जळगाव- उत्तरमहाराष्ट्र विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात राहून तिथल्या विद्यार्थिनींना वाममार्गाला लावणारी इराण येथील रहिवासी असलेल्या परवीन हिचा विद्यापीठासह खान्देशातील कोणत्याच महाविद्यालयाशी संबंध नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. विद्यापीठातर्फे रविवारी आयोजित पत्रकार परीषदेत कुलगुरू डॉ.मेश्राम कुलसचिव ए.एम.महाजन यांनी विद्यापीठाची बाजू मांडताना या प्रकरणाची चौकशी करीत असून पोलिसांना सहकार्य करीत असल्याचे म्हणणे लावून धरले. परवीनचा प्रवेश कुठल्या महाविद्यालयात आहे?, तिला वसतिगृहात प्रवेश कसा मिळाला?, प्रवेश दिला असेल तर तिचा आय.डी क्रमांक काय? अशा पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास कुलगुरूंनी असमर्थता दर्शवली. एकंदरीतच या प्रकरणात मोठे गौडबंगाल लपवण्याचा प्रयत्न विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी करीत असल्याचे या वेळी दिसून आले. परवीन आणि अलाअब्देल यांना खोली देण्यासाठी पवार याला फोन करणारा अधिकारी कोण? याचा विद्यापीठाने तीन दिवसांत शोधही घेतलेला नाही. तसेच या प्रकरणात समाधानकारक खुलासाही विद्यापीठाने केलेला नाही.
बंजारा समाज आक्रमक
मृतपवार यांच्या समाजबांधवांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असून एक निवेदनही कुलगुरूंना दिले अाहे. निवेदनात म्हटले अाहे की, पवार यांचा मानसिक छळ करून त्यांचे नाव या प्रकरणात गोवले जात होते. विद्यापीठाचे जबाबदार अधिकारी मात्र नामनिराळे झाले असून त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे, असा आरोपही करण्यात आला आहे.
पोलिसांचे पत्र धूळ खात
उत्तरमहाराष्ट्र विद्यापीठासह खान्देशातील काही महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी दोन वर्षांत ३०पेक्षा अधिक परदेशी विद्यार्थी खान्देशात आले आहेत. या विद्यार्थ्यांची चौकशी करण्याबाबत गेल्यावर्षी तत्कालीन पोलिस अधीक्षक एस.जयकुमार यांनी विद्यापीठाला पत्र दिले होते. सहा महिन्यांत दोनवेळा पत्र देऊनही विद्यापीठाने त्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे निष्पन्न झाले आहे.