आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोदवड पालिकेने देशी दारूच्या दुकानाला दिलेले एनओसी रद्द; चार तास ठिय्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पायाला मार लागलेला असूनही नगरसेवक दीपक झांबड वॉकर घेऊन मोर्चात सहभागी झाले. - Divya Marathi
पायाला मार लागलेला असूनही नगरसेवक दीपक झांबड वॉकर घेऊन मोर्चात सहभागी झाले.
बोदवड- रहिवासी आणि नगरसेवकांना विश्वासात घेताच देशी दारूच्या दुकानाला दिलेली एनओसी रद्द करावी लागण्याची नामुष्की भाजपची सत्ता असलेल्या बोदवड नगरपंचायतीवर गुरुवारी सर्वसाधारण सभेत ओढवली. या मागणीसाठी बोदवडवासीयांनी मोर्चा काढून एनओसी रद्दचा ठराव होईपर्यंत तब्बल चार तास पालिकेबाहेर ठिय्या आंदोलन आणि मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे एनओसी रद्द करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी कमालीची एकी दाखवली. 
 
२० एप्रिल २०१७ रोजी झालेल्या बोदवड नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत पालिका हद्दीतील मालमत्ता क्रमांक ९५९४मध्ये पीयूष हरिषकुमार खत्री (रा.बोदवड) यांना किरकोळ देशीदारू विक्रीच्या दुकानासाठी नाहरकत (एनओसी) देण्यात आली होती. यानंतर मनूर रोड भागात हे देशीदारू विक्रीचे दुकान सुरू झाले होते. मात्र, २० एप्रिलच्या सभेत दारूच्या दुकानाला दिलेली एनओसी शहरवासीयांच्या संतापाचा स्फोट करणारी ठरली. विशेष म्हणजे ही एनओसी देताना पालिका प्रशासनाने नगरसेवकांसह दुकान असलेल्या भागातील रहिवाशांनादेखील विश्वासात घेतले नाही. या सर्व नाराजीत गुरुवारी झालेली पालिकेची सर्वसाधारण सभा वादळी ठरली.
 
सकाळी ११ वाजता सभेला सुरुवात होताच नगरसेवकांनी एनओसीच्या मुद्द्यावरून मुख्याधिकारी डॉ.नीलेश देशमुख यांना धारेवर धरले. विशेष म्हणजे या सभेत संबंधित दारूच्या दुकानाला एनओसी देण्यापूर्वी जळगावातील एका स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली जाहिरात पालिकेने दिलेली नाही, असे समोर आले. या जाहिरातीत गट ५८७मधील प्लॉट क्रमांक मध्ये दारू दुकान स्थलांतराचा उल्लेख होता. असे असले तरी प्रत्यक्षात संबंधित दुकानाला मिळालेली एनओसी घर क्रमांक ९५९४मधील होती. हे घर गट क्रमांक ५८७मधील प्लॉट क्रमांक १वर नसल्याने प्रशासन निरुत्तर झाले. याच मुद्द्यावर पालिकेवर मोर्चा घेऊन आलेले नागरिक, नगरसेवकांची मुख्याधिकाऱ्यांसोबत हमरीतुमरी झाली. मात्र, जनरेट्यापुढे नमते घेत प्रशासनाला पीयूष खत्री यांना देशीदारूच्या दुकानासाठी दिलेली एनओसी रद्द करणे भाग पडले. यासाठी झालेल्या ठरावाला कैलास पुंडलीक चौधरी सूचक, तर देवेंद्र खेवलकर अनुमोदक आहेत. 
 
