जळगाव- "नाट्य'हा विषय विद्यापीठस्तरावर शिकवणे आवश्यक आहे. शास्त्र आणि कला या प्रकारात मोडणारा विषय व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यावश्यक असूनही विद्यापीठाने त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याची स्थिती आहे. त्यामुळे आगामीकाळात तरी उमवित नाट्यशास्त्र विभाग सुरू करावा, अशी मागणी नाट्यकर्मी आणि रसिकांकडून आता होऊ लागली आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न असलेल्या तीन महाविद्यालयांमध्ये नाट्यशास्त्र विषय शिकवला जात आहे. तर दुसरीकडे विद्यापीठस्तरावर मात्र, नाट्यशास्त्र विभाग नसल्याने उदयाेन्मुख नाट्यकर्मीना पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षणासाठी इतर विद्यापीठांचा रस्ता धरावा लागतो. अलीकडच्या काळात नाटक केवळ हाैसेचा विषय राहिलेला नसून करिअरची संधी देणारा प्रोफेशनल विषय झालेला अाहे.
अनेक कलावंत, नाट्यकर्मीना घडवलेल्या खान्देशात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असूनदेखील त्याठिकाणी नाट्यशास्त्र हा विषय उपेक्षित राहिला आहे. मू.जे. महाविद्यालयात १९९८पासून काही कोर्सेसच्या माध्यामातून अनेक रंगकर्मी घडवले जात असताना विद्यापीठाला मात्र त्याची जाणीव नसल्याची स्थिती आहे. विद्यापीठात इन्फ्रास्ट्रक्चर, मनुष्यबळ, नाट्यकर्मीचे सहकार्य आणि इतर भाैतिक सुविधा उपलब्ध असल्यातरी ‘नाट्यशास्त्र’ या विषयाविषयीचा गैरसमज आणि चुकीचा दृष्टिकोन याच बाबी कारणीभूत असल्याचे वास्तव आहे. व्यक्तिमत्त्व विकास, संगीत, देहबोली, उच्चारशास्त्र या सारख्या अनेक विषयांचा अंतर्भाव असलेला नाट्यशास्त्र उमविसह माध्यमिक शाळांमध्ये देखील शिकवला जाण्याची मागणी अाता नाट्यकर्मींकडून हाेऊ लागली आहे. तशा अपेक्षादेखील नाट्यक्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘दिव्य मराठी’कडे बोलून दाखवली आहे.
कुणाकडूनही अद्याप प्रस्ताव आलेला नाही
उत्तरमहाराष्ट्र विद्यापीठात अनेक प्राेफेशनल, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. सोशल सायन्ससेस विभागाकडून नाट्याशास्त्र विभाग करण्यासंदर्भात आतापर्यंत प्रस्ताव आलेला नाही. मागणी नसल्यामुळे विद्यापीठाकडून स्वत:देखील तसे प्रयत्न झाले नाहीत. मात्र, विद्यापीठांतर्गत मू.जे. महाविद्यालयास अन्य ठिकाणी हा विभाग आहे. दिलीपहुंडीवाले, डायरेक्टर,बीसीयूडी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
खान्देशच्या नाट्यक्षेत्रातील तज्ज्ञांच्या या आहेत विद्यापीठाकडून अपेक्षा...
मराठवाड्यासहइतर विद्यापीठांच्या धर्तीवर उमविमध्ये नाट्यशास्त्र विभाग सुरू करावा. नाट्य हा विषय सर्वसमावेशक आहे. त्यातही आता अनेक राेजगार उपलब्ध आहेत. माध्यमिक शाळांमध्ये नाट्याचे बेसिक तर विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणाची साेय झाली पाहिजे. पूर्ण वेळेचा अभ्यासक्रम असल्याने अनेकांना त्याचा उपयोग होईल. सर्व कलांचा आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असल्याने विद्यापीठाने नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करावा. प्रा.राजेंद्र देशमुख, नाट्यसमीक्षक.
विद्यापीठाने यापूर्वी प्रयत्न केला परंतु विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. शासनस्तरावर या विषयासाठी अनुदान मिळाल्यास विद्यार्थ्यांनाही परवडले. पूर्णवेळ नाट्यशास्त्रात पदवी असावी असे नाही. नाट्यशास्त्र हा व्यापक विषय आहे. अगदी व्यवस्थापन शाखेत देखील व्यक्तिमत्त्व विकास विषयाएेवजी नाट्यशास्त्र हा 100 गुणांचा विषय असला तरी विद्यार्थी त्यातून खूप काही शिकू शकतील. इतर अभ्यासक्रमांच्या विषयात नाट्यशास्त्र समाविष्ट करता येऊ शकतो. प्रा.डॉ.शमा सराफ, नाट्यकर्मी,अभ्यासक. नाट्यशास्त्र हा विषय शालेय शिक्षणात समाविष्ट करावा. नाट्य शास्त्राची ओळख झाल्यास विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. मार्केटिंग स्किल, परफॉर्मन्स स्किल या गोष्टी नाट्यशास्त्रातून अवगत होतात. त्यामुळे विद्यापीठस्तरावरही नाट्यशास्त्र स्वतंत्र विभाग असावा. श्रीपादजोशी, नाट्यकर्मी.