आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुकट्या प्रवाशांवर विशेष पथकाची नजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रेल्वेत विनातिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांवर कारवाई करून विशेष पथकाने 10 दिवसांत तब्बल 21 लाख 69 हजार 701 रुपये दंड वसूल केला आहे. ही मोहीम आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक एन. जी. बोरीकर यांनी दिली.

फुकट्या प्रवाशांचा बंदोबस्त करण्यासाठी ठरावीक एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्यांमध्ये स्पेशल कॉड नियुक्त करण्यात आले आहेत. या पथकात 10 जणांचा समावेश करण्यात आला आहे. कुठल्याही गाडीत शिरून हे पथक प्रवाशांकडे तिकिटांची मागणी करतात. तिकीट मिळाले नाही की तत्काळ दंडात्मक कारवाईचे पाऊल उचलतात. डीआरएम महेशकुमार गुप्ता व एडीआरएम प्रदीप बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली 10 तिकीट निरीक्षकांचे हे पथक तयार करण्यात आले आहे. पथकाने 1 ते 10 जुलैदरम्यान तिकीट तपासणी मोहीम राबवली. यात महाराष्टÑ एक्स्प्रेस, गोदान, भुसावळ-सुरत, भुसावळ-मुंबई पॅसेंजरसह सुपरफास्ट गाड्यांमध्ये अचानक तपासणी करण्यात आली.

मोहिमेदरम्यान दंडाची जी रक्कम वसूल झाली आहे, ती डोळ्यासमोर ठेवून ही मोहीम आणखी गतिमान करण्यात येणार असल्याची माहिती बोरीकर यांनी दिली. वाणिज्य व्यवस्थापक व्ही. जी. नायर, सहायक वाणिज्य व्यवस्थापक ए. के. उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्पेशल कॉड काम करीत आहे. जंक्शन स्थानकावरही फ्लॅटफॉर्म तिकीट न काढता ये-जा करणार्‍या प्रवाशांकडूनही दंड वसूल केला जात आहे.
रेल्वेस्थानकावर वाढीव बंदोबस्त
पुण्यातील फरारसखाना पोलिस ठाण्याच्या पार्किंग परिसरात गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावरही बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा बल व जीआरपी लक्ष ठेवून आहे. रेल्वे प्रवाशांकडील सर्व सामानाची कसून तपासणी केली जात आहे. आरपीएफ निरीक्षक अजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानकावर बंदोबस्त तैनात आहे.