आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय विद्यालयात एसटी बसचा निर्णय शासनाकडे, शाळा, महापालिकेकडून द्यावा लागेल प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी बस सुरू करण्याचा विषय पूर्णत: शासनाच्या मर्जीवर अवलंबून आहे. शासनाकडून आदेश आल्याशिवाय एसटी महामंडळ बस सुरू करू शकत नसल्याचा खुलासा एस. टी. महामंडळाकडून करण्यात आला आहे.
शहराच्या हद्दीत एसटीची सेवा देण्यासाठी केंद्रीय विद्यालय आणि महापालिकेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणे आवश्यक आहे. दरम्यान, स्थानिक पातळीवर सहकार्य म्हणून जळगाव आगारातून त्या मार्गावरील चार बस विद्यापीठमार्गे पाठवण्यात येत आहेत.
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडल्यामुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांपुढे दैनंदिन ये-जा करण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांनी एसटी महामंडळाकडे बसची सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, शहर हद्दीत बस सेवा सुरू करता येत नसल्याची तांत्रिक अडचण पुढे करत जळगाव आगाराकडून बस सुरू करण्यास नकार देण्यात आला आहे. शासनाने एसटी महामंडळाला आदेश दिल्यानंतर आगारातून विद्यापीठात बस सुरू होऊ शकणार असल्याचे आगारप्रमुखांचे म्हणणे आहे.
शासनाकडे मागणी करा
शहरातील बेभरवशाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडल्यामुळे विद्यापीठासाठी एस.टी. महामंडळाच्या बसेस सुरू करण्याची मागणी होत आहे. ती पूर्ण करण्यासाठी शासनाकडून आदेश होणे आवश्यक आहे. महापालिकेने ना हरकत देत शासनाला प्रस्ताव दिल्यास या मागणीवर विचार होऊ शकतो. दरम्यान, केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आगारप्रमुखांकडे निवेदन दिले आहे.
तात्पुरती व्यवस्था
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मार्गावरील खेडी, कढोली या गावांना जाणाऱ्या चार बसेस विद्यापीठातील दोन्ही गेटमधून जातात. त्यामुळे शक्य तेवढे विद्यार्थी या बसमधून प्रवास करतात. तर धुळ्याकडे जाणाऱ्या बसेस महामार्गावरील विद्यापीठाच्या गेटसमोर थांबतात. तेथे बस उभी करण्यासाठी जळगाव आगारातील एक कर्मचारी तेथे नियुक्त करण्यात आला आहे.