आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - पालिका कर्मचार्यांना शिस्त लावण्यासाठी आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडून पावले उचलली जात आहेत. महासभा आणि स्थायी सभेत पाणी वाटप करणार्या शिपायांना पांढरा शर्ट व पांढरी पॅन्ट अशा ड्रेसकोडची सक्ती केली आहे. आदेश चांगला असला तरी 2005 पासून शिपायांना गणवेशाचे कापडच वाटप झाले नसल्याने करावे काय? असा प्रश्न कर्मचार्यांना पडला आहे.
आयुक्तांनी गेल्या आठवड्यात सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेत 16 प्रकारच्या सूचना दिल्या होत्या. यात उत्पन्नवाढीसाठी प्रस्ताव तयार करणे, कर्मचार्यांचे वर्क रजिस्टर ठेवणे, यासह मक्तेदारांच्या सफाई कामगारांनाही ड्रेसकोडचा वापर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. महासभेत चहा-पाणी वाटप करणारे कर्मचारी ओळखता यावे, यासाठी सर्वांना ड्रेसकोड आवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. मात्र, पालिकेतर्फे शिपायांना ड्रेससाठी कापडच पुरवण्यात आलेले नाही. कर्मचार्यांनी गेल्या वर्षी ड्रेससाठी कापड मिळण्याची मागणी केली होती. प्रशासन कापड देत नसून ड्रेसकोडसाठी सक्ती करत असल्याने ड्रेस आणायचा कुठून, असा प्रश्न कर्मचार्यांना पडला आहे.
कर्मचारी ओळखपत्रात विविधता
अधिकारी व कर्मचार्यांना ओळखपत्र लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ओळखपत्र न लावता आढळून आल्यास संबंधित कर्मचार्यास 50 रुपये व त्याच्या विभागप्रमुखाला 50 रुपये दंड आकारण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. आयुक्तांच्या आदेशाचे पालन करत कर्मचार्यांनी आपल्याकडे पडून असलेली जुनी ओळखपत्रे बाहेर काढली आहेत. यात काहींची चार वर्षांपूर्वीची तर काहींची त्यापेक्षाही जुनी आहेत. पिवळी, पांढरी आणि आकाशी रंगातील ओळखपत्रे अनेकांच्या गळ्यात दिसून येत आहेत. सर्वांना एक समान ओळखपत्र देण्याची गरज आहे.
गेल्या वर्षभरापासून गणवेश मिळण्याची कर्मचार्यांची मागणी
पालिका इमारतीमध्ये अधिकार्यांच्या सेवेत एकूण 20 शिपाई कार्यरत आहेत. सर्वांना ड्रेसकोड करण्यासाठी गेल्यावर्षी विषय पुढे आला होता. त्यामुळे शिपाई म्हणून काम करत असलेल्या कर्मचार्यांनी 22 ऑगस्ट 2012 रोजी पत्र देत गणवेशाची मागणी केली होती. प्रशासनाने दखल घेतली नाही. सध्या आयुक्तांच्या दालनातील शिपाई वगळता इतरांना गणवेश नसल्याची स्थिती आहे.
गणवेश दिलेले नसतील तर गणवेशात येण्याचा प्रश्नच नाही
ज्या शिपायांना गणवेश असेल मात्र घालत नसतील त्यांना गणवेश घालूनच यावे लागेल. ज्यांना गणवेश दिलेले नसतील तर त्यांनी गणवेशात येण्याचा प्रश्नच नाही. महासभेपूर्वी कर्मचार्याच्या गणवेश संदर्भात माहिती घेतो. साजिद पठाण, अतिरिक्त आयुक्त
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.