आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता गुन्हेगारांना पकडणे पोलिसांना झाले अधिक सोपे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - वाहतुकीचा नियम तोडणे, हाणामारी, विनयभंग आदी कोणतेही गुन्हे करून पळून जाण्याचे मनसुबे असतील, तर ते विसरा! पूर्वी कायदा मोडल्यानंतर तुमच्या विरोधात पोलिसांकडे पुरावे नसायचे. मात्र, आता शहरातील तुमच्या प्रत्येक हालचालींचे चित्रीकरण केले जाणार आहे. त्यामुळे कायदा मोडणे तुम्हाला या पुराव्यांच्या आधारे थेट तुरुंगाचा रस्ता दाखवू शकते. नवीन मोबाइल कॅमेरा व्हॅनमुळे शहरातील रहदारीवर व गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे पोलिसांना सोपे होणार आहे. जिल्हा पोलिस दलाच्या ताफ्यात ही व्हॅन दाखल झाली आहे. लवकरच ती कार्यान्वित केली जाणार आहे.

जळगाव पोलिसांकडे अनेक अत्याधुनिक वाहने आहेत. त्यात गर्दीला पांगविण्यासाठी आवश्यक असलेली पाण्याची गाडी, श्वान पथकासाठीची वेगळी कार, अत्याधुनिक अशी बॉम्ब डिस्पोझल कार अशा प्रकारची अनेक वाहने पोलिस दलाच्या सेवेत असताना आता त्यात मोबाइल कॅमेरा व्हॅनची भर पडणार आहे. हे वाहन जिल्हा पोलिसांनी जळगावातच तयार करून घेतले आहे. पोलिस व्हॅनवर कॅमेरा फिट करण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी हे वाहन उभे राहील त्या परिसरातील चारही दिशांना 400 मीटरपर्यंतच्या सर्व घटना या मोबाइल व्हॅनला टिपता येणार आहेत.

खान्देशातील पहिलाच उपक्रम
जळगाव पोलिसांनी राबविलेला हा उपक्रम खान्देशातील पहिलाच उपक्रम ठरला आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर या जिल्ह्यांमध्ये अशी कोणतीही प्रणाली अद्याप कार्यान्वित नाही. त्यामुळे जळगाव पोलिसांनी युक्तीने केलेला हा उपक्रम निश्चितच उल्लेखनीय ठरणार आहे.
नागरिकांनो, यापुढे काळजी घ्या, हे करणे टाळा
परवाना असल्याशिवाय वाहन चालवू नका

*भररस्त्यावर हुल्लडबाजी अजिबात करू नका
*विचित्र नंबरप्लेटचे वाहन चालवणे नियमबाह्य आहे
*तरुणी व महिलांची छेडखानी करू नका
*बेदरकारपणे वाहने चालवणे धोकादायक
* मोर्चा किंवा रॅलीमध्ये गोंधळ घालू नका
*गर्दीच्या ठिकाणी दादागिरी करू नका
*चेन स्नॅचिंग करूच नका
अधीक्षकांच्या दालनात कनेक्शन
मोबाइल कॅमेरा व्हॅनमध्ये जीपीआरएस सिस्टीमचा वापर करण्यात आल्यामुळे एक कनेक्शन पोलिस अधीक्षकांच्या दालनात देण्यात आले आहे. रस्त्यावर जो जमाव जमलेला असेल किंवा काही हालचाली होत असतील तर त्याचे चित्रीकरण जीपीआरएस सिस्टीमद्वारे पोलिस अधीक्षकांच्या दालनात दिसणार आहे. त्यामुळे घटनास्थळी बंदोबस्तात असलेल्या अधिकार्‍याला सूचना देणे पोलिस अधीक्षकांना सोपे होईल. घटनास्थळावरील चित्र पाहून काय उपाययोजना करायच्या हे पोलिस अधीक्षकांना सांगता येणार आहे. या प्रकारामुळे खरे आरोपी पकडणे पोलिसांना सहज शक्य होणार आहे.
काय होईल फायदा?
कल्पक बुद्धी वापरून तयार केलेल्या या मोबाइल कॅमेरा व्हॅनमुळे पोलिसांचा बराचसा ताण हलका होणार आहे. ही व्हॅन पोलिस दलातील वाहनांच्या ताफ्यातली असली तरी तिच्यावर पोलिस दलाची कोणतीही ओळखीची खूण नसेल. सामान्य व्हॅनप्रमाणेच ती शहरात कार्यान्वित होईल, ज्यामुळे ही व्हॅन नेमकी कोणाची, हे सहजपणे ओळखता येणार नाही. सद्य:स्थितीत शहरात जेथे संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली किंवा काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तेथे संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कर्मचार्‍याला स्वत: व्हिडिओ चित्रीकरण करावे लागते. चित्रीकरण होत असल्याचे समजताच समाजकंटक पळून जातात. त्यामुळे चित्रीकरणाच्या टप्प्यात आरोपी सापडत नाहीत. नवीन कॅमेरा मोबाइल व्हॅनमुळे ही समस्या निर्माण होण्याची शक्यता नाही. ज्या घटनास्थळी ही व्हॅन उभी केल्यास सर्व बाजूंच्या हालचाली काही क्षणात कॅमेर्‍यात कैद होतील, अशा लोकांना चित्रीकरण बघितल्यानंतर शोधून काढणे सोपे होणार आहे. यामुळे रस्त्यावरची छेडखानी तसेच हुल्लडबाजीचे प्रकारदेखील थांबू शकतात.