आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता रजिस्ट्री, विवाह नोंदणीही ऑनलाइन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - दुय्यम निबंधक कार्यालयात विविध प्रकारची 70हून अधिक कामे केली जातात. त्यात प्लॉट, जमीन खरेदी-विक्री, विवाह नोंदणी, रजिस्ट्री या महत्त्वाच्या कामांसाठी नागरिकांना कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागतात, पण शासनाच्या ‘आय सरिता’ प्रणालीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक कामे एकाच ठिकाणी ऑनलाइन होणार असून माहितीही एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

आय सरिता (स्टँप अँड रजिस्ट्रेशन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी बेस्ड अँडमिनिस्ट्रेशन) या प्रणालीमुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व कामे ऑनलाइन होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे दलालांच्या मध्यस्थीला ब्रेक लागणार आहे. तसेच नागरिकांना कार्यालयात खेट्या मारून अधिकार्‍यांची मनधरणी करण्यापासूनही सुटका होणार आहे. ‘आय सरिता’ ही प्रणाली थेट वरिष्ठ कार्यालयाशी जोडलेली असेल. त्यामुळे राज्यातील व्यवहार, भाव, नोंदणी रजिस्ट्रीची माहिती एकाच ठिकाणी कमी वेळेत मिळणार आहे. परिणामी दलालांच्या मध्यस्थीला ब्रेक लागेल. तसेच घरबसल्या जमीन मालकाला सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. मात्र, शहरात ही सुविधा उपलब्ध होण्यासाठी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे. कार्यालयातील कर्मचार्‍यांवरही विविध प्रकारची जबाबदारी असल्यामुळे चुकांचे प्रमाण वाढले होते. अनेक वेळा बनावट रजिस्ट्री होत असल्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे यावर नियंत्रण मिळण्यासह कारभारात पारदर्शकता ठेवण्यासाठी ही सुविधा फायद्याची ठरणार आहे. भाडेपट्टा, तारण असलेली जमीन, प्लॉट, जमिनीची खरेदी-विक्री, मुद्रांकाची माहिती व इतर विविध 70 प्रकारच्या नोंदणीसह राज्यातील विविध ठिकाणच्या कार्यालयांतील माहितीही एकाच क्लिकवर उपलब्ध होण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान ही प्रणाली सुरू झाल्यानंतर नागरिकांची फसवणुक टळण्यास मदत होणार आहे याशिवाय दलालांची मध्यस्थीही गायब होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळेल. केवळ 2002 पूर्वीच्या मालमत्तांची माहिती मिळणार नाही हा एकमेव भाग सोडला तर ही प्रणाली यशस्वी होणार आहे.
ही नोंदणी व माहिती होणार उपलब्ध - गाव, तांडे, महानगर येथील नोंदणी, मुद्रांक शुल्क विभागाची खरेदी -विक्री, करारनामे, प्रतिज्ञापत्रे, मृत्युपत्रे, दान, आर्थिक व मालकी हक्काचे व्यवहार, बिगरशेती, शेती, घरे, गावठाण, गायराने, प्लॉट, फ्लॅट, पक्के बांधकाम, कच्चे बांधकाम, जागेचे भाव, ठिकाण, मालमत्ता क्रमांक, मुद्रांक शुल्क, नोंदणी कार्यालयाची माहिती, ऑनलाइन व्यवहार नोंदणी, ऑनलाइन पेमेंट, नवीन योजना, शासकीय निर्णय, विवाह नोंदणी आदींची माहिती मिळणार आहे.
हे आहे प्रणालीचे वैशिष्ट्य - राज्यात आवश्यक त्या ठिकाणी व्यवहारासाठी जागेची माहिती, भाव, मूळ मालकी, मुद्रांक शुल्क याची माहिती उपलब्ध होणार आहे. व्यवहार करण्यासाठी नोंदणीचे आगाऊ टोकन बुकिंग करून कार्यालयात होणार्‍या कामाच्या दिवसाची तारीख उपलब्ध होऊ शकते. नोंदणीनंतर थेट माहिती मुख्य नियंत्रण केंद्रात समाविष्ट होईल. मालमत्तेच्या सव्र्हे नंबरवर क्लिक केल्यास मालकाला मिळालेला युनिक कोड नंबर टाकून सर्व माहिती उपलब्ध होईल. अतिशय सुटसुटीत अशी ही प्रणाली असून या प्रणालीमुळे व्यवहार सुरळीत होतील. शिवाय लांबच लांब लागणार्‍या रांगांपासून नागरिकांची सुटका होईल.
प्रणालीला जोडणारी कार्यालये
- नऊ विभागांत असलेली 360 उपकार्यालये
- 31 जिल्हा कार्यालये, विभागीय व इतर सर्व कार्यालये
- मध्यवर्ती नियंत्रण कार्यालय आणि इतर तीन कार्यालये

‘आय सरिता’ प्रणालीचे हे फायदे
- दलालांचा उपद्रव कमी होणार
- बारकोडिंग करण्यात येणार असल्याने चुकांवर नियंत्रण
- एकच जमीन अथवा घर दुसर्‍याला सर्व व्यवहार पूर्ण झाल्याशिवाय विक्री होणार नाही
- मुद्रांक, नोंदणी ऑनलाइन असल्याने फसवणूक टळेल
- 2002 पासूनची मालमत्तांची माहिती उपलब्ध होणार
- नोंदणी फ ी, मुद्रांक शुल्क आणि विभागात जमा होणारे शुल्क ऑनलाइन भरता येणार
- राज्यातील माहिती कोणत्याही कार्यालयाला ई-सर्चमधून कळणार
- राज्यातील 2010 ते 12 पर्यंतचे मालमत्तेचे बाजारमूल्य उपलब्ध होणार आहे.
केबल टाकण्याचे काम पूर्ण - धुळे कार्यालयात केबल टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे. आता लवकरच सर्व्हर बसविण्यात येणार आहे. सर्व्हर बसविल्यानंतर तत्काळ ही प्रणाली जिल्ह्यात सुरू होणार आहे. दरम्यान आय सरितामुळे कामाचा वेग वाढणार असून त्याचा फायदा नागरिकांना निश्चित होईल. अतिशय प्रगत अशी ही प्रणाली असून, शासनाकडून ही प्रणाली सुरू करण्यासाठी काम वेगात सुरू आहे. या प्रणालीमुळे निबंधक कार्यालयाच्या कामाचे स्वरूप बदलेल. एस.टी. पाटील, प्रभारी दुय्यम सहनिबंधक, धुळे