आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North Maharashtra University P.hd Exam Contro In Jalgaon

पीएच.डी. प्रवेशपूर्वचा पेपर रद्द; आता 24 फेब्रुवारी रोजी होणार शिक्षणशास्त्राचा पेपर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत पीएच.डी. प्रवेशपूर्व ऑनलाइन परीक्षेची शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षण या विषयाची प्रश्नपत्रिका इंग्रजी भाषेत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार घातला. ती मराठी माध्यमातून उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरत विद्यार्थ्यांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे बीसीयूडीच्या संचालकांना ही परीक्षा रद्द करावी लागली. आता या विषयाची परीक्षा 24 फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा खान्देशातून जी.एच. रायसोनी इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी या एकमेव केंद्रावर परीक्षा घेतली जात आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून 2600 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मंगळवारी कॉमन मॅनेजमेंट, मेंटन्स मॉरल सोशल सायन्स या दोन बॅचमधील परीक्षा शांततेत पार पडल्या. मात्र, दुपारी 1 ते 4 या वेळेत होणार्‍या शिक्षणशास्त्र व शारीरिक एज्युकेशन या विषयाच्या परीक्षेसाठी केवळ इंग्रजी भाषेतून प्रश्नपत्रिका देण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकांचा आग्रह धरला. विद्यापीठाच्या सदस्यांनी केवळ इंग्रजी भाषेतच प्रश्नपत्रिका असून ती तुम्हाला सोडवावी लागेल असे सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

प्रा.दिलीप हुंडीवाले यांना घेराव

इंग्रजीसोबत मराठी भाषेतून प्रश्नपत्रिका असेल तर आम्ही पेपर सोडवू, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतल्यानंतर रायसोनी महाविद्यालयात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. बीसीयूडीचे संचालक प्रा. दिलीप हुंडीवाले यांना घेराव घालत विद्यार्थ्यांनी उमविच्या सावळ्या गोंधळाचा जणू पाढाच वाचला. वास्तविक प्रत्येक जिल्ह्यात एका केंद्रावर परीक्षा घ्यायला हवी होती. नाहक विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी नंदुरबार, मुंबई, पुण्याहून यावे लागल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली.

लेखी पत्राचे सामूहिक वाचन

विद्यार्थ्यांच्या दबावापुढे विद्यापीठाला अखेर परीक्षा मागे घ्यावी लागली. एवढेच नव्हेतर त्यांच्याकडून लेखी स्वरूपात निवेदन घेण्यात आले. त्याचे महाविद्यालयात सामूहिक पद्धतीने वाचनही करण्यात आले. आता ही परीक्षा 24 फेब्रुवारीला जळगाव, धुळे व नंदुरबार या केंद्रावर इंग्रजी व मराठी माध्यमात घेण्यात येणार आहे. तारीख निश्चित करण्यासाठी तासभर चर्चा करावी लागली.

उर्वरित पेपर वेळापत्रकानुसारच

शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षण या विषयाच्या पेपर व्यतिरिक्त उर्वरित सर्व पेपर वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत. बुधवारीही दिलेल्या वेळेतच परीक्षा होणार आहे. पहिल्या सत्रातील परीक्षांसाठी इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तोच संदर्भ धरीत विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला कोंडीत पकडले. विद्यापीठाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला.