आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धावत्या रेल्वेगाड्यांमधील टारगटांचा आता होणार बंदोबस्त!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - धावत्या रेल्वेत हुल्लडबाजी करून महिला प्रवाशांना त्रास देणार्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल शुक्रवारपासून भुसावळ विभागातील गाड्यांचे सर्वेक्षण करणार आहे. आयुक्त चंद्रमोहन मिश्रा यांनी त्यासाठी दोन भरारी पथकांची नियुक्ती केलेली आहे. त्यात 20 जणांचा समावेश आहे.


भुसावळ रेल्वे विभागाचे कार्यक्षेत्र इगतपुरी ते बडनेरा आणि भुसावळपासून ते खंडवापर्यंत आहे. महिलांसाठी आरक्षित असलेल्या डब्यात बसून प्रवाशांना त्रास देणार्‍या टारगटांचा उपद्रव गेल्या काही महिन्यांपासून वाढला आहे. महिला प्रवाशांनी याबाबत रेल्वे विभागाकडे वेळोवेळी तक्रारीही केलेल्या आहेत. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाने हुल्लडबाजी करणार्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी कृतीशील पाऊल उचलले आहे. आयुक्त चंद्रमोहन मिश्रा यांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या निरीक्षकांची विशेष बैठक बुधवारी बोलावली होती. त्यात धावत्या रेल्वेतील गुन्हेगारी रोखण्यासाठी रेल्वेगाड्यांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दोन भरारी पथक त्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक पथकात चार महिला जवान, एक महिला अधिकारी, चार पुरुष जवान, एक पुरुष अधिकारी अशा 10 जणांचा समावेश आहे. एक पथक नाशिक ते भुसावळ आणि दुसरे पथक भुसावळ ते खंडवा आणि भुसावळ ते बडनेरा या मार्गावरील धावत्या गाड्यांचे सर्वेक्षण करणार आहे. सात दिवस रेल्वेगाड्यांनी प्रवास करून त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल हे दोन्ही पथके रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त चंद्रमोहन मिश्रा यांना देणार आहेत.


भुसावळ विभागात शुक्रवारपासून सर्वेक्षण; दोन पथकांची नियुक्ती
धावत्या रेल्वेगाडीत अनधिकृतपणे खाद्यपदार्थ विक्री करणार्‍यांवरही या पथकांची नजर राहणार आहे. धोक्याची साखळी ओढणार्‍यांचाही हे पथक आता बंदोबस्त करणार आहे.


सप्टेंबरपासून प्रत्यक्ष गस्त
धावत्या रेल्वेगाडीत महिलांच्या डब्यात बसून प्रवास करणे, हुल्लडबाजीचा प्रयत्न करणार्‍यांवर येत्या 2 सप्टेंबरपासून थेट कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक गाडीत रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांची गस्त सुरू करण्यात येणार आहे. अनधिकृतपणे खाद्यपदार्थ विक्री करताना कोणी आढळले तर त्यांच्यावरही कारवाईचा दंडुका उगारला जाणार आहे.


सर्वेक्षणानंतर कारवाई
मुंबई येथे वरिष्ठ अधिकार्‍यांकडे एक बैठक झाली होती. त्यात महिला व लहान बालकांचा प्रवास सुखकर व्हावा, या विषयावर प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानुसार भुसावळ विभागात धावत्या रेल्वेगाड्यांचे सर्वेक्षण करून कारवाईची दिशा ठरवली जाणार आहे. चंद्रमोहन मिश्रा, आयुक्त, रेल्वे सुरक्षा बल