी क्लासेसपेक्षा स्वयंअध्ययनावर जास्त भर दिला. 
 
दहावीचा निकाल लागल्यानंतर मंगळवारी उत्साहाचे वातावरण हाेते. निकाल पाहण्याची सगळीकडे एकच धूम हाेती. माेबाइलवरील इंटरनेटच्या माध्यमातून यंदा घरबसल्या सर्वाधिक निकाल पाहिला गेला. दहावीची परीक्षा जीवनाला कलाटणी देणारी ठरते. मात्र, परिस्थितीनुसार येणाऱ्या अडचणींवर मात करीत सचिन पवारसह शिरपूरच्या मुकेश पावराने दहावीत झेंडा राेवला. त्याचवेळी अासाराम बापू स्कूलमधील सचिन पवार याने एमअायडीसीत अंगमेहनतीची कामे करीत दहावीचा अभ्यास केला.
 
तलवार बाजीतही टॉपर 
निकिता केवळ अभ्यासक्रमात टॉपर नाही. तर तलवारबाजी व्हॉलिबॉल हा तिचा आवडीचा खेळ आहे. यापैकी तलवारबाजी खेळात तिने विभागीय स्तरावर चमक दाखविली होती. नागपूर या ठिकाणी झालेल्या स्पर्धेतून तिने रजत पदक प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे दहावीच्या परीक्षेसोबत तिने खेळांबद्दलची आपली आवडही जोपासली आहे. 
 
चित्रही काढतो, बुद्धिबळ खेळतो... 
चित्र काढणे बुद्धिबळ खेळणे हे पीयूषचे छंद आहेत. त्याने दहावीच्या अभ्यासाच्या काळातही आपले छंद जोपासले आहेत. त्याच्या मते अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. घोकंपट्टी करता अभ्यास केला की यश मिळतेच असे तो म्हणतो. त्याच्या शाळेनेही दहावी बोर्डात मागच्या वर्षी नव्वदपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे पेपर मागवून ते सोडवून घेतल्याने त्याच्यासह दहावीतील विद्यार्थ्यांना यश मिळविता आले. 
 
चिंतन-आकलन तणावमुक्तीमुळेच यश 
दहावीच्या परीक्षेचा अभ्यास करताना अधिकाधिक चिंतन, आकलन आणि तणावमुक्त राहण्यावर भर दिला होता. त्यामुळेच परीक्षेच्या काळातही कोणताही तणाव आला नाही. शिवाय स्वत: नोट‌्स काढण्याची सवय जिल्ह्यात टॉपर ठरण्यास साहाय्यकारी ठरली, असा अभ्यासाचा स्वानुभव १०० टक्के गुण मिळवणाऱ्या निकिता पाटील हिने ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितला. शिंदखेडा येथील मीराबाई गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी असलेली निकिता म्हणाली की, शाळेतून नियमित घरी आल्यावर वर्गात शिकवलेल्या विषयांचे स्मरण वाचन करीत असे. ही नियमितता कायम ठेवली. त्यामुळे पुस्तकी अभ्यासाएेवजी आकलनावर भर दिला. शिवाय त्याच दिवशी वाचन स्मरण करत असल्यामुळे ते अधिक काळ स्मरणात राहिले. दररोज सरासरी चार ते पाच तास अभ्यासाला देत असे. पहाटेच्या वेळी अभ्यास करणे अधिक आवडत असल्यामुळे ती अभ्यासासाठी ती वेळ निश्चित केली. 
 
सकाळी लवकर उठून अभ्यास केला 
शिरपूर- अभ्यासात सातत्य ठेवताना सकाळी लवकर उठून अभ्यास केला. त्यामुळे गुणांचा उच्चांक गाठू शकलाे, असे मत दहावीत ९९.२० टक्के गुण मिळविलेल्या पीयूष महाजन याने सांगितले. पीयूष जिल्ह्यात द्वितीय तर शिरपूर तालुक्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याला गणितात ९९ विज्ञानातही ९९ गुण मिळाले आहेत. अार.सी. पटेल विद्यालयात शिक्षण घेणारा पीयूष म्हणाला की, रात्री उशिरापर्यंत अभ्यास करता रात्री दहा वाजेपर्यंतच जागरण केले. मात्र सकाळी लवकर उठून अभ्यास केला. अभ्यासात सातत्य ठेवल्यानेच एवढे गुण मिळवू शकलो, असे त्याने सांगितले. त्याला गणित विषय आवडतो. पुढील शिक्षण घेऊन त्याला डॉक्टर व्हायचे आहे. पीयूषचे वडील झोडगे येथील ग्रामीण रुग्णालयात नोकरीला आहेत. तर आई येथील नवलबेन पटेल पूर्व प्राथमिक शाळेत बालवाडी शिक्षिका आहे. पीयूषने अभ्यास करताना प्रत्येक संकल्पना स्पष्ट करून समजून घेतल्या. 
 
आईसोबत मजुरी करून सचिन पवारने राेवला दहावीत झेंडा... 
चार वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही जिद्दीने शिक्षण पूर्ण करण्याचा संकल्प करत मोलमजुरी करून येथील आसाराम गुरुकुल शाळेतील सचिन नामदेव पवार या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ९२.८० टक्के गुण मिळवित यश मिळविले. धुळे तालुक्यातील दह्याणे येथील सचिन पवारच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी आजारपणामुळे निधन झाले. त्यानंतर सचिनच्या पुढील शिक्षणासाठी त्याची आई धुळे तालुक्यातील चितोड येथे राहण्यास आली. सचिनच्या आईने औद्योगिक वसाहतीत मिळेल ते काम करून सचिनचे शिक्षण सुरू ठेवले. दुसरीकडे आईला मदत व्हावी यासाठी सचिननेही सुटीच्या दिवशी मिळेल ते काम केले. त्याने दहावीच्या परीक्षेत ९२.८० टक्के गुण मिळवत आसाराम गुरुकुल शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत येण्याचा त्याचा मानस आहे. त्याचा संस्थाचालकांतर्फे सत्कार करण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...