नागरिकांचा चार तास ठिय्या, एक हजार स्वाक्षऱ्यांचे निवेदन 
बोदवड देशीच्या दुकानाला परस्पर एनओसी दिल्याच्या मुद्द्यावरून मुख्याधिकारी डॉ.देशमुख सत्ताधारी विरोधी गटातील नगरसेवकांच्या टीकेचे धनी ठरत असताना सकाळी ११ वाजेच्या सुमारास स्वामी विवेकानंदनगर, हिदायतनगर, बजरंगपुरा या भागातील शेकडो महिला-पुरुषांचा मोर्चा पालिकेवर धडकला. दारूच्या दुकानाची एनओसी रद्द करण्याबाबत झालेल्या ठरावाची प्रत मिळेपर्यंत पालिकेसमोरून उठणार नाही, अशी भूमिका घेत तब्बल चार तास ठिय्या आंदोलन केले. तसेच एक हजार नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन दिले.
 
या ‘लोकशक्ती’पुढे सपशेल लोटांगण घालत पालिकेने दारू दुकानाची एनओसी रद्द केली. दरम्यान, ज्या ठिकाणी देशीदारूच्या दुकानाला एनओसी देण्यात आली. त्या भागात चार देवस्थाने, जिल्हा परिषद उर्दू शाळा, उर्दू माध्यमिक विद्यालय आणि परिसरात महिला शौचालय आहे. तसेच हा परिसर सर्वसामान्य लोकवस्तीचा असल्याने दारूमुळे अनेक तरुण व्यसनी तर परिवार उद्ध्वस्त झाले आहेत. याच भागात दारूच्या दुकानाला दिलेली एनओसी चुकीची असल्याची भूमिका आंदोलक नागरिकांनी घेतली. तसेच याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी एकाही नगरसेवकाला विश्वासात घेता, वर्तमानपत्रात त्याविषयी प्रसिद्धी करता तसेच चुकीच्या प्लॉटमध्ये एनओसी दिल्याने नागरिकांनी डॉ.देशमुख यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याप्रकरणी मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचा आरोप केला. या गदारोळात दारू दुकानाची एनओसी रद्द करणे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित दारू दुकान स्थलांतराचा आदेश रद्द करावा, अशी मागणी करणारा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. नागरिकांनी दिलेल्या निवेदनावर शांताराम कोळी, गोपाळ पाटील, कल्पना गुरचळ, ज्योती चंदनकर, सुनंदा चंदनकर, वंदना सूर्यवंशी, आशा मुलतानी, रेखा माळी, पतंजली महिला समिती सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 
  
म्हसावद ग्रामपंचायत सभेत गावात दारू बंदीचा ठराव 
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे दारूबंदी करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या महिला ग्रामसभेत घेण्यात अाला. दारूबंदी व्हावी यासाठी २०० महिलांची सभेला उपस्थिती हाेती. ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच सभेसाठी पाेलिस बंदाेबस्त बाेलावण्यात अाला हाेता. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीचे उपसरपंच भगवान जीवराम साेनवणे यांच्या मुलांचे देेशीदारूचे हे दुकान अाहे. २९ एप्रिल राेजीची महिला ग्रामसभा तहकूब झाली हाेती. ती सभा शुक्रवारी अायाेजित केली हाेती. सरपंच विमलबाई चिंचाेरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. गावातील देशीदारू, बिअरबार गावठी दारू बंद व्हावी, या मागणीसाठी गावातील २००हून अधिक महिलांची महिला ग्रामसभेला उपस्थिती हाेती. उपस्थित महिलांनी गावात दारूमुळे उद््भवणाऱ्या समस्या पाेटतिडकीने मांडल्या. राधाबाई राजेंद्र महाजन यांनी ठराव मांडला. त्याला सरिता गणेश अामले यांनी अनुमाेदन दिले. यावर सर्व सदस्यांनी सर्वानुमते दारूबंदीचा ठराव पारीत केला. 
 
जायबंदी नगरसेवक मोर्चात 
नगरसेवक दीपक सुवालाल झांबड यांच्या पायाला दुखापत झाली आहे. मात्र, दारूच्या दुकानाला एनओसी दिल्याच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चात ते वॉकर घेऊन सहभागी झाले. या वॉकरचा सहारा घेऊनच त्यांनी पालिकेत भूमिका मांडली. तसेच आपल्या प्रभाग क्रमांक ६मधील शिवद्वारात निषेध फलक लावला.
बातम्या आणखी आहेत...