आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जात प्रमाणपत्र आता टपालाने घरपाेच देणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - धुळे येथील जातपडताळणी कार्यालयात तयार झालेले प्रमाणपत्र उमेदवार घेऊन जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे प्रमाणपत्रे आता अर्जदारांच्या मूळ पत्त्यावर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

धुळे, नंदुरबार, जळगाव या तीन जिल्ह्यांसाठी शहरातील पारोळारोड परिसरात विभागीय जातपडताळणी कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयात गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर जातपडताळणीसाठी प्रकरणे दाखल झाली आहेत. छाननीनंतर तयार झालेली प्रकरणे उमेदवारांनी घेऊन जावी यासाठी जातपडताळणी कार्यालयाने विविध उपक्रम राबविले. त्यात उमेदवारांना पत्र पाठविणे, एसएमएस करण्यात आले.
गेल्याच महिन्यात व्हाॅइस कॉलिंगचा पर्यायही वापरण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही बहुतांश प्रकरणे जातपडताळणी कार्यालयात पडून आहेत. उमेदवारांचा प्रमाणपत्र घेऊन जाण्यास प्रतिसाद मिळत नसल्याने अंतिम पर्याय म्हणून समितीने सर्व प्रकरणे टपालाने उमेदवारांना पाठविण्याचा निर्णय घेतले आहे.
अर्जदारांनी प्रस्ताव दाखल करताना जो पत्ता दिला आहे. त्या पत्त्यावर टपालाने ही सर्व प्रकरणे पाठविण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया लवकरच पार पाडण्यात येईल. त्यामुळे ज्या उमेदवारांची प्रकरणे तयार आहेत. त्यांना आता ती घरपोच मिळतील. जर उमेदवारांनी दिलेला पत्ता चुकीचा असेल किंवा पत्त्यात बदल झाला असल्यास पुन्हा प्रकरण उमेदवारापर्यंत पोहाेचविण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.

हलगर्जीपणामुळे त्रास
जातपडताळणी कार्यालयात प्रकरण दाखल केल्यानंतर त्याच्या सद्य:स्थितीची पडताळणी करण्याची जबाबदारी उमेदवाराची असते. मात्र, असे असताना अनेक उमेदवारांनी तब्बल वर्ष, दीड वर्षाचा कालावधी उलटूनही प्रमाणपत्राविषयी साधी चौकशी केलेली नाही.

व्हाॅइस कॉलिंगच्या पर्यायाला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. परिणामी सर्व प्रकरणे अर्जदारांच्या पत्त्यावर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यानच्या कालावधीत प्रमाणपत्र घेण्यासाठी उमेदवार अाल्यास त्यांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सोमनाथगुंजाळ, अध्यक्ष: जातप्रमाणपत्र पडताळणी समिती.