आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता जिल्हा परिषदेची वेबसाइट झाली मराठीतून अपडेट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जिल्हा परिषदेची वेबसाइट मराठीतून अपडेट करण्यात आली आहे. मराठी मजकुरामुळे ग्रामस्थांना त्याचा अधिक फायदा घेता येणार आहे. त्याचप्रमाणे इतर शासकीय कार्यालयांची वेबसाइट लिंकही येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शासकीय यंत्रणांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सहज जावी म्हणून शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना त्यांच्या वेबसाइट्स मराठीतून करण्याचे परिपत्रक काढले होते. त्यानुसार गेल्या महिनाभरापासून इंग्रजीतील मजकूर काढून तो मराठीतून अपलोड करण्याचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाले असून, जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या योजनांची माहिती आता मराठीतून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे त्याचा फायदा खर्‍या अर्थाने ग्रामस्थांना होणार आहे. जिल्हा परिषदेकडे तांत्रिक कर्मचारी उपलब्ध नसतानाही ही वेबसाइट अपडेट करण्यात यंत्रणेला यश आले आहे.

ऑनलाइनसाठी दिशादर्शक सूचना
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीची लिंक वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. तसेच ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधादेखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांचा अर्ज खरेदी करण्यापासून ते तो जमा करण्यापर्यंतचा त्रास कमी होणार आहे. त्याचप्रमाणे प्रथमच संगणक हाताळणार्‍या उमेदवारांना वेबसाइटवर दर्शवलेल्या सूचनांनुसार सहज मार्गदर्शन मिळणार आहे.

जिल्हा परिषद झाली हायटेक!
आता जिल्हा परिषद यंत्रणाही हायटेक झाली असून, वेबसाइटबरोबरच व्हिडिओ कॉन्फरन्सची सुविधाही आरोग्य विभागात करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त महा-ई ऑनलाइन सुविधेद्वारे ग्रामपंचायतीदेखील जिल्हा परिषदेला जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे शासनाला थेट ग्रामपंचायतींशी संपर्क साधणे सोपे झाले आहे. पंचायत समितीतही अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

शासकीय योजनांची माहिती मराठीत
सर्वशिक्षा अभियान, संपूर्ण स्वच्छता अभियान व ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची माहितीही मराठीतून अपलोड करण्यात आली आहे. यापूर्वी इंग्रजीत असलेल्या मजकुरामुळे सगळय़ांना त्याचा फायदा होत नव्हता; परंतु आता मराठीमुळे सर्वांनाच ही माहिती सहजगत्या मिळणार आहे. त्याचप्रमाणे इतर शासकीय कार्यालयांच्या वेबसाइट्सची लिंकदेखील अपलोड केल्यामुळे त्याच ठिकाणाहून आयकर, बीएसएनएलसह शासनाची वेबसाइटही सर्च करता येणार आहे.

अधिकार्‍यांचा बायोडाटा
अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह विभागप्रमुखांचा बायोडाटाही या वेबसाइटवर अपलोड केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांची संपूर्ण माहिती वेबसाइटवर पाहता येणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील काही फोटो व जिल्ह्याचा नकाशादेखील अपलोड केल्यामुळे सर्फिंग करताना अनेक संदर्भ उपलब्ध होतात.